30/3/2022
पुणे : पुण्यातील
मेट्रोत पहिल्यांदाच पुस्तक प्रकाशनाचा सोहळा होत आहे. या घटनेची भविष्यात
निश्चितच नोंद घेतली जाईल, असा विश्वास व्यक्त करून बदलत्या काळानुसार
साहित्यिक, साहित्य संस्थांनी तंत्रस्नेही असणे गरजेच आहे, असे
प्रतिपादन 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष भारत सासणे
यांनी केले.
आयटी तज्ज्ञ डॉ.
दीपक शिकारपूर यांच्या ‘आपले डिजिटल जीवन’ या पुस्तकाचा
प्रकाशन सोहळा दिलीपराज प्रकाशनतर्फे आज (दि. 28 मार्च 2022) ‘मेट्रो साहित्य सफर’ या अनोख्या उपक्रमाअंतर्गत वनाज मेट्रो स्टेशन ते
गरवारे कॉलेज आणि पुन्हा वनाज मेट्रो स्टेशन या मार्गावर आयोजित करण्यात आला होता.
प्रत्यक्ष प्रकाशनाचा क्षण आयडियल कॉलनी स्टेशन येथे साधला गेला. त्या वेळी सासणे बोलत होते. आयटी तज्ज्ञ डॉ. दीपक
शिकारपूर, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा.
मिलिंद जोशी, प्रकाशक संघाचे अध्यक्ष आणि दिलीपराज प्रकाशनाचे
संचालक राजीव बर्वे, मीना सासणे आदी उपस्थित होते.
सासणे म्हणाले, मेट्रोमध्ये पुस्तक प्रकाशन करणे ही अभिनव कल्पना
आहे. तरुण पिढीच्या हाती सूत्रे येत आहेत, याचा
अर्थ असा आहे की, बदलत्या जगाला कवेत घेण्यासाठी लेखक, वाचक आणि प्रकाशक या सर्वांनीच काळानुसार
तंत्रस्नेही असणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने पावले उचलली गेली पाहिजेत. हे पहिलेच
पुस्तक आहे जे पुण्यातील मेट्रोत प्रकाशित होत आहे. लेखकाने अतिशय अभिनव पद्धतीने
पुस्तक प्रकाशन करण्यास परवानगी दिली याबद्दल मी लेखकाचे अभिनंदन करतो. भविष्यात
नाविन्यपूर्ण पद्धतीने पुस्तके प्रकाशित व्हावीत, अशी
इच्छा त्यांनी या वेळी व्यक्त केली.
प्रा. मिलिंद जोशी
म्हणाले, आपले जीवनच आता डिजिटल झाले आहे त्यामुळे साहित्य
क्षेत्राने सुद्धा बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे गरजेचे आहे. आपल्या भाषेचा
प्रचार आणि प्रसार होण्याच्या दृष्टीने बदलते तंत्रज्ञान अवगत असणे आवश्यक आहे.
तंत्रज्ञानाच्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर आपण हे लक्षात घेतले पाहिजे की, तंत्रज्ञान आणि तत्त्वज्ञान या दोन्ही गोष्टी
जगण्यासाठी महत्त्वाच्या आहेत. तंत्रज्ञान आधुनिक काळात सुसंगतपणे जगायला संधी
देते तर तत्त्वज्ञानामुळे तुमच्या जगण्याला अर्थ प्राप्त होतो. पुणे मेट्रोत
प्रकाशित झालेले पहिले पुस्तक म्हणून पुण्याच्या इतिहासात याची नक्कीच नोंद घेतली
जाईल, असा विश्वास जोशी यांनी व्यक्त केला. 12 कोटी
समूहाचे नेतृत्व करणार्या मराठी जनतेने तंत्रज्ञानाची कास धरणे गरजेचे आहे, असेही त्यांनी नमूद केले.
डॉ. दीपक शिकारपूर
म्हणाले, कोरोनामुळे आपल्या आयुष्यात अनेक बदल घडले असून
आपण आता डिजिटल पद्धतीचा अवलंब करीत आहोत. पुस्तकात अशा नवीन गोष्टी आहेत की, हे पुस्तक एकाच वेळी तीन माध्यमातून वाचकांपर्यंत
येत आहे. 125 पानांचे हे पुस्तक असले तरी डिजिटल स्वरूपात यात आठ टेराबाईटचा डेटा
उपलब्ध आहे. या पुस्तकाचे वैशिष्ट्य सांगताना ते म्हणाले, या पुस्तकातील प्रत्येक पानावर एक क्यूआर कोड
असून तो स्कॅन केल्यानंतर विस्तृत माहिती दृकश्राव्य माध्यमातून वाचकांपर्यंत
पोहोचते. पुस्तकाचा हा प्रयोग आणि प्रकाशन सोहळासुद्धा नाविन्यपूर्ण आहे.
0 comments:
Post a Comment