पुणे : नावीन्यपूर्ण आणि भावपूर्ण चालींचा साज असलेले ‘ऋतुराज आज वनी आला’, ‘मानिनी सोड तुझा अभिमान’, ‘अंग अंग तव अनंग’, ‘आली प्रणय चंद्रिका करी’ अशी एकाहून एक सरस नाट्यपदे आणि गझल गायकीच्या अंगाने सादर केलेले ‘ये मौसम है रंगीन’ला रसिकांची उस्फूर्त भरभरून मिळालेली टाळ्यांची दाद अन् वन्समोअरने नव्या संचात आलेल्या संगीत ‘मदनाची मंजिरी’ या नाटकाचे रसिकांनी स्वागत करून पसंतीची मोहोर उमटविली.
पुण्यातील कलाद्वयी या संस्थेतर्फे कै. विद्याधर गोखले लिखित संगीत ‘मदनाची मंजिरी’ या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित करण्यात आला होता. संगीत रंगभूमीच्या दुसर्या सुवर्णकाळातील म्हणजे 1960च्या दशकातील हे नाटक असून प्रदीर्घ कालखंडानंतर नव्या संचात रंगभूमीवर आले आहे. तरुणपणी या नाटकात भूमिका साकारलेल्या सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री मधुवंती दांडेकर यांनी या कलाकृतीसाठी दिग्दर्शन आणि संगीत मार्गदर्शन केले आहे, हे आणखी एक वैशिष्ट्य!
ज्या काळात संगीत नाटकाविषयीची रुची कमी होऊ लागली होती त्या काळात विद्याधर गोखले यांनी पौराणिक, सामाजिक, मध्ययुगीन कालखंडावर आधारित लिहिलेल्या नाटकांमुळे प्रेक्षक पुन्हा एकदा संगीत रंगभूमीकडे वळू लागले. त्यातीलच ‘मदनाची मंजिरी’ हे भक्ती, हास्य आणि श्रृंगाररसाने नटलेले नाट्य आहे. महाकवी शेक्सपिअरच्या ‘ट्वेल्थ नाईट’ या प्रसिद्ध कलाकृतीवर ‘मदनाची मंजिरी’ ही नाट्यकलाकृती आधारित आहे.
या नाटकातील पदे आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवित असल्याचे या शुभारंभाच्या प्रयोगाच्या निमित्ताने अनुभवायला मिळाले. कलाकारांच्या प्रभावी सादरीकरणातून प्रयोग जसजसा रंगू लागला तसतसे ज्येष्ठ रसिक गतस्मृतीत रममाण झाले आणि कथानकानंतर आता पुढील पद कुठले हे ओळखून उस्फूर्तपणे दाद देऊ लागले. संगीत नाटक म्हटले की पौराणिक, ऐतिहासिक नाटक असावे असा विचार मनात येतो पण हलक्या-फुलक्या विषयावरील या नाट्यकलाकृतीचा आनंद युवा वर्गानेही घेत पसंतीची पावती दिली.
प्रयोगात पुण्यातील आघाडीचे कलाकार चिन्मय जोगळेकर, अस्मिता चिंचाळकर, सावनी दातार-कुलकर्णी, संजय गोसावी, मंगेश चिंचाळकर, ओंकार खाडिलकर, सयाजी शेंडकर, निरंजन कुलकर्णी, अर्चना साने यांनी भूमिका साकारल्या तर नाट्यसंगीताचा बाज पुरेपूर माहिती असलेले संजय गोगटे (ऑर्गन) आणि विद्यानंद देशपांडे (तबला), प्रमोद जांभेकर (व्हायोलिन) यांनी साथसंगत केली.
0 comments:
Post a Comment