Friday, October 8, 2021

भारतीय कला, लोककलांना समृद्ध परंपरा: उल्हास पवार,

पुणेः भारतीय अभिजात शास्त्रीय संगीत असो की, भारतीय लोककला, साहित्य. यांना आपल्या भारतात मोठी समृद्ध परंपरा असून आज श्री लक्ष्मी माता जीवन गौरव पुरस्काराने  सन्मानीत करण्यात आलेले हे मान्यवर कला, संस्कृती आणि साहित्याची परंपरा एका पिढीकडून पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविणारे दूत आहेत, असे विचार माजी आमदार आणि ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत उल्हासदादा पवार यांनी व्यक्त केले.  

पुणे नवरात्र महोत्सवा अंतर्गत प्रतिवर्षी देण्यात येणा-या श्री लक्ष्मी माता जीवन गौरव पुरस्काराने आज यंदा बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित डॉ. रेवा नातू आणि निर्मला गोगटे, ज्येष्ठ संपादक यमाजी मालकर, वेदमूर्ती श्रीकांत दंडवते गुरुजी आणि लावणी लोककलावंत पूनम कुडाळकर यांना सन्मानित करण्यात आले. देवीची प्रतिमा, सन्मानचिन्ह, शाल श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत उल्हास पवार यांच्या हस्ते पत्रकार भवन येथे झालेल्या कार्यक्रमात हे पुरस्कार वितरीत करण्यात आले.

यावेळी पुणे नवरात्राै महोत्सवाचे संस्थापक-आयोजक आबा बागूल, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर  व्यासपीठावर  मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी पुणे नवरात्राै महोत्सवाचा गेल्या सत्तावीस वर्षांचा आढावा घेणारी चित्रफित दाखविण्यात आली.

पवार म्हणाले, संगीत रंगभूमीवर ज्यावेळी संगीत नाटके सादर व्हायचे त्यावेळी रात्र रात्र नाटकाचे प्रयोग चालायचे.मराठी संगीत नाटकांची परंपरा अतिशय उज्ज्वल आहे. त्या काळात बालगंधर्वांच्या बरोबर निर्मलाताई गोगटे यांनी पहिल्यांदा काम केले. महिलांनी नाटकात काम करण्याविषयी व्दिधा मनःस्थिती असतानाच्या काळात कमलाताई गोखले यांनी ही कोंडी फोडली. विष्णूदास भावे यांच्यापासून गोविंद बल्लाळ देवल अशा सगळ्यांनीच संगीत रंगभूमीला दिलेले योगदान अनमोल आहे. संगीत नाट्य रंगभूमी बरोबर तमाशा या लोककला प्रकाराला देखील दीर्घ परंपरा लाभलेली आहे. या कलेला आपण कोणत्या दृष्टीकोनातून पाहतो, ते महत्त्वाचे आहे. तमाशामध्ये परिपूर्ण नऊवारी साडी नेसून लावणी सादर केली जाते, यातूनच त्याच्या संस्कृतीचे दर्शन घडते. कौसल्याबाई कोपरगांवर, राधाबाई बुधगावकर यांच्यापासून यमुानाबई वाईकरांपर्यंची तमाशाची दीर्घ परंपरा आहे. यमुनाबाई बाईकर यांची बैठकीची लावणी म्हणजे तर मुद्रा अभिनयाचा उत्कृष्ट नमुना म्हणावा लागेल. भारत सरकारने लावणी गायिका यमुनाबाई वाईकर यांना पद्मश्री  पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला, ही कलारसिक म्हणून आपल्यासाठी अतिशय अभिमानाची बाब आहे.

पुरस्कार्थी  निर्मला गोगटे म्हणाल्या, हा पुरस्कार मी माझ्या उत्तर आयुष्यातला देवीचा आशीर्वाद मानते. मी स्वतः स्त्रीवादी मनोभूमिका बाळगून आहे. स्त्रियांमध्ये जन्मतःच ऊर्जा आणि चातुर्य दडलेले असते. स्त्री शक्ती ही अफाट असते. तिची ओळख सर्वांना होणे, हे देखील अवघड आहे. पुरस्कार्थी डॉ. रेवा नातू म्हणाल्या की, पुरस्कार ऊर्जा देत असतो. तो केवळ आतापर्यंत केलेल्या कामगिरीचा गौरव नसतो, तर पुढे असेच सातत्याने काम करण्याच्या जबाबदारीची आठवण तो करून देत असतो. 

पुरस्कारार्थी लावणी लोककलावंत पूनम कुडाळकर म्हणाल्या की, एवढ्या लहान वयात मला हा पुरस्कार मिळाला याबद्दल मी पुणे नवरात्रमहोत्सवाचे संस्थापक-आयोजक आबा बागूल आणि पुरस्कार समितीचे आभार मानते. पुरस्कारार्थी ज्येष्ठ संपादक यमाजी मालकर आणि वेदमूर्ती श्रीकांत दंडवते गुरुजी यांनी देखील मनोगत व्यक्त केले. यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी मनोगत व्यक्त करतांना नवरात्रौ महोत्सवाच्या दीर्घ परंपरेविषयी आनंद आणि अभिमान व्यक्त केला. 

पुणे नवरात्राै महोत्सवाचे अध्यक्ष आबा बागूल यांनी प्रास्ताविक केले. स्नेहल दामले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. घनःश्याम सावंत यांनी आभार मानले.

0 comments:

Post a Comment