Wednesday, October 6, 2021

अध्यात्म-विज्ञानाच्या एकीतून शांती शक्य: डॉ. ज्ञानवत्सल

7/11/2021

पुणे: “विज्ञानाने किती ही प्रगती केली, तरी अध्यात्माशिवाय ते पूर्ण होवूच शकत नाही. अशावेळेस विज्ञान आणि अध्यात्माच्या एकत्रिकरणाच्या माध्यमातून येणार्‍या पिढीला नवे शिक्षण देणे ही काळाची गरज आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने मानवाची प्रगती केली पण त्याचा विवेक संपत चालला आहे. त्यामुळे विज्ञानासोबतच अध्यात्माचे ज्ञान दिल्यास विश्‍वात शांती नांदेल.” असे विचार स्वामी नारायण मंदिराचे परमपूज्य डॉ. स्वामी ज्ञानवत्सल यांनी व्यक्त केले.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेतर्फे जागतिक विज्ञान, धर्म आणि तत्त्वज्ञानावर आधारित ७व्या वर्ल्ड पार्लमेंटच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होत्या. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड हे होते.

यावेळी नॅशनल गांधी म्युझियम व लायब्ररीचे संचालक ए. अण्णामलाई, टेक्सास येथील डॉ. सुशील शर्मा, एम्सचे प्राध्यापक डॉ. रमा जयसुंदर, सुप्रसिद्ध विचारवंत डॉ.शेषाद्री चारी, युआरआयचे महासंचालक डॉ. अब्राहम कारिकम आणि जगप्रसिद्ध संगणक तज्ज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्‍वनाथ कराड, प्रभारी कुलगुरू प्रा.डॉ.आर.एम.चिटणीस, प्र कुलगुरू प्रा.डॉ. मिलिंद पांडे, पीस स्टडीचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मिलिंद पात्रे, प्रा. परिमल माया सुधाकर व माजी कुलगुरू डॉ. एस.एन. पठाण हे उपस्थित होते.

परमपूज्य डॉ. स्वामी ज्ञानवत्सल म्हणाले,“आजच्या युगात असे शिक्षण हवे, की जे प्रत्येकाच्या हदयाला भिडले पाहिजे. सध्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा अभाव दिसून येतो. त्यामुळे मानवता लुप्त होत आहे. अशा काळात मूल्याधिष्ठित शिक्षणाची गरज आहे."

ए.अण्णामलाई म्हणाले,“राष्ट्रपिता महत्मा गांधी यांनी कधीही नवीन तंत्रज्ञानाचा विरोध केला नाही. इंग्लंडमध्ये टेक्सटाईलचा शोध लागला तेव्हा त्यांनी देशात चरखा चालवा हा मंत्र दिला. ते सदैव शरीराबरोबरच आत्म परीक्षण करायचे. त्यांनी शारीरिक आरोग्याबद्दल खूप काळजी घेतली होती. साधी राहणी व उच्च  विचारसरणीचा अवलंब त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात केला. गांधीजींनी मानवता धर्माचा पुरस्कार करून  पाळत असे. सर्वोदय नुसार देशातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत सर्वांच्या कल्याणाचा विचार केला. मानवाने धर्म आणि अध्यात्माच्या आधारावरच चालावे.”

डॉ. शेषाद्री चारी म्हणाले,“आजच्या युगात चार तत्वांवर कार्य होणे गरजचे आहे. त्यात शांततेची संस्कृती, वैश्‍विक मूल्याधिष्ठित शिक्षण, विज्ञान आणि अधात्म आणि समग्र विश्‍व शांतीचा समावेश आहे. एमआयटी विद्यापीठ याच तत्वाचा धागा पकडून कार्य करीत आहेत. जागतिक शांततेसाठी जीवनमूल्य समजणे गरजेचे आहे. धर्म म्हणजे धारणा होय. आज संस्कृती आणि सभ्यता या दोन्हीं तत्वांचा भेद समजून घ्यावा. धर्म हे जीवनमूल्य आहे, तसेच मूल्यवर्धित शिक्षण देतांना प्रत्येक विषयातील मूल्यांचे शिक्षण शिकविणे गरजेचे आहे.


डॉ. विजय भटकर म्हणाले,“अर्धवट ज्ञान हे सर्वांसाठी घातक आहे. शहाणपण, ज्ञान आणि अनुभूती यातून चांगले जग निर्माण करता येईल. मानवाचे जीवनमान उंचविण्यासाठी ऋषि आणि शास्त्रज्ञांनी एकत्रित येऊन कार्य करण्याची गरज आहे. मानवाने सत्याचा स्वभाव समजून घ्यावा. तसेच प्रकृतीचे रहस्य याबद्दल आत्मियता बागळावी.”

डॉ.रमा जयासुंदर म्हणाल्या,“अध्यात्म हा विज्ञानाचा आत्मा आहे. विज्ञान आणि अध्यात्मामधील संबंध हा अतिशय निकटचा आहे. विज्ञान हे बाह्य जगातील असून अध्यात्म हे आत्मिक शांती मिळवून देण्यासाठी आहे. त्यासंदर्भात १८ व्या शतकात शोध घेणे सुरू झाले होते. परंतू शरीर स्तरावरील विज्ञानापेक्षा अध्यात्मिक उन्नती ही खूप चांगली असून त्यातून चारित्र्य निर्माण होते.”

प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले,“ विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातून जगात सुख, समाधान आणि शांती नांदेल. भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्वज्ञान आजच्या पिढीसमोर मांडण्याची गरज आहे. स्वत्व, स्वाभिमान आणि स्वधर्म जागृत करण्याची आवश्यकता आहे. भारताने जगाला वसुधैव कुटुंम्बकमचा संदेश दिला आहे. धर्म, विज्ञान आणि तत्वज्ञान याचा एकत्रित विचार झाल्यास जगात शांतता प्रस्थापित होईल.”

डॉ.सुशील शर्मा व डॉ. डेव्हीड यांनी आपल्या भाषणात विज्ञानामुळे मानवाची प्रगती कशी झाली हे सांगितले. प्रा.डॉ. आर.एम.चिटणीस यांनी स्वागतपर भाषण केले. प्रा.गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. एस.एन.पठाण यांनी आभार मानले.

0 comments:

Post a Comment