Wednesday, February 16, 2022

प्रत्येकाला गुरुतत्त्वाकडून शब्दाविना मार्गदर्शन: सरदार

17/2/2022

पुणे: गुरुतत्त्व मानवासह सर्वच जीवजंतू-प्राणिमात्र यांना मार्गदर्शन करते. प्रत्येकात गुरुतत्त्व असून ते शब्दाविना मार्गदर्शन करते. जेव्हा भाषा-शब्द थांबतात, तेव्हा गुरुतत्त्वाचे मार्गदर्शन ऐकू येते. कोणाचेही शोषण न करता आनंदाची देवाण-घेवाण करत आनंद उपभोगणे ही गुरुतत्त्वाची शिकवण आहे. मानवी गुरूचे मोठेपण आहे पण त्याला मर्यादा आहेत, कारण मानवी गुरू फक्त मानवाला मार्गदर्शन करतो, परंतु गुरुतत्त्व जीवसृष्टीतील प्रत्येकाला मार्गदर्शन करते, असे प्रतिपादन गुरुतत्त्वयोग प्रणालीचे प्रणेते अभयकुमार सरदार यांनी केले.

 

गुरुतत्त्वयोग संस्थेच्या 24व्या वर्धापन दिनानिमित्त संस्थेच्या ध्यानमंदिरात
आयोजित कार्यक्रमात अभयकुमार सरदार गुरुतत्त्वाविषयी साधकांशी संवाद साधताना बोलत होते. ते पुढे म्हणाले
, “गुरुतत्त्वाकडून होणारे मार्गदर्शन परिपूर्ण असते, त्यात कुठलीही चूक नसते. गुरुतत्त्वाचे मार्गदर्शन स्वीकारण्यासाठी सहजसाक्षीभावात राहणे गरजेचे आहे. गुरुतत्त्वाकडून मिळणारे मार्गदर्शन स्वीकारण्याची क्षमता मानवाने स्वत:त निर्माण करणे आवश्यक आहे. गुरुतत्त्व तत्त्वज्ञानानुसार प्रत्यक्ष अनुभूती घेणे गरजचे आहे. गुरुतत्त्व प्रत्येकात आहे; मीत्त्व विरघळले की शिल्लक राहते ते गुरुतत्त्व. गुरुतत्त्व हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे. अनुभूती हेच सत्य आहे. गुरुतत्त्वाशी सुसंवाद साधणे महत्त्वाचे आहे.”

 

गुरुतत्त्ववेध स्मरणिकेचे प्रकाशन अभयकुमार सरदार, तेजा दिवाण, योगशिक्षक नरेंद्र मराठे आणि नीलिमा साठे यांच्या हस्ते झाले. योगशिक्षक नरेंद्र मराठे आणि नीलिमा साठे यांचा सत्कार अभयकुमार सरदार यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजा दिवाण यांनी केले.

 

बायोमिमिक्री : निसर्गाचे अनुकरण

वर्धापन दिनानिमित्त बायोमिमिक्री या विषयावर प्रदर्शन भरविण्यात आले आहे. बायोमिमिक्री हा संशोधनाचा एक दृष्टिकोन आहे, ज्यात माणसापुढील आव्हानांना निसर्गातील रचनांचे आणि प्रणालीचे अनुकरण केले जाऊन उपाय शोधला जातो. निसर्गाकडून प्रेरणा घेऊन आजपर्यंत मानवाने अनेक गोष्टींचे शोध लावले आणि निर्मिती केली. कुठली गोष्ट कार्यक्षम आहे आणि कुठली नाही हे निसर्गाला माहीत आहे.

 

उत्क्रांती हा निसर्गाचा नियम आहे; त्यामुळे श्रेष्ठ निर्मिती टिकून राहते. आपल्याला निसर्गातील गुरूंकडून शिकण्याची गरज आहे. कुठल्याही समस्येला शून्यातून उत्तर शोधण्याआधी हा विचार केला पाहिजे की, हा प्रश्न निसर्गाने कसा सोडवला असता; कारण निसर्गाचे उत्तर, उपाय हा सदैव शाश्वत असतो. हीच जगण्याची गुरुकिल्ली असल्याचे प्रदर्शनातून दर्शविण्यात आले आहे.

 

0 comments:

Post a Comment