एमआयटीत मंदिर-मस्जिद विवादावर महाचर्चा
4/5/2022
पुणेः भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. या देशात अनेक जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत. काही लोक आपल्या राजकीय स्वार्थासाठी धर्माधर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचे कार्य करत आहेत. हे भारतीय संस्कृती, परंपरा आणि विविधतेला अपायकारक आहे. देशात ९५ टक्के लोकांना शांतता हवी आहे, मात्र ५ टक्के लोक समाजिक आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचे कार्य करत असतात. त्यामुळे सामाजिक वातावरण बिघडत असून सर्वांनी एकत्र येऊन धार्मिक सलोखा निर्माण करण्याची गरज आहे, असे मत महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे (एम.सी.ई.) अध्यक्ष डॉ. पी. ए इनामदार यांनी व्यक्त केले.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत आणि महाराष्ट्र राज्य मुस्लिम बुद्धिजीवी मंच, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित काशी-बनारस, मथुरेच्या मंदिर मस्जिद विवादावरील महाचर्चेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी नालंदा विदयापीठाचे कुलगुरू आणि ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ पद्मभूषण प्रा. डॉ. विजय भटकर, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, विश्वशांती केंद्राचे सल्लागार व महाराष्ट्र राज्य मुस्लिम बुद्धीजीवी मंचचे अध्यक्ष डॉ. एस. एन. पठाण, चार्टड अकाऊटंट महेंद्र देवी, भारतरत्न मौलाना आझाद असोसिएशन, पुणेचे संस्थापक अध्यक्ष अनामत जाफर शेख, कोंढवा पुणे येथील समाजसेवक जाहिदभाई शेख, रफिक तांबोळी, मिर्झा अब्दुल, माजिद पैठणकर, मौलाना अहमद यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
डॉ. पी. ए इनामदार म्हणाले, धर्म जाती, पंथ यातून भारतीयांमध्ये फुट पडली आहे. ही अत्यंत क्लेषदायक बाब आहे. मंदिर - मस्जिदीच्या वादातून सर्व धर्मियांनी बाहेर पडावे. राजकीय हेतूने हे विषय पेटविले जात आहे. यातून जातीय ध्रुवीकरण केले जात असून निष्पाप नागरिकांना त्रास दिला जात आहे. प्रत्येक धर्माचे तत्वज्ञान उत्तम आहे. सर्व धर्म एकात्मतेची शिकवण देतात. आज सर्व धर्मांनी तत्वज्ञानाच्या गोष्टी कमी करून त्यातील विचारांवर अमंल करण्याची आवश्यकता आहे. शांततेसाठी दुसर्याचे ऐकून घेण्याची क्षमता विकसित करावी लागणार आहे. शांतीशिवाय विकास नाही. ईश्वर एकच असून त्यांचा संदेश ही एकच आहे.
डॉ. विजय भटकर म्हणाले, भारतात विविध जातीचे लोक राहत आहेत. पुन्हा राम मंदिर आणि बाबरी मस्जिदचा वाद देशाला परवडणारा नाही. विश्वशांतीसाठी सर्वांनी एकत्र यावे. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून मानवता कल्याण आणि सामाजिक बंधुता विचार शिकविला जात आहे. ही बाब प्रत्येक विद्यापीठांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवली पाहिजे. धार्मिक वादविवादावर मार्ग काढण्याची गरज असून तत्वज्ञानी आणि बुद्धिजीवी नागरिकांनी यासाठी पुढाकार घ्यावा. चांगल्या समाज निर्मितीसाठी शांती आणि धार्मिक सलोखा आवश्यक आहे.
डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, आयोध्येतील विवाद जमीन २.७० एकर वाद होता. हा सर्वाच्च न्यायालयाने मिटवला. राम मंदिराच्या निर्माणासाठीचे कार्य होत असतानाच मुस्लिम बांधवाच्या आस्थेसाठीही कार्य होत आहे. याचनुसार काशी आणि बनारसमधील मस्जिदांसाठी किमान ५ एकर जमीन सरकारने द्यावी. याने हिंदु- मुस्लिम धर्मातील वाद संपुष्टात येईल. वाद-विवाद करून समाजांमध्ये केवळ तेढ निर्माण होईल, मात्र एकत्र येऊन मार्ग काढल्याने वाद मिटेल. सर्वांनी एकत्र येऊन मानवता कल्याणाचे कार्य करावे. काशी, बनारस आणि मथुरा येथील मंदिर - मस्जिद वाद अयोध्येच्या निर्णयाचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन मिटवावा.
जाहिदभाई शेख म्हणाले, धार्मिक वाद मिटविण्यासाठी भारतातील मुस्लिम समाजाने शिक्षणाचा मार्ग स्वीकारावा. धर्मा-धर्मातील द्वेष्ट मिटविण्यासाठी शिक्षण ही महत्वाची भूमिका निभावेल. मुस्लिमांनी साक्षरतेसाठी पुढाकार घेऊन भारत निर्माणासाठी पुढे यावे.
महेंद्र देवी म्हणाले, शिक्षण ही वादातून मार्ग काढण्यासाठीची गुरूकिल्ली आहे. शांती आणि विवेकाने सर्व धर्मियांनी एकत्र राहून देशाला प्रगतीपथावर घेऊन जाण्याची गरज आहे.
डॉ. एस. एन. पठाण यांनी प्रस्ताविक केले.
0 comments:
Post a Comment