Thursday, June 30, 2022

जगन्नाथ रथयात्रा महामहोत्सव पुण्यात दि. ३ जुलै रोजी

पुणे : ओडिसामधील जगन्नाथ पुरी येथील रथयात्रा यंदा आषाढ महिन्यात मोठया उत्साहात साजरी होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ - इस्कॉन, पुणे यांच्यातर्फे रविवार, दिनांक ३ जुलै रोजी दुपारी १२ वाजता जंगली महाराज रस्त्याजवळील हॉटेल सेंट्रल पार्क येथून आयोजित जगन्नाथ रथयात्रा सोहळ्याला प्रारंभ होणार आहे, अशी माहिती इस्कॉन पुणेचे श्वेतद्विप दास यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला अनंत गोप दास, रेवतिपती दास, नटवर दास आदी मान्यवर उपस्थित होते. जगन्नाथ पुरी येथे शतकानुशतके रथयात्रा काढली जाते. हा सोहळा साजरा करण्यासाठी जगन्नाथ पुरी येथे लाखो लोक जमतात. भगवान जगन्नाथ, भगवान बलराम आणि सुभद्रा लोकांना दर्शन, आशीर्वाद आणि कृपा देण्यासाठी रस्त्यावर येतात. परंतु जगन्नाथ पुरी येथे प्रत्येकजण वैयक्तिकरित्या जाऊ शकत नाही. त्यामुळे इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्रील भक्तीवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी भगवान जगन्नाथाची दया जगभर पसरवण्यासाठी रथयात्रा सुरू केली. रथयात्रेच्या दिवशी इस्कॉन कात्रज-कोंढवा रस्ता, पुणे मंदिरातील भगवान जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा यांच्या देवतांना खास दर्शनासाठी रथावर आणले जाते.

जगन्नाथ रथयात्रा महामहोत्सवाकरिता यावर्षी प.पू. लोकनाथ स्वामी महाराज, प.पू. भक्ती पुरुषोत्तम स्वामी महाराज उपस्थित राहणार आहेत. हॉटेल सेंट्रल पार्क येथे रविवारी दुपारी १२ वाजता मान्यवरांच्या हस्ते रथयात्रेचे उद््घाटन होणार आहे. त्यानंतर आरती होणार असून दुपारी १.३० वाजता रथयात्रेस प्रारंभ होईल. जंगली महाराज रस्ता, खंडुजीबाबा चौक, टिळक चौक, टिळक रस्ता, अभिनव महाविद्यालय चौक, बाजीराव रस्ता, शनिपार चौक, नगरकर तालीम चौक, लक्ष्मी रस्ता, शगुन चौक, रमणबाग शाळा, ओंकारेश्वर मंदिर, बालगंधर्व रंगमंदिर मार्गे हॉटेल सेंट्रल पार्क येथे रथयात्रेचा समारोप होणार आहे. ठिकठिकाणी या रथयात्रेचे स्वागत मोठया उत्साहात होणार असून यामध्ये अनेक संन्यासी व महापुरुष सहभागी होणार आहेत. सायंकाळी ७ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

रथयात्रेतील रथाची उंची २० फूट इतकी असून फुलांसह रंगीबेरंगी कापडांनी रथावर सजावट केली जाणार आहे. हा रथ इस्कॉनचे पदाधिकारी व भाविक ओढणार आहेत. संपूर्ण रथयात्रेदरम्यान तब्बल ६० हजार भाविकांना महाप्रसादाच्या पाकिटांचे वाटप आणि ८ ते १० हजार भक्तांना भोजन दिले जाणार असून हे यंदाचे वैशिष्टय आहे, तरी पुणेकरांनी मोठया संख्येने जगन्नाथ रथयात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

0 comments:

Post a Comment