Tuesday, July 19, 2022

गिरिप्रेमीची माउंट मेरू मोहीम २०२३ घोषित

20/7/2022
पुणे - गिरिप्रेमी या भारतातील अग्रणी गिर्यारोहण संस्थेने माउंट मेरू या आगामी महत्वाकांक्षी मोहिमेची घोषणा केली. ऑगस्ट- सप्टेंबर २०२३ मध्ये ही मोहीम पार पडेल. ६६६० मीटर उंच शिखराच्या नैऋत्य धारेने ही चढाई होणार असून या मार्गाने या आधी भारतीय मोहीम आयोजित केलेली नाही. त्यामुळे शिखर चढाई यशस्वी झाल्यास अशी कामगिरी करणारा हा पहिला भारतीय संघ ठरेल. या आधी गिरिप्रेमीने जगातील १४ पैकी आठ अष्टहजारी शिखरांना गवसणी घातली आहे. यात एव्हरेस्ट, कांचनजुंगा, अन्नपूर्णा यांसारख्या खडतर शिखरांचा समावेश आहे. सोबतच माउंट मंदा या भारतीय हिमालयातील शिखरावर देखील यशस्वी मोहीम करण्यात गिरिप्रेमीला यश आले आहे. या सर्व मोहिमांचे नेतृत्व उमेश झिरपे यांनी केले असून माउंट मेरू मोहिमेचे नेतृत्व देखील झिरपे हेच करणार आहेत. माउंट मेरू संघामध्ये अनुभवी व नव्या दमाच्या गिर्यारोहकांचा मिलाफ आहे. हिमालयन माउंटनियरिंग इन्स्टिट्यूट, दार्जिलिंगचे माजी उपप्राचार्य, एअरफोर्स ऍडव्हेंचर विंगचे प्रमुख विंग कमांडर देवीदत्त पंडा, पाच अष्टहजारी शिखरांना गवसणी घालणारा आशिष माने, अन्नपूर्णा, कांचनजुंगा, च्यो ओयू सारख्या शिखरांवर चढाई करणारा डॉ. सुमित मांदळे, एव्हरेस्ट व कांचनजुंगा शिखर चढाई यशस्वी करणारा कृष्णा ढोकले, कांचनजुंगा, अमा दब्लम, माउंट मंदा शिखरांवर तिरंगा फडकविणारा विवेक शिवदे, माउंट मंदावर यशस्वी चढाई करणारा पवन हडोळे व निष्णात प्रस्तरारोहक व नवोदित गिर्यारोहक वरुण भागवत हे गिर्यारोहक माउंट मेरू शिखरावर चढाई करतील. सपोर्ट टीममध्ये अखिल काटकर याचा समावेश आहे. या मोहिमेविषयी बोलताना झिरपे म्हणाले, “गिरिप्रेमीच्या निष्णात गिर्यारोहकांनी २०१२ पासून ते २०२१ पर्यंत एव्हरेस्टपासून अन्नपूर्णापर्यंत आठ अष्टहजारी शिखरांना गवसणी घातली व आपली गुणवत्ता सिद्ध केली. अष्टहजारी शिखरांएवढीच भारतीय हिमालयातील अनेक शिखरे आव्हानात्मक आहेत. या शिखरांवर चढाई करून भारतीय गिर्यारोहण एका नव्या उंचीवर नेण्याचा गिरिप्रेमीचा मानस आहे. २०२१ साली माउंट मंदावर उत्तर धारेने भारतातून पहिल्यांदा यशस्वी चढाई करण्याचा मान गिरिप्रेमीने मिळविला. यावेळी देखील माउंट मेरूच्या अतिशय कठीण अशा नैऋत्य धारेने यशस्वी चढाई करणारा पहिला भारतीय संघ ठरेल, असा मला विश्वास आहे. माउंट मेरूच्या संघामध्ये गिरिप्रेमीचे अनुभवी गिर्यारोहक तर आहेतच, सोबतीला निष्णात गिर्यारोहक व हिमालयन माउंटनियरिंग इन्स्टिट्यूट, र्जिलिंगचे माजी उपप्राचार्य, एअरफोर्स ऍडव्हेंचर विंगचे प्रमुख विंग कमांडर देवीदत्त पंडा आमच्या संघामध्ये असणार आहेत, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. मोहीम खडतर आहे, म्हणूनच वर्षभर आधीपासून या मोहिमेच्या तयारी आम्ही लागलो आहोत. या वर्षभरात माउंट मेरू मोहिमेची तयारी म्हणून हिमालयात तसेच सह्याद्रीत सराव मोहिमा होणार आहेत.” माउंट मेरू ही मोहीम २०२३ मध्ये आयोजित असून या मोहिमेचा खर्च तब्बल ६० लक्ष रुपये इतका आहे, यासाठी मदतीचे आवाहन गिरिप्रेमीतर्फे करण्यात आले.

0 comments:

Post a Comment