Monday, August 23, 2021

एमआयटीतर्फे वसाहतवादाबाबतचे चर्चासत्र २५ रोजी

२३/८/२०२१

पुणे: स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानंतर ही देशातील बर्‍याच गोष्टी आज ही वसाहतवादी म्हणजेच इंग्रजांच्या काळातील धोरणाच्या व संस्कृतीनुसार चालत आल्या आहेत. या गुलामगिरी मानसिकतेच्या बेडीतून नव्या पिढीला बाहेर काढणे हा मुख्य उद्देश्य ठेवून एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट (मिटसॉग) तर्फे वसाहतवादी मानसिकता बदलणेया विषयावर पहिल्या राष्ट्रीय एक दिवसीय ऑनलाईन चर्चा सत्राचे आयोजन करण्यात येत आहे. बुधवार दि.२५ ऑगस्ट रोजी दुपारी २ ते ६ या दरम्यान हे चर्चासत्र होईल, अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्‍वनाथ कराड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

वसाहतवादी मानसिकता म्हणजे वांशिक किंवा सांस्कृतिक कनिष्ठतेची आंतरिक वृत्ती बदलणे आहे. याच संदर्भातील काही विचारधारेच्या पोस्टर्सचे प्रदर्शन डब्ल्यूपीयूच्या कॅम्पसमध्ये भरविण्यात आले आहे. याच दिवशी प्रदर्शनाचे उद्घाटन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते सकाळी ९.३० वा. करणार आहेत. या वेळी सरहद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार हे उपस्थित रहाणार आहेत.

या ऑनलाईन चर्चासत्रात माजी केंद्रीय मंत्री व राज्यसभेचे खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी, इंडिया पॉलिसी फाउंडेशनचे मानद संचालक व राज्यसभेचे खासदार डॉ. राकेश सिन्हा, माजी निवडणुक आयुक्त एन.गोपालास्वामी, नवी दिल्ली येथील सुप्रसिद्ध विधिज्ञ डॉ. ललित भसीन, राष्ट्रीय महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष डॉ. पोर्णिमा अडवाणी, सुप्रसिद्ध सिने अभिनेता मोहन जोशी, प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्यां आणि मानवी हक्क कायदेतज्ञ अ‍ॅड. ऋतुपर्णा मोहंती, प्रसिद्ध आरटीआय कार्यकर्ते विवेक वेलणकर, प्रसिद्ध गांधीवादी विचारवंत डॉ. कुमार प्रशांत, खासदार प्रयागासिंग ठाकूर, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते खासदार डॉ. सुधांशू त्रिवेदी आणि पाकिस्तान येथील नजीम शेठी हे या विषयावर आपले विचार मांडतील.

भारतीयत्व ही भावना नेहमीच मुक्त, बिनधास्त आणि अबाधित राहिली आहे. मात्र ब्रिटिशांनी भारतीयांना स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ते परोपकारी असल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. भारतीय कधीही ब्रिटिश शासकांवर अवलंबून नव्हते. भारतीय आत्मसन्मान आणि अभिमान जागविण्यासाठी १५ ऑगस्टचे महत्व पुन्हा सांगून आपण स्वतःला वसाहतीपासून दूर करू या. ब्रिटीश शासकांच्या भारतीय उपखंडातून निघण्याच्या अमृत महोत्सव वर्षात, भारताच्या भावनेचे पुनरूज्जीवन करण्याचा संकल्प केला आहे. तसेच, नेहमीच भारतीय भावनेने, विचाराने आणि कृतींनी स्वतंत्र असावा. सर्वांच्या दैनंदिन जीवनातून वसाहतीचे विचार आणि पद्धतींचे अवशेष काढून टाकण्यासाठी भारतीयत्वाच्या अदम्य शक्तीचे प्रदर्शन करण्याची ही वेळ आहे.

या पत्रकार परिषदेत डॉ. श्रीपाल सबनीस, पं. वसंतराव गाडगीळ, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. एन.टी.राव, प्र-कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट वरिष्ठ संचालक रविंद्रनाथ पाटील, सहयोगी संचालिका डॉ. शैलश्री हरिदास व प्रा. परिमल सुधाकर हे उपस्थित होते.

0 comments:

Post a Comment