Tuesday, October 12, 2021

वारकरी संप्रदाय, शीख धर्म डॉ. अशोक कामत यांनी जोडले: डॉ. सदानंद मोरे

१२/१०/२०२१

पुणे:
संत नामदेवांनी महाराष्ट्रातील संतांचे विचार सिंधू नदीपर्यंत नेले. त्यानंतर उत्तर भारतातील सर्व संतांचे विचार महाराष्ट्रात पोचविण्याचे काम डॉ. अशोक कामत यांनी केले. शीख आणि वारकरी संप्रदाय यांच्यात सेतू तयार करण्याचे काम त्यांनी केले ही फार महत्त्वाची बाब आहे. प्राचीन ऋषींप्रमाणेच निरपेक्ष वृत्तीने आयुष्यभर ज्ञानदानाचे काम करणारे डॉ. अशोक कामत हे खर्‍या अर्थाने महर्षी आहेत असे उद्गार ज्येष्ठ साहित्यिक व संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी आज काढले. 

27 व्या पुणे नवरात्रौ महोत्सवातर्फे संत साहित्याचे अभ्यासक डॉ. अशोक कामत यांना ‘महर्षी’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी त्यांचा गौरव करताना डॉ. सदानंद मोरे पत्रकार भवन येथे झालेल्या कार्यक्रमात बोलत होते. बडोदा येथील अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून याप्रसंगी उपस्थित होते.

पुणे नवरात्रौ महोत्सवात दरवर्षी ‘महर्षी’ पुरस्कार दिला जातो. समाजातील विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणार्‍या व्यक्तीस हा प्रतिष्ठेचा पुरस्कार दिला जातो. यंदा त्यासाठी डॉ. कामत यांची निवड करण्यात आली. देवीची मूर्ती असणारे स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी सौ. जाई कामत यांचा साडी, गजरा व श्रीफळ देऊन सौ. जयश्री बागुल यांनी सत्कार केला.

प्रारंभी पुणे नवरात्रौ महोत्सवाचे संस्थापक आयोजक आबा बागुल यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, महर्षी पुरस्काराने सन्मानित डॉ. अशोक कामत हे केवळ पुण्याचेच नव्हे, तर सार्‍या महाराष्ट्राचे भूषण आहेत. त्यांच्या व्यासंगामुळे ज्ञानाचा फार मोठा ठेवा पुढील पिढ्यांना मिळाला आहे.

पुरस्कारानंतर आपल्या भावना व्यक्त करताना डॉ. अशोक कामत यांनी महाराष्ट्रातील गेल्या काही शतकातील महर्षींचा उल्लेख करून म्हटले की, ‘महर्षी दयानंद सरस्वती, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, महर्षी धोंडो केशव कर्वे यांसारखे महर्षी यांचे आयुष्य हीच माझी प्रेरणा आहे. त्यानंतर ही परंपरा लोकमान्य टिळक, दत्तो वामन पोतदार, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, पं. महादेवशास्त्री जोशी, पं. अमरेंद्र गाडगीळ यांच्यासारख्यांनी पुढे चालवलेली दिसते. कारण महान माणसे तयार करण्याची ताकद या महाराष्ट्राच्या मातीत व संस्कृतीत आहे’, असे ते म्हणाले.

प्रमुख पाहुणे लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले की, शिखांचे दहा धर्मगुरू आणि ग्रंथसाहिबा यांचा अभ्यासपूर्ण परिचय मराठी भाषकांना करून देण्याचे मोलाचे काम डॉ. अशोक कामत यांनी केले आहे. याद्वारे त्यांनी अन्य संतांनी सांगितलेली सेवा, भक्ती, समता याची शिकवण मराठी माणसांना दिली.

या कार्यक्रमात मानपत्राचे वाचन व सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले. घनश्याम सावंत यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाचे इव्हेंट कोऑर्डिनेशन सुनील महाजन, निकिता मोघे तसेच नंदकुमार बानगुडे, घनश्याम सावंत, अमित बागुल, रमेश भंडारी, नंदकुमार कोंढाळकर आणि राजू बागुल यांनी केले. करोना परिस्थितीनंतरच्या निर्बंधांच्या अधीन राहून सर्व कार्यक्रम संपन्न झाला.

0 comments:

Post a Comment