30/3/23
पुणे : आझादी का अमृत महोत्सवाअंतर्गत केंद्र
सरकार संस्कृती मंत्रालयातर्फे पुण्यात दि. 31 मार्च ते 2 एप्रिल 2023 या कालावधीत
वितस्था (काश्मीर) महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात पुण्यातील
कलाकारांचाही सहभाग असणार असून कला-संस्कृतीविषयीची माहिती काश्मिरी कलावंतांना होणार
आहे.
पुण्यात पहिल्यांदाच होत असलेल्या या
महोत्सवाद्वारे जम्मू-काश्मीरचा सांस्कृतिक वारसा, खाद्यसंस्कृती, कलावैभव
पुणेकरांना अनुभवायला मिळणार आहे. काश्मीरचा समृद्ध सांस्कृतिक वारसा शंभरपेक्षा
जास्त काश्मिरी लोककलावंत सादर करणार आहेत, अशी माहिती दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूरचे संचालक डॉ. दीपक खिरवडकर, काश्मिरी संस्कृतीचे अभ्यासक, महोत्सवाचे नॉलेज पार्टनर, लघुपट निर्माते सिद्धार्थ काक आणि
आझादी का अमृत महोत्सव या उपक्रमाच्या सल्लागार गौरी बसू यांनी आज पत्रकार परिषदेत
दिली.
महोत्सवाच्या आयोजनात सावित्रीबाई फुले पुणे
विद्यापीठ आणि विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे सहकार्य लाभले
आहे. विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पिस युनिव्हर्सिटीचे डॉ. महेश थोरवे, महोत्वाच्या पुण्यातील समन्वयक चित्रा
देशपांडे उपस्थित होत्या.
सांस्कृतिक महोत्सव सायंकाळी 6 ते रात्री 10 या
वेळात विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, कोथरूड येथील आवारात आयोजित करण्यात
आला असून महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवार, दि. 31 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता महाराष्ट्राचे राज्यपाल मा.
श्री. रमेश बैस यांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र
फडणवीस, सांस्कृतिक
कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री
चंद्रकांत पाटील यांना उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.
वितस्था हे काश्मीर खोऱ्यातून वाहणाऱ्या झेलम
नदीचे मूळ नाव. वितस्था ही नदी काश्मीरची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते तसेच तिला
धार्मिक महत्त्वही आहे. वितस्था नदीप्रमाणे प्रवाही असलेली जम्मू-काश्मीरची
संस्कृती संपूर्ण देशात प्रवाही होत राज्या-राज्यांना जोडली जावी या उद्देशाने
पुण्यात महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘एक भारत श्रेष्ठ भारत'
या संकल्पनेवर आधारित हा महोत्सव आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी
रबाब पठण, लोकनृत्य, उद्घाटन सोहळा आणि त्यानंतर काश्मीरची
ओळख असणारे संतूरवादन काश्मिरी स्थानिक कलाकार अभय सोपोरी करणार आहेत. लोकनृत्यात
90 लोककलावंतांचा सहभाग असणार आहे.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सौरभ झाडू आणि
सहकारी जम्मू-काश्मीरचे हार्मनी संगीत सादर करणार आहेत. रवी खेमू भांड पथारनामक
लोकनाट्य, चेन्नईमधील
कलाक्षेत्र फाउंडेशनचे कलावंत शारदास्तोत्र आणि काश्मिरी कलावंताचे लोकनृत्य सादर
होणार आहे. पुणे येथील आकार इन्स्टिट्यूटतर्फे बालकलाकारांच्या सांगीतिक
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गायन, वादन आणि निवेदनाची बाजू बाल कलाकाराच सांभाळणार आहेत. दुसऱ्या
दिवशीच्या कार्यक्रमात कोलकाता येथील प्रख्यात गायिका उषा उत्थप यांच्या आवाजात
काश्मिरी आणि डोगरी भाषेतील लोकगीते पुणेकरांना ऐकावयास मिळणार आहेत.
महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी काश्मिरी
कलावंतांचे लोकनृत्य तसेच नृत्यगुरू शमा भाटे आणि सहकारी यांनी सादर केलेले
वितस्था व गोदावरी नदी संस्कृतीवर आधारित कथक नृत्य पाहावयास मिळणार आहे. आभा
हंजुरा व काश्मिरमधील लोककलावंतांचे काश्मिरी, डोगरी आणि सुफी गायन असे फ्युजनही रसिकांना ऐकावयास मिळणार आहे.
तीनही दिवस चालणाऱ्या सांस्कृतिक सोहळ्याचे सूत्रसंचालन दिल्लीतील सुप्रसिद्ध
निवेदक कर्नल राजेश जिंदल करणार आहेत.
ललित कला अकादमी दिल्ली आणि व्हिज्युअल आर्टस्
विभाग एमआयटी यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रकला कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले
असून यात बारा जम्मू-काश्मिरी व चार स्थानिक कलाकार सहभागी होणार आहेत. उद्घाटन
दि. 29 मार्च रोजी होणार असून कार्यशाळा दि. 2 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होणारे
कार्यक्रम
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दि. 1 आणि 2
एप्रिल रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळात चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.
गोदावरी आणि वितस्था यांच्यामधील संबंध, सुरुवातीच्या काश्मीची निर्मिती, काश्मिरी शब्दांचा उगम, काश्मिरी लोकनृत्य,
संगीत, नाट्य
यांचा शोध घेणारे परिसंवाद आयोजित करण्यात आले असून यात साहित्य अकादमीचे 20 वक्ते
बोलणार आहेत.
पुण्यात होणारा हा पहिलाच कार्यक्रम असून या निमित्ताने काश्मिरची सामाजिक, सांस्कृतिक ओळख होणार असल्याने या महोत्सवात पुणेकरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावावी असे आवाहन संयुक्त संस्थांतर्फे करण्यात आले आहे.
0 comments:
Post a Comment