भरत नाट्य संशोधन मंदिर आयोजित वसंत नाट्य यज्ञाची सांगता
पुणे : सिद्धहस्त नाट्यलेखक प्रा. वसंत कानेटकर यांच्या जन्मशताब्दी वर्षारंभानिमित्त भरत नाट्य संशोधन मंदिर, पुणेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘वसंत नाट्य यज्ञ’ या अनोख्या दोन दिवसीय कार्यक्रमाची रविवारी सायंकाळी सांगता झाली. प्रा. कानेटकर यांच्या 41 नाटकातील निवडक प्रवेशांचे सलग दोन दिवस अभिवाचन आणि पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या अप्रचलित रागांनी संगीतबद्ध केलेल्या नाट्यपदांचे ‘वसंत गीत’ या कार्यक्रमाद्वारे रसिकांना समग्र वसंत वैभवाचे दर्शन घडले.
प्रा. कानेकटर यांच्या जन्मशताब्दी वर्षाला शनिवारी प्रारंभ झाला. त्याचे औचित्य साधून भरत नाट्य संशोधन मंदिराने देशपातळीवरील पहिला कार्यक्रम आयोजन करण्याचा मान मिळविला. ‘वसंत नाट्य यज्ञा’चा दुसर्या दिवशीचा शुभारंभ रविवारी ‘देवाचे मनोराज्य’ या नाटकातील प्रवेश अभिवाचनाने झाला. समारोप समारंभाला वयाच्या 101व्या वर्षात पदार्पण केलेले ज्येष्ठ पत्रकार, समीक्षक, कवी मा. कृ. पारधी, ज्येष्ठ पत्रकार, लेखक विजय कुवळेकर, कानेटकर यांचे नातू अंशुमन कानेटकर, प्रसिद्ध गायक पंडित शौनक अभिषेकी यांची प्रमुख उपस्थिती होती. भरत नाट्य संशोधन मंदिराचे विश्वस्त रवींद्र खरे, अध्यक्ष आनंद पानसे हे रंगमंचावर होते.
‘वसंत गीते’ या कार्यक्रमात ‘मीरा मधुरा’, ‘मत्स्यगंधा’, ‘लेकुरे उदंड जाहली’, ‘कधी तरी कोठे तरी’, ‘तू तर चाफेकळी’ या संगीत नाटकातील पदांचे सादरीकरण करण्यात आले. यात ‘आनंद सुधा बरसे’, ‘जन्म दिला मज ज्याने’, ‘छत आकाशाचे आपुल्या घराला’, ‘सये ग मी तर शाम दिवाणी’, ‘धन्य धन्य शंखराज’, ‘चंद्र हवा’, ‘स्वप्नात पाहिले जे’, ‘किती गोड गोड बाळ’, ‘तुझ्या अंग संगाने’ ही नाट्यपदे संजीव मेहेंदळे, मेघन श्रीखंडे, गौरी पाटील, विश्वजीत मेस्री यांनी सादर केली तर ‘वसंत गीते’ या कार्यक्रमात सहभागी झालेले पाहुणे कलाकार पंडित शौनक अभिषेकी यांनी ‘अशी सखी सहचरी’, ‘जिने मला छेडून..’ ही नाट्यपदे सादर केली. विद्यानंद देशपांडे (तबला), उदय कुलकर्णी (ऑर्गन) यांनी साथसंगत केली. प्रा. कानेटकर आणि पंडित अभिषेकी यांच्या विषयीच्या आठवणींची गुंफण करीत रवींद्र खरे यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.
कानेटकर मराठी परंपरेला चिकटून राहिले : मा. कृ. पारधी
टीकाकार-समीक्षक म्हणून मी कानेटकर यांच्या छत्राखाली वाढलो असल्याचे सांगून मा. कृ. पारधी म्हणाले, कानेटकर यांनी शेक्सपिअरच्या लेखन शैलीचा अनुनय केला नाही तर त्यांनी मराठी रंगभूमीच्या आशयाला चिकटून लिखाण केले. स्वत:ची स्वतंत्र रंगभूमी निर्माण केली. सामाजिक, ऐतिहासिक, पौराणिक नाटकांचे लेखन त्यांनी केले परंतु त्यांच्या लिखाणात शोकांतिक दिसून येत नाही.
कानेटकर हे बहुआयामी लेखक : विजय कुवळेकर
विजय कुवळेकर म्हणाले, प्रा. कानेटकर हे बहुआयामी लेखक होते. त्यांनी नाट्यलेखन करताना विविध प्रयोग केले. लिखाणाची शैली, पात्रांची मांडणी यातून कानेटकर यांनी स्वत:चा पंथ निर्माण केला. सामान्यातील सामान्य माणसांचे गुण-वैशिष्ट्य हेरून लिखाण करण्याची त्यांची हातोटी होती. सातत्याने नव्याचा शोध घेण्याची त्यांची वृत्ती होती त्याला प्रतिभा आणि व्यासंगाचीही जोड होती. कानेटकर आणि अभिषेकीबुवा यांच्या आठवणींना उजाळा देताना कुवळेकर म्हणाले, दोन कलावंत एक कलाकृती कशी निर्माण करतात हे पाहण्यासारखे होते. अशा थोर कलावंताचे साहित्य पुढच्या पिढीकडे कसे जाईल हे पाहिले पाहिजे.
वसंत कानेटकर यांचे नातू अंशुमन कानेटकर म्हणाले, कानेटकर यांचे साहित्यवैभव देशातील नव्या पिढीला अनुभवायला मिळावे म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत. जन्मशताब्दी वर्षात कानेटकर यांच्याविषयीचे अनेक कार्यक्रम देश-विदेशात पोहोचविण्याचा मानस आहे.
पारधी आणि कुवळेकर यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष आनंद पानसे यांनी केला. अंशुमन कानेटकर यांचा तसेच ‘वसंत नाट्य यज्ञात’ सहभागी झालेल्या संस्था-कलाकारांचा सत्कार कुवळेकर यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्याध्यक्ष अभय जबडे यांनी तर रंगभूमी पूजन दीपक दंडवते यांनी केले.
0 comments:
Post a Comment