Thursday, September 15, 2022

विद्यार्थी निवडणुका सुरू व्हाव्यात – मंत्री एस.पी.सिंग बघेल

15/7/2022

पुणे: विद्यापीठे आणि शिक्षण संस्थांमधील स्थगित असलेल्या विद्यार्थी निवडणुका पुन्हा सुरू झाल्या पाहिजेत. देशातील सद्यकालीन राजकीय प्रवाह एका स्थित्यंतरातून जात आहे. अशा परिस्थितीत राजकीय पटलावरील भावी युवा नेतृत्व घडवण्यासाठी भारतीय छात्र संसद महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकेल, अशी अपेक्षा भारत सरकारचे कायदा आणि न्याय राज्यमंत्री प्रा. एस. पी. सिंह बघेल यांनी गुरुवारी येथे व्यक्त केली. प्रा. बघेल यांच्या या वक्तव्याला उपस्थित हजारो विद्यार्थ्यांनी जोरदार टाळ्यांनी प्रतिसाद देत त्यांच्या विधानाचे स्वागत केले.

भारतीय छात्र  संसद फाऊंडेशन, एमआयटी स्कूल आफ गव्हर्नमेंट आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आयोजित बाराव्या छात्र संसदेच्या उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ. कैलासवादिवू सिवन,  पर्यावरण अभ्यासक पद्मभूषण डॉ. अनिल प्रकाश जोशी, जे.के. उद्योग समूहाचे सीईओ अनंत सिंघानिया व प्रसिद्ध शास्त्रीय गायिका श्रीमती कौशिकी चक्रवर्ती हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच,एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड, कार्याध्यक्ष व मिटसॉगचे संस्थापक राहुल विश्‍वनाथ कराड, कुलगुरू डॉ. आर.एम. चिटणीस,  एमआयटी शिक्षण संस्था समुहाचे अधिष्ठाता प्रा.शरद्चंद्र दराडे-पाटील, पंडित वसंतराव गाडगीळ व मिटसॉगचे संचालक डॉ. के. गिरीसन हे उपस्थित होते.

बघेल पुढे म्हणाले, की रामराज्य हे आदर्श प्रशासनाचे उदाहरण होते, हे
आपण आजही मान्य करतो. एमआयटी विद्यापीठासारख्या शिक्षणसंस्था यापुढे देशाला विश्‍वाच्या पटलावर विश्‍वगुरू ही संज्ञा प्राप्त करून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलतील
, यात शंका नाही. के. सिवन म्हणाले, अंतराळ संशोधन आणि विज्ञान तंत्रज्ञान हे फक्त राकेट, क्षेपणास्त्रे, उपग्रह प्रक्षेपकांच्या निर्मितीपुरते मर्यादित नाही. या ज्ञानाचा, संशोधनाचा उपयोग ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला होणे गरजेचे आणि महत्त्वाचे आहे. त्याच्या वापरातून ग्रामीण जनतेच्या कष्टमय आयुष्यात बदल घडले पाहिजेत. अंतराळ संशोधनातील नव्या शोधांमुळे आता आपल्याला वादळे, नैसर्गिक आपत्ती यांची पूर्वसूचना देणे शक्य होत आहे, ज्यामुळे मनुष्य आणि वित्तहानी टाळता येणे शक्य झाले आहे. तसेच मच्छिमार आणि शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय घेणे शक्य झाले आहे.

अनंत सिंघानिया म्हणाले, आगामी काळात मी केवळ आत्मनिर्भर भारताचे स्वप्न न पाहता, सारे जग आपल्यावर अवलंबून असल्याचे चित्र पाहात आहे. आगामी काळात लवकरच कल्पनातीत अशी तंत्रज्ञानक्रांती घडून येणार आहे. अशा काळात विद्यार्थ्यांनी नवे मार्ग, नव्या वाटा, नव्या दिशांचा ध्यास घेतला पाहिजे. प्रगती, यश यांच्या नव्या व्याख्या समजून घेतल्या पाहिजेत.

डॉ. अनिल प्रकाश जोशी, म्हणाले, दिल्ली आपली राजकीय राजधानी आहे, मुंबई आपली आर्थिक राजधानी आणि तसाच हिमालय म्हणजे पर्यावरण राजधानी आहे. काही काळापूर्वी आपण आर्थिक संकटातून जात होतो. आज आपण पर्यावरणीय संकटातून जात आहोत. पर्यावरणाचे संवेदनशील मुद्दे अधोरेखित करण्यासाठी आम्ही मुंबई ते उत्तराखंड अशी सायकल रॅली काढत आहोत. समाजमनात पर्यावरणाविषयी जाणीवजागृत निर्माण करण्याचा उद्देश यामागे आहे.

कौशिकी चक्रवर्ती यांनी छोटेखानी मनोगतात संगीताच्या माध्यमातून जीवन समजून घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. गुरूमंत्र, समाजकल्याण, विश्‍वकल्याण आणि स्वतःचा शोध यांचे वर्णन करणार्या पारंपरिक रचना गाऊन कौशिकी यांनी संगीत हा शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांच्या जीवनाता अविभाज्य भाग बनावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड  म्हणाले, स्वधर्म, स्वाभिमान आणि स्वत्व, या त्रिसूत्रीचा विद्यार्थ्यांनी स्वीकार करावा आणि आपल्या परंपरेने दिलेले तत्त्वज्ञानाचे, अध्यात्माचे संचित डोळसपणे अभ्यासावे. आपल्या विद्यार्थ्यांनी संतपरंपरेतील ज्ञानेश्‍वर महाराज, तुकाराम महाराज यांचे साहित्यविचार जाणून घेतले पाहिजेत. त्यातून त्यांना आपल्या समृद्ध सांस्कृतिक संचिताचे भान येईल आणि मानवी जीवनाचा खरा हेतू जाणण्यासाठी त्याची मदत होईल.

राहुल विश्‍वनाथ कराड म्हणाले, की राजकारण ही कोणत्याही प्रकारे त्याज्य अथवा नकारात्मक गोष्ट नाही. उलट आपल्या जगण्याचा तो अविभाज्य घटक आहे. आपण राजकारणाची सकारात्मक बाजू समाजासमोर आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विद्यार्थ्यांनी सजग नागरिकत्वाचे आदर्श निर्माण केले पाहिजेत. ज्यातून समाजाला राजकीय घडामोडी आणि राजकारण याविषयी सकारात्मक संदेश मिळतील. भारतीय छात्र संसदेच्या माध्यमातून असे शेकडो युवा विद्यार्थी घडवण्याचे आमचे ध्येय आहे. आपल्या देशाचा उल्लेख इंडिया ऐवजी भारत असा करावा, तसेच इंडिपेन्डन्स डे ऐवजी राष्ट्रीय दिवस असा उल्लेख करावा, यासाठी व्यापक अभियान सुरू करावे.

जम्मू काश्मीरची विद्यार्थिनी नंदिता जामवाल आणि पंजाबचा विद्यार्थी धीरेंद्र सिंह यांनी विद्यार्थ्यांच्या वतीने मनोगत मांडले. प्रा.डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले आणि डॉ.के. गिरीसन यांनी आभार मानले.

0 comments:

Post a Comment