पुणे : रोटरी क्लब ऑफ हिलसाईड आणि भरत नाट्य संशोधन मंदिराच्या कलावंतांतर्फे पुण्यातील विविध नाट्यगृहांमधील पडद्यामागील कलाकार व तंत्रज्ञांना आज जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.
कोरोनामुळे गेल्या सव्वावर्षापासून सर्व नाट्यगृहांचे
पडदे उघडले गेले नसल्याने पडद्यामागील कलाकार-तंत्रज्ञांना अनेक समस्यांना तोंड द्यावे
लागत आहे. कलाकार-तंत्रज्ञांची रोजच्या जगण्यासाठी होणारी धडपड-समस्या जाणून घेऊन रोटरी
क्लब ऑफ हिलसाईड आणि भरत नाट्य संशोधन मंदिरातील कलावंतांनी जवळपास 40 तंत्रज्ञ-कलाकारांना
मदतीचा हात दिला आहे. भरत नाट्य संशोधन मंदिर, बालगंवर्ध रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण
नाट्यगृह, टिळक स्मारक मंदिरातील पडद्यामागील कलाकार-तंत्रज्ञांचा यात समावेश आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे पालन करून प्रातिनिधीक स्वरूपात साहित्याचे
वाटप करण्यात आले.
जीवनावश्यक साहित्याचे वाटप रोटरी डिस्ट्रिक्ट
3131च्या भावी प्रांतपाल मंजू फडके, भरत नाट्य संशोधन मंदिराचे अध्यक्ष आनंद पानसे,
विश्वस्त पांडुरंग मुखडे, कार्याध्यक्ष अभय जबडे, संजय डोळे, रोटरीच्या खजिनदार आदिती
रहाणे, कार्यवाह चंद्रशेखर महामुनी, ज्येष्ठ कलावंत शरद गोखले यांच्या पत्नी नंदाताई
गोखले, सुप्रिया गोसावी, जयसिंघानी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. तसेच एमएएसटी-पीडीसी
टिम मॅस्टेक आणि मित्र परिवारातर्फे अविनाश ओगले आणि उदय पाळंदे यांनी कलाकार-तंत्रज्ञांना
आर्थिक सहाय्य केले.
मंजू फडके म्हणाल्या, कोरोनामुळे सर्व क्षेत्रांवर
संकट आले आहे. रोटरीतर्फे प्रत्येक स्तरावर मदतीचा वाटा उचलला जात आहे. अनेकांना अडचणींचा
सामना करावा लागत असला तरी प्रत्येक जण आपापल्या परिने इतरांना मदतीचा हात देत आहे.
कोरोनामुळे आपल्यासमोर संकटे उभी राहिली असली तरी या काळाने आपल्याला माणुसकीही शिकविली.
प्रत्येकाने आपल्या कुवतीनुसार गरजूंना मदत करणे आवश्यक आहे.
आनंद पानसे म्हणाले, समस्येच्या काळात रोटरी
क्लबचा समाजासाठी मदत कार्यात कायम पुढाकार असतो. रोटरीमार्फत विविध स्तरांवर मदत कार्य
सुरूच असते. रोटरीच्या या समाजोपयोगी उपक्रमांबद्दल नितांत आदर आहे.
भरत नाट्य संशोधन मंदिरातील कलाकार आणि रोटरी
क्लब ऑफ हिलसाईडच्या उपक्रमांची माहिती अभय जबडे यांनी प्रास्ताविकात दिली. भविष्यातही
अशा प्रकारचे उपक्रम सुरू राहणार असल्याचे अभय जबडे यांनी नमुद केले.
0 comments:
Post a Comment