3/4/23
बिना लागे नाही मारा जिया रे...'ने लावले वेड तर ‘हुकुस बुकुस'वर बच्चेकंपनीचा धुमाकूळ
पुणे : वितस्था ते गोदावरीचा ‘हमनवा' अर्थात एकरूपता उलगडली ती कथक नृत्याविष्कारातून तर प्रसिद्ध काश्मिरी गायिका आभा हंजुरा यांच्या गायनातून काश्मिरी, डोगरी, सूफी आणि भक्तीचा मिलाफ एकाच मंचावर अनुभवायला मिळाला. निमित्त होते ते वितस्था (काश्मीर) महोत्सवाच्या समारोप सोहळ्याचे.
पुण्यातील ज्येष्ठ कथक नृत्यगुरू शमा भाटे यांच्या नादरूप संस्थेतील 14 शिष्यांनी नद्यांच्या मनातील भावतरंग उलगडून दाखविणारा कथक नृत्याविष्कार सादर करून कार्यक्रमात सुरुवातीस रंगत आणली.
काश्मीरमध्ये प्रवाहीत असलेली वितस्था आणि महाराष्ट्रातील गोदावरी या नद्यांची समानता-एकरूपता अधोरेखित करणारा ‘हमनवा' हा कथक नृत्याविष्कार रसिकांना केवळ मंत्रमुग्ध नव्हे तर अंतर्मुख करणारा ठरला.
‘हमनवा' म्हणजे समानता, हृदय आणि विचारांची एकरूपता. नदीचं मूळ कुठलंही असो, नाव काहीही असो तिचा प्रवास, कार्य आणि तिच्याबद्दलची धार्मिक आस्था जगाच्या पाठीवर सर्वत्र समानच असते. गोदावरीचा उगम शंकराच्या जटेतून तर वितस्थाचा उगम त्याच्या त्रिशूळातून झाला आहे. त्या अर्थाने दोन्ही नद्यांचे मूळ भगवान शंकर होय. नदी म्हणजे उमा-पार्वती, अर्थातच स्त्रीचे रूप.
नदीचे जीवनवाहिनी स्वरूप हा धागाही या नृत्याविष्कारात गुंफण्यात आला होता. विनय रामदासन यांचे संगीत असलेल्या या नृत्याचे दिग्दर्शन ज्येष्ठ कथक नृत्यगुरू विदुषी शमा भाटे यांनी केले होते. पंचनदीने सुरू झालेला हा नृत्यप्रवाह स्त्रीच्या विविध रूपांना स्पर्श करून सृजनाच्या सकारात्मक निर्मितीपर्यंत येऊन पुणेकरांच्या मनात स्थिरावला.
आझादी का अमृत महोत्सवाच्या संचालक प्रियंका चंद्रा यांच्या हस्ते विदुषी शमा भाटे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे निवेदन निरजा आपटे यांचे होते.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात काश्मिरी गायिका आभा हंजुरा यांनी काश्मिरी-डोगरी-हिंदी गाण्यांनी भाषेच्या पलिकडे असाणाऱ्या संगीताने आबालवृद्धांना भुरळ पाडली. ‘हिरे मोती मैं ना चाहू', ‘मेरा पिया घर आया ओ रामजी..' या हिंदी गीतांसह काश्मिरी-डोगरी लोकगीते सादर करून काश्मीरच्या संगीत परंपरेची ओळख पुणेकरांनी करून दिली.
‘थारे बिना लागे नाही मारा जिया रे...'ने तरुणाईला वेड लावले तर ‘हुकुस बुकुस'वर बच्चेकंपनीने नृत्याचा आनंद लुटला. तुंबक, सारंगी, मटका या काश्मिरी लोकवाद्यांसह गिटार, ड्रम्स यांचा अनोखा मिलाफ अनुभवायला मिळाला. वाद्यांची जुगलबंदी देखील खिळवून ठेवणारी होती. 15 गीतांच्या बहारदार सादरीकरणाने ‘वितस्था' या तीन दिवसीय काश्मिरी महोत्सवाचा समारोप झाला.
0 comments:
Post a Comment