पुणे, ६ जुलै : विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते येत्या शुक्रवारी (ता. ९ जुलै) दुपारी १ वाजता आर्यन पार्किंग, महात्मा फुले मंडई येथे होणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
महापौर मुरलीधर मोहोळ या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार असून, खासदार गिरीश बापट, भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार मुक्ता टिळक, माधुरी मिसाळ, भिमराव तापकीर, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, उपमहापौर सुनीता वाडेकर, सभागृह नेते गणेश बिडकर, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, सर्व गटनेते, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पुणे मनपा आणि पीएमपीएमएलचे प्रशासकीय अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
रासने म्हणाले, 'स्थायी समितीचा अध्यक्ष या नात्याने सन २०२०-२१ चा अर्थसंकल्प मांडताना ही योजना सादर केली होती. तिची मंजुरीची प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली असून प्रत्यक्ष अंमलबजावणी होत आहे याचा विशेष आनंद वाटतो. पहिल्या टप्प्यात ९ जुलैपासून आकर्षक गुलाबी रंगसंगतीच्या ५० मीडी बसेस पुण्यातील मध्यवर्ती भाग आणि पेठांमध्ये प्रवासासाठी सज्ज होणार आहेत. त्यानंतर डिसेंबरमध्ये ३०० बसेस उपलब्ध करून संपूर्ण शहरात सहा विभागांमध्ये या योजनेचा विस्तार करण्यात येणार आहे. या योजनेत तिकिटाचा दर दहा रुपये इतका आहे. एका तिकिटावर दिवसभरात कितीही वेळा प्रवास करता येणार आहे. संपूर्ण प्रवास वातानुकूलित आहे. आसन क्षमता २४ इतकी आहे. मीडी आकारामुळे अरुंद रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. सीएनजी या नैसर्गिक इंधनावर ही बस धावणार आहे. मुख्य रस्त्यांवर दर पाच तर अंतर्गत रस्त्यांवर दर पंधरा मिनिटाला बस उपलब्ध होणार आहेत.'
रासने पुढे म्हणाले कि, 'स्वस्त, गतिमान, आरामदायी, वेळेची बचत करणारा, सुरक्षित प्रवास ही या योजनेची खास वैशिष्ट्ये आहेत. वाहतुकीची कोंडी, पार्किंगची समस्या, प्रदूषण, आरोग्याच्या तक्रारी कमी होण्यास मदत होणार आहे. प्रवाशांचा वेळ, पैसा, इंधन याची मोठ्या प्रमाणात बचत होऊ शकेल. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा चेहरामोहरा बदलून टाकण्याची क्षमता या योजनेत आहे. आजपर्यंत सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने स्वत:च्या दुचाकी किंवा चारचाकी गाड्या वापरण्याकडे प्रवाशांचा कल होता. परंतु पुण्यदशमच्या माध्यमातून खासगी वाहनांकडून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे वळण्याचा एक सक्षम पर्याय उपलब्ध झाला आहे. या योजनेला पुणेकर उत्तम प्रतिसाद देतील असा विश्वास वाटतो.
पहिल्या टप्प्यातील समाविष्ट भाग
डेक्कन ते पूलगेट, स्वारगेट ते पुणे स्टेशन, स्वारगेट ते शिवाजीनगर या मार्गाच्या दरम्यान येणार्या सर्व पेठा आणि मध्यवर्ती भाग
0 comments:
Post a Comment