Friday, February 25, 2022

पुणे जिल्ह्यातील साहसवीरांचा विशेष सन्मान

25/2/2022

पुणे - अग्रगण्य गिर्यारोहण संस्था असलेल्या गिरिप्रेमी व पुणे डिस्ट्रिक्ट माउंटनियरींग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्ह्यातील साहसवीरांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी शिवदुर्ग मित्र संस्था लोणावळा, आशिष कसोदेकर, ऍड. मारुती गोळे, धिरेन गुप्ते यांचा त्यांनी विविध क्षेत्रात बजावलेल्या साहसी कामगिरी निमित्त सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक-अध्यक्ष प्रो. डॉ. संजय चोरडिया, अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे कार्यकारी अध्यक्ष ह्रिषीकेश यादव व दार्जिलिंग येथील निष्णात गिर्यारोहक मिंगमा शेर्पा  प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. भांडारकर प्रचिविद्या संस्थेच्या सभागृहात सन्मान सोहळा पार पडला.

६१ दिवसांत ६१ मॅरेथॉन पूर्ण करून गिनीच बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदविणारे आशिष कसोदेकर, जिंजी ते सिंहगड हे ११०० किलोमीटर अंतर २७ दिवसांत पूर्ण करणारे ऍड. मारुती गोळे, वयाच्या ५६ व्या वर्षी २३ दिवसांत ६३८ किलोमीटर अंतराचा ट्रान्ससह्याद्री ट्रेक पूर्ण करणारे धिरेन गुप्ते व त्यांचे सोबती संजय मेहता व शरद डुंबरे, शोशाला या हिमालयातील शिखरावर भारतातील पहिली रॉक क्लायम्बिंग मोहीम यशस्वी करणारी संस्था शिवदुर्ग मित्र लोणावळा यांचा त्यांनी दाखविलेल्या अतुलनीय साहसाबद्दल गौरव करण्यात आला. सोबत फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ढाक बहिरी या किल्ल्यावर घडलेल्या अपघाताच्यावेळी फर्स्ट रीस्पॉण्डर म्हणून महत्वाची कामगिरी बजावणारे भरत रायकर व तुषार महाडिक यांचा देखील सन्मान करण्यात आला.

याचसोबत पाच वेळा माउंट एव्हरेस्ट चढाई यशस्वी करणारे मिंगमा शेर्पा यांना गिरिप्रेमी संस्थेचे मानद सदस्यत्व प्रदान करण्यात आले. सन्मान स्वीकारताना केलेल्या मनोगतामध्ये मिंगमा म्हणाले, “गिरिप्रेमी हा माझ्यासाठी परिवारच आहे. संस्थेचे मानद सदस्यत्व स्वीकारताना मला अतिशय आनंद होत असून हा ऋणानुबंध असाच दृढ होत जावा हीच माझी इच्छा आहे.अतिशय हलाखीच्या परिस्थतीतून मार्ग काढत गिर्यारोहण क्षेत्रात नाम कमाविलेल्या मिंगमा यांनी तरुण गिर्यारोहकांना गिर्यारोहण प्रशिक्षण घेऊन, भरपूर सराव व तयारी करून प्रत्यक्ष शिखरांवर मोहीम करावी, असा प्रेमळ सल्ला देखील दिला.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. चोरडिया म्हणाले, “सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे ध्येय हे सर्वांसाठी शिक्षणअसे आहे तर गिरिप्रेमी- GGIM यांचे ध्येय हे सर्वांसाठी साहसअसे आहे. त्यामुळे आपला मार्ग एकच आहे. शिक्षणाप्रमाणेच साहसांतून देखील आपल्या देशाचे नाव उज्वल करता येते हेच सर्व साहसवीर दाखवून देत आहेत.यावेळी प्रो. डॉ. चोरडिया यांनी गिर्यारोहक किंवा गिर्यारोहकाच्या परिवारातील २५ विद्यार्थी- विद्यार्थिनींचे दरवर्षी शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्याचे जाहीर केले. नर्सरी पासून पीएचडी पर्यंत संपूर्ण शिक्षाणाची जबाबदारी सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट घेणार आहे. साहस करणाऱ्या व्यक्ती किंवा त्यांच्या परिवारातील कोणताही सदस्य पैशांअभावी उच्च व दर्जेदार शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी सूर्यदत्ता संस्थेचे प्रयत्न आहेत, असे डॉ. चोरडिया यांनी नमूद केले.

यादव म्हणाले, “आज सन्मानित करण्यात आलेल्या साहसवीरांमुळे साहसी क्षेत्राला प्रोत्साहन मिळेल, असे मला वाटते. हिमालयातील अतिउंचीवरील रॉक फेसेसवर चढाई मोहीम आखणे, वयाच्या पन्नाशीनंतर स्वतःला आव्हान देऊन दीर्घ पल्ल्याचे ट्रेक यशस्वी करणे, शिवाजी महाराजांचा वारसा साहसातून पुढे घेऊन जाणे किंवा मॅरेथॉन धावण्याचा विश्वविक्रम करणे यांतून साहसाचे महत्व या सर्वांनी अधोरेखित केले आहे.याचसोबत संस्थात्मक गिर्यारोहण, साहसी क्रीडा या जपल्या व वाढल्या पाहिजेत, असे देखील मत ह्रिषीकेश यादव यांनी व्यक्त केले.

सन्मानार्थींपैकी धिरेन गुप्ते यांनी प्रातिनिधिक स्वरूपात सर्वांच्या वतीने मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, “साहसातून तुमच्यातील शारीरिक, मानसिक व भावनिक क्षमतांचा कस पाहिला जातो. जेव्हा तुम्ही या सर्व पातळ्यांवर उत्तम कामगिरी करता तेव्हा लाभणारे समाधान शब्दातीत आहे.याचसोबत भरत रायकर यांनी अपघात झाल्यानंतर बचाव कार्य कसे पार पडले, याचे कथन केले. गिरिप्रेमीचे कार्यवाह व निष्णात गिर्यारोहक विवेक शिवदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. गिरिप्रेमीचा तरुण गिर्यारोहक निकुंज शाह याने आभार व्यक्त केले. कार्यक्रमाला गिरिप्रेमीचे संस्थापक सदस्य आनंद पाळंदे, गिरिप्रेमीच्या अष्टहजारी मोहिमांचे नेते उमेश झिरपे, गिरिप्रेमीचे उपाध्यक्ष चंदन चव्हाण व पुणे डिस्ट्रिक्ट माऊंटनियरिंग असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अविनाश कांदेकर उपस्थित होते. कोरोना नियमांचे पालन करून मर्यादित साहसप्रेमींच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला.

0 comments:

Post a Comment