Sunday, January 3, 2021

गिर्यारोहणातील ध्रुवतारा निखळला!

 पुणे : कांचनजुंगा शिखरावरील पहिल्या यशस्वी भारतीय मोहिमेचे नेते कर्नल नरेंद्र कुमार यांचे वयाच्या 87व्या वर्षी निधन झाले. जगातील तिसरे उंच शिखर असलेल्या ‘माऊंट कांचनजुंगा’ शिखरावर 1977 साली पहिल्यांदा भारतीय तिरंगा फडकविणाऱ्या संघाचे नेते कर्नल नरेंद्र कुमार यांचे डिसेंबर 31, 2020 रोजी नवी दिल्ली येथे निधन झाले. ते 87 वर्षांचे होते.

2019 साली गिरिप्रेमीने आयोजित केलेल्या ‘माऊंट कांचनजुंगा ईको इक्स्पेडिशन 2019’ ला शुभेच्छा देण्यासाठी ते पुण्यातील कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते. कर्नल नरेंद्र कुमार म्हणजे भारतीय गिर्यारोहण इतिहासातील ध्रुव तारा. भारतातील गिर्यारोहण क्षेत्राला दिशा देण्यामध्ये बुल कुमार (कर्नल नरेंद्र कुमारांचे टोपणनाव) महत्वाचे योगदान आहे. 1977 साली कर्नल नरेंद्र कुमार यांच्या नेतृत्वाखालील संघाने कांचनजुंगा शिखराच्या ईशान्य धारेने (नॉर्थइस्ट स्पर) चढाई केली, ज्या ठिकाणाहून १९३१ साली जर्मन संघाने चढाईचा प्रयत्न केला होता.

जर्मन संघ २५ हजार फुट उंचीपर्यंत चढाई करू शकला होता, त्यांच्या या कामगिरीचे वर्णन ‘ब्रिटीश अल्पाईन जर्नल’ने ‘गिर्यारोहण क्षेत्रातील असामान्य व एकमेव अशी कामगिरी’ असे केले होते. याच मार्गावर कर्नल कुमार यांच्या संघाने २८२०८ फुट उंच कांचनजुंगा शिखरावर यशस्वी चढाई केली होती. त्यांच्या मार्गदर्शनामुळे गिरिप्रेमीची 2019 सालची कांचनजुंगा मोहीम यशस्वी होऊ शकली. बुल कुमार यांच्या जाण्याने गिर्यारोहण क्षेत्राचे अपरिमित नुकसान झाले असून ते कधीच भरून निघू शकणार नाही,” अशी भावना गिरिप्रेमीच्या कांचनजुंगा ईको इक्स्पेडिशन 2019’ चे नेते उमेश झिरपे यांनी व्यक्त केली.

2019 साली पुण्यात गिरिप्रेमीच्या कांचनजुंगा मोहिमेला शुभेच्छा देताना ते म्हणाले होते, “गिरिप्रेमीबद्दल मला नितांत अभिमान आहे. त्यांनी याआधी सहा अष्टहजारी शिखरांवर यशस्वी चढाई केली आहे. अशा अतिउंच शिखरावर नागरी मोहिमा यशस्वी करणे, हे अत्यंत कठीण आहे, मात्र गिरिप्रेमीने हे करून दाखवले याचा मला अभिमान आहे. गिरिप्रेमीची कांचनजुंगा मोहीम नक्की यशस्वी होईल, याचा मला ठाम विश्वास आहे. उमेश झिरपे यांच्यासारख्या मोहीम नेता असल्यावर मोहीम यशस्वी होणारच. गिरिप्रेमीच्या कांचनजुंगा मोहिमेमध्ये ‘इको’ म्हणजेच पर्यावरण संवर्धनाचे काम केले जाणार आहे. पर्वत परिसर स्वच्छ केला जाणार आहे. ही अत्यंत स्पृहणीय बाब आहे. गिर्यारोहणाचा मूलमंत्र असे सांगतो कि, गिर्यारोहकांनी शिखर चढाईनंतर मागे फक्त पावलाचे ठसे सोडावे, आणखी काही नाही. त्यामुळे गिरिप्रेमीचा हा ‘इको अस्पेक्ट’ फार महत्वाचा आहे. त्यांच्या या मोहिमेला माझ्या खूप शुभेच्छा व संघातील सर्व गिर्यारोहक यशस्वी चढाई करून सुखरूप परत येतील, हा मला विश्वास आहे.” त्यांचा विश्वास सार्थ ठरवत गिरिप्रेमीची 10 जणांच्या संपूर्ण संघाने 15 मे 2019 रोजी पहाटे ‘कांचनजुंगा शिखरावर तिरंगा फडकावून इतिहास रचला.

कर्नल नरेंद्र कुमार यांची प्रमुख कामगिरी पुढील प्रमाणे • भारतीय हिमालयातील १३ सर्वोच्च शिखरापैकी ९ शिखरांवरील यशस्वी मोहिमा या कर्नल कुमार यांच्या नेतृत्वाखाली पार पडल्या. यात माउंट नंदादेवी सारख्या तांत्रिकदृष्ट्या अत्यंत कठीण शिखराचा देखील समावेश आहे. • प्रत्यक्ष मोहिमांसोबतच गिर्यारोहण प्रशिक्षणामध्ये देखील त्यांनी महत्वाचे योगदान दिले. कर्नल कुमार हे दार्जीलिंग येथील ‘हिमालयन माउंटनियरिंग इन्स्टिट्यूट’चे प्राचार्य होते तसेच गुलमर्ग येथील स्कीईंग व माउंटनियरिंग इन्स्टिट्यूटचे देखील प्राचार्य होते. त्यांनी हाय-अल्टीट्युड वॉरफेयर स्कूलचे प्रमुख म्हणून देखील काम पाहिले आहे. कर्नल कुमार हे ‘इंडियन माउंटनियरिंग फाउंडेशन’चे उपाध्यक्ष देखील होते.
 

त्यांना तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते ‘आयएमएफ सुवर्णपदक’ देखील बहाल करण्यात आले होते. पी.व्ही.एस.एम., के.सी., ए.व्ही.एस.एम., पद्मश्री, अर्जुन अवॉर्ड अशा विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. • कर्नल कुमारांनी गिर्यारोहण क्षेत्रात मोलाची कामगिरी तर बजावलीच मात्र त्याहूनही महत्वाचे त्यांनी व त्यांच्या संघाने केले, ते म्हणजे सियाचीन ग्लेशियरवर चढाई करून त्यावर भारताचा तिरंगा फडकाविला. १९७८ व १९८१ असे दोन वेळा कर्नल कुमार यांनी भारतीय सैन्याच्या सियाचीन ग्लेशियरवरील चढाई तुकडीचे नेतृत्व केले.

त्यांनी व त्यांच्या संघानी २४ हजार ३०० फुटांवरील सिया कांगरी येथे चढाई केली तर संघातील काही जणांनी साल्टोरो कांगरी (२५ हजार ४०० फुट) व टेरेम कांगरी II (२४ हजार ३०० फुट) येथे चढाई केली. या दोन अभ्यास मोहिमांमुळे सियाचीन परिसराचा उत्तम अभ्यास भारतीय सैन्याला करता आला व या अतिउंच प्रदेशावर कायमस्वरूपी ताबा मिळविता आला. सियाचीन परिसरातील मध्यावर उभ्या असणाऱ्या बेसला कर्नल कुमार यांच्या नावावरून ‘कुमार बेस’ असे संबोधतात. कर्नल कुमार व त्यांच्या संघामुळेच सियाचीन ग्लेशियर भारताच्या ताब्यात आजतागायत आहे व पुढेही राहील.

0 comments:

Post a Comment