Sunday, April 10, 2022

परदेशातील चांगलेच ही भावना चुकीचीः डाॅ. पटवर्धन

11/4/2022

पुणे : सध्याच्या काळात असे वातावरण तयार झाले आहे की, परदेशातून येते ते चांगलेच. यामुळे  आपल्यामध्ये आपल्या गोष्टींविषयी कमीपणाची जाणीव निर्माण होते आहे. आपण आपली हजारो वर्षांची परंपरा विसरत चाललोय. परंतु आपण आपली परंपरा विसरून चालणार नाही. लोककला परंपरा आणि संस्कृती सबळ करण्याचे काम गणेशोत्सव मंडळांनी केले आहे आहे. बदलत्या काळानुसार बदललेले कार्यकर्ते बघून आनंद होतो. पुण्याचे सामाजिक नेतृत्व गणेश मंडळांनी केले आहे, असे गौरवोद्गार नॅकचे अध्यक्ष डाॅ.भूषण पटवर्धन यांनी काढले.

बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्ट तर्फे यंदाचा 'साई पुरस्कार' नॅकचे अध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांना प्रदान करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. निवृत्त एअर चीफ मार्शल भूषण गोखले, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, साईनाथ मंडळ ट्रस्टचे पियुष शहा,अमर राव, शंकर निंबाळकर, नरेंद्र व्यास, अमित दासानी, संकेत नंदकुमार ओव्हाळ,  राजू तापकीर, प्रसाद भोयरेकर यावेळी उपस्थित होते. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, फळांची परडी, शाल असे पुरस्कराचे स्वरूप होते. पुरस्काराचे यंदा १५ वे वर्ष होते.

डॉ. रामचंद्र देखणे म्हणाले, प्रभू श्रीराम हे सामाजिक जीवनाचा आदर्श आहेत त्याचप्रमाणे ज्ञान आणि विज्ञानाचे देखील ते आदर्श आहेत. ज्ञानाशिवाय जगण्याला अर्थ नाही. भारताला सामर्थ्यशाली बनवायचं असेल तर ज्ञानी व्हायला हवे. परंतु आजच्या शिक्षण संस्थामध्ये माहिती मिळते पण शिक्षण संस्थेतील जीवन संस्था हरविली आहे. भूषण गोखले यांनी देखील मनोगत व्यक्त केले. पराग ठाकूर यांनी सूत्रसंचालन केले. पियुष शहा यांनी आभार मानले.

0 comments:

Post a Comment