Monday, November 22, 2021

प्रगतीमध्ये संस्थांनी सभासदांनाही हिस्सा द्यावा: अनास्कर

पुणे : संस्थेच्या आर्थिक वाढीमध्ये आर्थिक उलाढालीमध्ये सभासदाचा देखील तेवढाच हक्क आणि हिस्सा असतो. पुढच्या काळात अकाउंटिंग पद्धतीमध्ये थोडासा बदल करून आपल्या नफ्यातील थोडासा लाभांश सभासदांना वाटप करताना, त्याही पुढे जाऊन त्यातील काही हिस्सा सभासदांच्या शेअर्समध्ये त्यांचे मूल्य वाढविण्याकरिता वापरला, तर आपल्या सभासदांचे शेअर्स  मूल्य वाढत राहील आणि सहकार क्षेत्राबद्दल लोकांना आकर्षण वाटेल, असे मत महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी व्यक्त केले.

पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन यांच्या वतीने पुणे जिल्हयातील ५० नागरी सहकारी बँकांमध्ये सहकार सप्ताह साजरा करण्यात आला. सहकाराची बलस्थाने सर्वसामान्यांसमोर मांडणे ही संकल्पना घेऊन सहकार सप्ताह साजरा झाला. सप्ताहामध्ये महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांचे सहकारातून समृद्धीकडे या विषयावर व्याख्यान झाले. असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. सुभाष मोहिते, मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर जेरे यांसह असोसिएशनचे संचालक व पदाधिकारी यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

विद्याधर अनास्कर  म्हणाले, सभासद हा सहकाराचा मूळ गाभा आहे. सभासद हा सहकारी संस्थेच्या मागे ठामपणे उभा राहिला, तर जगातली कुठलीही ताकद सहकार संस्थेला संपवू शकत नाही. समान गरज असणारी लोक एकत्र येतात म्हणजे सहकार आणि आपली गरज भागवून घेतात, यालाच सहकार असे म्हणतात. त्याच सोबतच प्रत्येकाची समृद्धी देखील सहकारामध्ये अपेक्षित आहे, असेही त्यांनी सांगितले.

व्याख्यानमालेत रिझर्व बँकेचे जनरल मॅनेजर डॉ. अमित कुमार यांचे 'नियंत्रकांच्या सहकारी बँकांकडून अपेक्षा' या विषयावर व्याख्यान झाले. तसेच चार्टर्ड अकाउंटंट माधव ऊर्फ अभय माटे, चार्टर्ड अकाउंटंट डॉ. दिलीप सातभाई, संगणक तज्ञ विजय भालेराव, बँकिंग तज्ञ विक्रांत पोंक्षे यांची व्याख्याने झाली.

असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. सुभाष मोहिते यांनी सदर सहकार सप्ताह साजरा करण्यासाठी बँकांचे संचालक, अधिकारी, सेवक वर्ग व ग्राहक यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले. सहकारी बँक या सर्वसामान्य माणसांनी काढलेल्या बँका आहेत, त्यामुळे त्या सर्वसामान्य व्यक्तींच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवीत आहेत व घडविलेला आहे. त्यामुळे आपुलकीची भावना निर्माण करणा-या सहकारी बँकांबरोबरच व्यवहार करावेत असे आवाहन त्यांनी केले.

सहकाराची सकारात्मक बाजू व बलस्थाने सामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व सहकारी बँका एकत्रित येऊन हा सहकार सप्ताह वेगळ्या पद्धतीने साजरा केला. सप्ताहांतर्गत प्रत्येक नागरी सहकारी बँकेच्या मुख्य कचेरीवर सहकाराचा ध्वज लावणे, सहकाराची बलस्थाने मांडणारा फलक प्रत्येक बँकेच्या शाखेसमोर लावणे, सहकार दिनाच्या दिवशी व त्यानंतर दररोज ५० लाख खातेदारांना शुभेच्छा संदेश पाठविणे असे विविध कार्यक्रम पुणे जिल्हयातील ५० नागरी सहकारी बँकांमध्ये आयोजित करण्यात आले होते.

0 comments:

Post a Comment