16/3/2022
पुणे: “विश्वशांती आणि मानव कल्याणासाठी विश्वशांती घुमट कार्य करीत आहे. त्यासाठी २०२३ मधील जी-२३ समिट भारतात घेण्याचा मानस आहे. भारत सरकारच्या सहकार्याने ही समिट विश्वशांती घुमटात आयोजित करण्याचा आमचा उद्देश आहे. जगात शांतीसाठी कार्य करणार्या या जी २३ देशाच्या समिट मधून संपूर्ण विश्वात शांतीचा संदेश पोहचविला जाईल,” असे विचार अमेरिकेचे स्पॅन कन्स्ट्रक्शन अँड इंजिनिअरिंगचे सीईओ किंग हुसेन यांनी व्यक्त केले.
राजबाग, लोणी काळभोर येथील ‘तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर-तुकाराम महाराज विश्व शांती प्रार्थना सभागृह व विश्व शांती ग्रंथालय’ या नावाने उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठ्या विश्वशांती घुमटाला अमेरिकेचे स्पॅन कन्स्ट्रक्शन अँड इंजिनिअरिंगचे सीईओ किंग हुसेन, डेअर टू ओव्हरकमचे जागतिक अध्यक्ष डॉ. ब्रेन जे. ग्रिम, जोसेफ स्मिथ आणि जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. अशोक जोशी यांनी भेट दिली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेला ते संबोधित करताना ते बोलत होते.
यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष डॉ. मंगेश तु. कराड आणि गप्पाष्टकार डॉ. संजय उपाध्ये उपस्थित होते.
किंग हुसैन म्हणाले,“शिक्षण संस्थेच्या माध्यमातून जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठीचे कार्य एमआयटी शिक्षण संस्था समूहाचे संस्थापक प्रा.डॉ. विश्वनाथ कराड करत आहेत. धर्म प्रसार हा विश्वशांतीच्या कार्यासाठी केला जावा. डॉ. कराड यांनी विश्वशांती आणि मानवकल्याणासाठी भारतातच नव्हे तर संपूर्ण जगासाठी या घुमटाच्या माध्यमातून संदेश देत आहेत. डॉ. ब्रेन ग्रिम यांच्या पुढाकाराने जी २३ समिट या विश्वशांती घुमटात होऊ शकेल.”
डॉ. ब्रेन जे. ग्रिम म्हणाले,“ विश्वशांतीसाठी शिक्षण, अध्यात्म आणि विज्ञान यांचे योगदान महत्वाचे आहे. तसेच, अध्यात्म आणि व्यवसायाच्या समन्वयातून जगात शांतता नांदेल. शांतता मिळाल्यानंतरच देशाची पर्यायाने जगाची अर्थव्यवस्था वाढेल. जागतिक स्तरावरील मोठ्या कंपन्या धर्मज्ञान आत्मसात करण्याच्या संधी देत आहेत. शांतता हेच सर्व धर्मांचे अंतिम ध्येय आहे. भारतामध्ये अशा प्रकारचे ज्ञान देण्याची पूर्ण क्षमता आहे. धर्माच्या विविधतेने नटलेला देश म्हणून भारताची जगामध्ये ओळख आहे. मानव कल्याणासाठी अध्यात्मासोबत विज्ञानाची सांगड घालावी.”
डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ या शतकात भारतमातेचे खरे स्वरूप जगसमोर येईल. त्याचेच एक पाऊल म्हणजे मानवकल्याण व विश्वशांती निर्मित हा घुमट आहे. या घुमटामध्ये जगात शांतीसाठी ज्यांनी कार्य केले आहे, त्यांचे पुतळे बसविण्यात येत आहेत. त्यातून त्यांचे विचार आणि आचरण जगासमोर येईल. त्यातच आता अमेरिकेतील धार्मिक गुरूंचा पुतळा उभारला जाणार आहे. समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षण, अध्यात्म आणि व्यवसाय गरजेचा आहे.”
डॉ. अशोक जोशी यांनी पाहूणांचा परिचय करून दिला.
0 comments:
Post a Comment