
कविवर्य सुरेश भट यांच्या 'सप्तरंग' या अखेरच्या काव्यसंग्रहातील वीस वेगवेगळ्या कवितांचा 'ठीक आहे छान आहे मस्त आहे' या म्युझिक अल्बममध्ये समावेश आहे. या गाण्यांचे संगीत संयोजन विवेक परांजपे यांनी केले आहे. हवाईन गिटारसारख्या वाद्याबरोबरच ६० ते ७० च्या दशकातील संगीताचा अनुभव देणाऱ्या विविध वाद्यांचा वापर या संगीतरचनांमध्ये करण्यात आला आहे.
अल्बमच्या निर्मितीविषयी संगीतकार आणि निर्माते मंदार आगाशे म्हणाले, की २०२०च्या लॉकडाऊनच्या काळात हा काव्यसंग्रह वाचत असताना मला त्यातील कविता संगीतबद्ध कराव्या वाटल्या. या कविता वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. त्यात चार-पाच ओळींच्या कवितेपासून आकाशगंगा या मोठ्या लांबीची कविताही आहे. रोज एक या प्रमाणे वीस दिवसांत वीस कविता संगीतबद्ध केल्या. लॉकडाऊन असल्याने त्यावेळी अल्बम करण्याचा काही विचार नव्हता. पण २० रचना झाल्यावर काही काळाने या रचनांचा म्युझिक अल्बम करण्याची कल्पना गायक मित्र राहुल देशपांडे यांना सांगितल्यावर त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आणि उत्सुकता दर्शवली.
त्यामुळे अल्बमच्या निर्मितीचा उत्साह वाढला. कालातीत शब्द, श्रवणीय संगीत यांचा मिलाफ या अल्बममधील गाण्यांमध्ये झाला आहे. आधुनिक संगीताचे घटक असलेलं, पण जुन्या काळातील गाण्यांची आठवण करून देणारं हे संगीत आहे. हा म्युझिक अल्बम संगीतप्रेमींच्या नक्कीच पसंतीला उतरेल, याची खात्री वाटते.
'कविवर्य सुरेश भट यांच्या काव्यरचना गाण्याची संधी मिळणं अतिशय आनंददायी आहे. भट यांच्या शब्दांना मंदार आगाशे यांनी दिलेलं संगीत मंत्रमुग्ध करणारं आहे. आताच्या या अवघड काळात मनाला शांतता, आनंदाची अनुभूती देणारं हे संगीत आहे' अशी भावना गायक राहुल देशपांडे यांनी व्यक्त केली.
'ठीक आहे छान आहे मस्त आहे' या अल्बमचे प्रकाशन ५ जूनला रात्री ८.३० वाजता सोशल मीडियाद्वारे ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. या वेळी संगीतकार मंदार आगाशे, गायक राहुल देशपांडे, धनश्री देशपांडे गणात्रा उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम प्रेक्षकांना विनामूल्य पाहता येईल.
0 comments:
Post a Comment