Wednesday, December 1, 2021

संगीत मदनाची मंजिरी लवकरच रसिकांच्या भेटीला

१/१२/२०२१

पुणे : संगीत नाटक आणि नाट्यसंगीताच्या प्रचार आणि प्रसाराचा वसा हाती घेतलेल्या ‘कलाद्वयी’ या नाट्यसंस्थेतर्फे सुप्रसिद्ध नाटककार विद्याधर गोखले लिखित संगीत ‘मदनाची मंजिरी’ ही नाट्यकलाकृती रसिकांच्या भेटीला येत आहे. संगीत रंगभूमीच्या दुसर्‍या सुवर्णकाळातील म्हणजे 1960च्या दशकातील हे नाटक असून प्रदीर्घ कालखंडानंतर नव्या संचात रंगभूमीवर पहायला मिळणार आहे. तरुणपणी या नाटकात भूमिका साकारलेल्या ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री मधुवंती दांडेकर संगीत मार्गदर्शक आणि दिग्दर्शकाच्या भूमिकेत आहेत, हे या कलाकृतीचे आणखी एक वैशिष्ट्य! पुण्यातील ‘कलाद्वयी’ नाट्यसंस्थेच्या वतीने ही नाट्यकृती प्रथमच रंगमंचावर साकारली जात आहे.

ज्येष्ठ ऑर्गनवादक संजय गोगटे आणि तबला वादक विद्यानंद देशपांडे यांनी 15 वर्षांपूर्वी ‘कलाद्वयी’ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर ज्येष्ठ गायिका-अभिनेत्री वर्षा जोगळेकर, गायिका-अभिनेत्री अस्मिता चिंचाळकर आणि अभिनेते संजय गोसावी हे ‘कलाद्वयी’शी जोडले गेले. ‘सौभद्र’, ‘मानापमान’, ‘संशय कल्लोळ’, ‘स्वयंवर’ या नाटकांची निर्मिती संस्थेतर्फे करण्यात आली आहे. 


महाकवी शेक्सपिअरच्या ‘ट्वेल्थ नाईट’ या प्रसिद्ध नाट्यावर ‘मदनाची मंजिरी’ ही नाट्यकृती आधारित असून या प्रहसनात्मक संगीत नाटकाचा प्रयोग शनिवार, दि. 4 डिसेंबर 2021 रोजी सायंकाळी 5 वाजता बालगंधर्व रंगमंदिरात होणार असल्याची माहिती मधुवंती दांडेकर आणि संस्थेच्या विश्वस्त वर्षा जोगळेकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या वेळी गायक अभिनेत्री अस्मिता चिंचाळकर, संस्थेचे विश्वस्त संजय गोगटे, विद्यानंद देशपांडे, संजय गोसावी उपस्थित होते.

संगीत नाटकाविषयीची रुची कमी होऊ लागली होती त्या काळात विद्याधर गोखले यांनी पौराणिक, सामाजिक, मध्ययुगीन कालखंडावर आधारित लिहिलेल्या नाटकांमुळे प्रेक्षक पुन्हा एकदा संगीत रंगभूमीकडे वळू लागला. त्यातीलच ‘मदनाची मंजिरी’ हे भक्ती, हास्य आणि श्रृंगाररसाने नटलेले नाटक. त्याकाळी चार-साडेचार तास चालणारे नाटक आजच्या काळातील प्रेक्षकांचा विचार करून अडीच तासाची कालमर्यादा निश्चित करून रंगभूमीवर आणण्यात येत आहे.

‘ऋतुराज आज वनी आला’, ‘मजला कुठे न थारा’, ‘मानिनी सोड तुझा अभिमान’, ‘अंग अंग तव अनंग’, ‘तारिल तुज अंबिका’, ‘आली प्रणय चंद्रिका करी’ ही नाट्यपदे आणि गझल गायकीच्या अंगाने सादर होणारे ‘ये मौसम है रंगीन’ हे पद आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवित असून नाट्यप्रयोगाच्या निमित्ताने प्रत्यक्ष रंगमंचावर कलाकारांकडून ऐकायला मिळणार आहेत. शास्त्रीय संगीतावर आधारित पण त्या-त्या व्यक्तिरेखेचा विचार करून सुप्रसिद्ध संगीतकार, ऑर्गनवादक प्रभाकर भालेकर यांनी नाविन्यपूर्ण व भावपूर्ण चाली नाटकातील पदांना दिल्या आहेत. तसेच सुप्रसिद्ध गायक-अभिनेते पंडित राम मराठे यांनी चाली दिल्या आहेत.

मधुवंती दांडेकर यांनी मंजिरी आणि लिलावती उर्फ लिलाधर या दोन्ही प्रमुख भूमिका साकारलेल्या आहेत. नव्या कलाकारांच्या संचात हे नाटक रंगमंचावर येत असून दिग्दर्शन आणि संगीत मार्गदर्शकाची जबाबदारी दांडेकर यांनी स्वीकारली आहे. या विषयी बोलताना त्या म्हणाल्या, गुरुंकडून मिळालेल्या अभिनय आणि गायनाचा ठेवा नवीन कलाकारांकडे देताना निश्चितच आनंद होत आहे. पुन्हा एकदा वेगळ्या दृष्टीने नाटकाकडे पाहता येत आहे. या नाटकात भूमिका करणारे कलाकार लोकप्रिय आहेत, आवडीने शिकत आहेत ही समाधानाची बाब असून हे कलाकार रसिकांच्या अपेक्षा नक्कीच पूर्ण करतील असा विश्वास आहे. 

नाट्यगृहाच्या क्षमतेच्या 50 टक्के उपस्थितीचे बंधन असले तरी शुभारंभाच्या प्रयोगाचे प्रवेश मूल्य नाममात्र ठेवण्यात आले असल्याचे या नाटकाच्या निर्मितीची बाजू सांभाळणार्‍या वर्षा जोगळेकर, मधुवंती दांडेकर आणि कलाद्वयीच्या विश्वस्तांनी सांगितले.

0 comments:

Post a Comment