Wednesday, December 29, 2021
डॉ. इनामदारना आशियाई पॉवरलिफ्टिंगमध्ये चार सुवर्ण
Friday, December 10, 2021
एमआयटीची आंतरराष्ट्रीय कायदा, शांतता परिषद १४ रोजी
पुणे: एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे पहिली ‘आंतरराष्ट्रीय कायदा आणि शांतता परिषद’ १४ डिसेंबर २०२१ ते १७ डिसेंबर २०२१ या कालावधीत एमआयटी डब्ल्यूपीयू, कोथरुड, पुणे येथे ऑनलाइन आयोजन करण्यात आले आहे. ‘जगात शांतीे संस्कृतीचा प्रचार आणि प्रसारासाठी कायद्याची भूमिका’ हा या परिषदेचा मुख्य विषय आहे.
या परिषदेचा उद्घाटन समारंभ मंगळवार, दि. १४ डिसेंबर सकाळी १०.३० वा. होणार आहे. या समारंभासाठी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती डॉ. अरिजित पसायत, सर्वोच्च न्यायालयाचे वकील डॉ. ललीत भसीन, पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती डॉ. भारतभूषण परसोन, केरळचे कायदे मंत्री पी. राजीव आणि न्यूट्रॉन इलेक्ट्रॉनीक सिस्टीम्स्चे अध्यक्ष नानीक रुपानी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा कराड असतील, तसेच, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे
कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड हे उपस्थित राहतील.
या परिषदेचा समारोप शुक्रवार दि.१७ रोजी दुपारी ४.३० वा. होणार आहे. या समारंभासाठी ज्येष्ठ कायदे तज्ञ व सरकारी वकील पद्मश्री डॉ.उज्ज्वल निकम, यूएन इंटरनॅशनल लॉ कमिशनचे डॉ. अनिरुद्ध राजपूत, राष्ट्रीय रक्षा युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. बिमल एन. पटेल, राज्य सभेचे खासदार सुजीत कुमार व सुप्रीम कोर्टाचे वकील डॉ. ललित भसीन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.
Monday, December 6, 2021
रसिकांच्या उत्स्फूर्त टाळ्यांनी ‘मदनाची मंजिरी’चे स्वागत
पुणे : नावीन्यपूर्ण आणि भावपूर्ण चालींचा साज असलेले ‘ऋतुराज आज वनी आला’, ‘मानिनी सोड तुझा अभिमान’, ‘अंग अंग तव अनंग’, ‘आली प्रणय चंद्रिका करी’ अशी एकाहून एक सरस नाट्यपदे आणि गझल गायकीच्या अंगाने सादर केलेले ‘ये मौसम है रंगीन’ला रसिकांची उस्फूर्त भरभरून मिळालेली टाळ्यांची दाद अन् वन्समोअरने नव्या संचात आलेल्या संगीत ‘मदनाची मंजिरी’ या नाटकाचे रसिकांनी स्वागत करून पसंतीची मोहोर उमटविली.
पुण्यातील कलाद्वयी या संस्थेतर्फे कै. विद्याधर गोखले लिखित संगीत ‘मदनाची मंजिरी’ या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित करण्यात आला होता. संगीत रंगभूमीच्या दुसर्या सुवर्णकाळातील म्हणजे 1960च्या दशकातील हे नाटक असून प्रदीर्घ कालखंडानंतर नव्या संचात रंगभूमीवर आले आहे. तरुणपणी या नाटकात भूमिका साकारलेल्या सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री मधुवंती दांडेकर यांनी या कलाकृतीसाठी दिग्दर्शन आणि संगीत मार्गदर्शन केले आहे, हे आणखी एक वैशिष्ट्य!
ज्या काळात संगीत नाटकाविषयीची रुची कमी होऊ लागली होती त्या काळात विद्याधर गोखले यांनी पौराणिक, सामाजिक, मध्ययुगीन कालखंडावर आधारित लिहिलेल्या नाटकांमुळे प्रेक्षक पुन्हा एकदा संगीत रंगभूमीकडे वळू लागले. त्यातीलच ‘मदनाची मंजिरी’ हे भक्ती, हास्य आणि श्रृंगाररसाने नटलेले नाट्य आहे. महाकवी शेक्सपिअरच्या ‘ट्वेल्थ नाईट’ या प्रसिद्ध कलाकृतीवर ‘मदनाची मंजिरी’ ही नाट्यकलाकृती आधारित आहे.
या नाटकातील पदे आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवित असल्याचे या शुभारंभाच्या प्रयोगाच्या निमित्ताने अनुभवायला मिळाले. कलाकारांच्या प्रभावी सादरीकरणातून प्रयोग जसजसा रंगू लागला तसतसे ज्येष्ठ रसिक गतस्मृतीत रममाण झाले आणि कथानकानंतर आता पुढील पद कुठले हे ओळखून उस्फूर्तपणे दाद देऊ लागले. संगीत नाटक म्हटले की पौराणिक, ऐतिहासिक नाटक असावे असा विचार मनात येतो पण हलक्या-फुलक्या विषयावरील या नाट्यकलाकृतीचा आनंद युवा वर्गानेही घेत पसंतीची पावती दिली.
प्रयोगात पुण्यातील आघाडीचे कलाकार चिन्मय जोगळेकर, अस्मिता चिंचाळकर, सावनी दातार-कुलकर्णी, संजय गोसावी, मंगेश चिंचाळकर, ओंकार खाडिलकर, सयाजी शेंडकर, निरंजन कुलकर्णी, अर्चना साने यांनी भूमिका साकारल्या तर नाट्यसंगीताचा बाज पुरेपूर माहिती असलेले संजय गोगटे (ऑर्गन) आणि विद्यानंद देशपांडे (तबला), प्रमोद जांभेकर (व्हायोलिन) यांनी साथसंगत केली.
श्रीमंत दगडूशेठचे अध्यक्ष अशोक गोडसे यांचं निधन
७/१२/२०२१
पुणे: श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव प्रतापराव गोडसे यांंचे सोमवार, ६ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी निधन झाले. ते ६५ वर्षांंचे होते. त्यांच्या मागे पत्नी, १ मुलगी, १ मुलगा, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. यकृताच्या कर्करोगासंदर्भात त्यांच्यावर मागील दोन आठवडयांपासून ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते.
ते सुमारे ५० ते ५५ वर्षे ट्रस्टच्या माध्यमातून कार्यरत होते. सन २०१० पासून ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष होते. तसेच सुवर्णयुग सहकारी बँकेवर संचालक पदी देखील त्यांनी काम केले होते. अशोक गोडसे यांनी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या माध्यमातून मानवतेचे महामंदिर ही संकल्पना रुजवित अनेक सामाजिक उपक्रम राबविले.
जय गणेश ज्ञानवर्धन अभियान, जय गणेश रुग्ण सेवा अभियान, जय गणेश संपूर्ण ग्राम अभियान, जय गणेश आपत्ती निवारण अभियान, जय गणेश जलसंवर्धन अभियान, जय गणेश निसर्ग संवर्धन अभियान या ट्रस्टच्या उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता.
अशोक गोडसे यांनी १९६८ साली सुवर्णयुग तरुण मंडळाचे प्रमुख संघटक म्हणून सुरुवात केली. सन १९९६ मध्ये ते सुवर्णयुग तरुण मंडळाचे विद्यमान संचालक होते. सन २००१ मध्ये ट्रस्टच्या विश्वस्तपदी त्यांची निवड झाली. त्यानंतर सन २०१० मध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाल्यापासून ते ट्रस्टवर कार्यरत होते. दरवर्षी होणा-या गणेशोत्सव सजावटीच्या संकल्पनेत त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता.
Wednesday, December 1, 2021
संगीत मदनाची मंजिरी लवकरच रसिकांच्या भेटीला
पुणे : संगीत नाटक आणि नाट्यसंगीताच्या प्रचार आणि प्रसाराचा वसा हाती घेतलेल्या ‘कलाद्वयी’ या नाट्यसंस्थेतर्फे सुप्रसिद्ध नाटककार विद्याधर गोखले लिखित संगीत ‘मदनाची मंजिरी’ ही नाट्यकलाकृती रसिकांच्या भेटीला येत आहे. संगीत रंगभूमीच्या दुसर्या सुवर्णकाळातील म्हणजे 1960च्या दशकातील हे नाटक असून प्रदीर्घ कालखंडानंतर नव्या संचात रंगभूमीवर पहायला मिळणार आहे. तरुणपणी या नाटकात भूमिका साकारलेल्या ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री मधुवंती दांडेकर संगीत मार्गदर्शक आणि दिग्दर्शकाच्या भूमिकेत आहेत, हे या कलाकृतीचे आणखी एक वैशिष्ट्य! पुण्यातील ‘कलाद्वयी’ नाट्यसंस्थेच्या वतीने ही नाट्यकृती प्रथमच रंगमंचावर साकारली जात आहे.
ज्येष्ठ ऑर्गनवादक संजय गोगटे आणि तबला वादक विद्यानंद देशपांडे यांनी 15 वर्षांपूर्वी ‘कलाद्वयी’ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर ज्येष्ठ गायिका-अभिनेत्री वर्षा जोगळेकर, गायिका-अभिनेत्री अस्मिता चिंचाळकर आणि अभिनेते संजय गोसावी हे ‘कलाद्वयी’शी जोडले गेले. ‘सौभद्र’, ‘मानापमान’, ‘संशय कल्लोळ’, ‘स्वयंवर’ या नाटकांची निर्मिती संस्थेतर्फे करण्यात आली आहे.
महाकवी शेक्सपिअरच्या ‘ट्वेल्थ नाईट’ या प्रसिद्ध नाट्यावर ‘मदनाची मंजिरी’ ही नाट्यकृती आधारित असून या प्रहसनात्मक संगीत नाटकाचा प्रयोग शनिवार, दि. 4 डिसेंबर 2021 रोजी सायंकाळी 5 वाजता बालगंधर्व रंगमंदिरात होणार असल्याची माहिती मधुवंती दांडेकर आणि संस्थेच्या विश्वस्त वर्षा जोगळेकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या वेळी गायक अभिनेत्री अस्मिता चिंचाळकर, संस्थेचे विश्वस्त संजय गोगटे, विद्यानंद देशपांडे, संजय गोसावी उपस्थित होते.
संगीत नाटकाविषयीची रुची कमी होऊ लागली होती त्या काळात विद्याधर गोखले यांनी पौराणिक, सामाजिक, मध्ययुगीन कालखंडावर आधारित लिहिलेल्या नाटकांमुळे प्रेक्षक पुन्हा एकदा संगीत रंगभूमीकडे वळू लागला. त्यातीलच ‘मदनाची मंजिरी’ हे भक्ती, हास्य आणि श्रृंगाररसाने नटलेले नाटक. त्याकाळी चार-साडेचार तास चालणारे नाटक आजच्या काळातील प्रेक्षकांचा विचार करून अडीच तासाची कालमर्यादा निश्चित करून रंगभूमीवर आणण्यात येत आहे.
‘ऋतुराज आज वनी आला’, ‘मजला कुठे न थारा’, ‘मानिनी सोड तुझा अभिमान’, ‘अंग अंग तव अनंग’, ‘तारिल तुज अंबिका’, ‘आली प्रणय चंद्रिका करी’ ही नाट्यपदे आणि गझल गायकीच्या अंगाने सादर होणारे ‘ये मौसम है रंगीन’ हे पद आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवित असून नाट्यप्रयोगाच्या निमित्ताने प्रत्यक्ष रंगमंचावर कलाकारांकडून ऐकायला मिळणार आहेत. शास्त्रीय संगीतावर आधारित पण त्या-त्या व्यक्तिरेखेचा विचार करून सुप्रसिद्ध संगीतकार, ऑर्गनवादक प्रभाकर भालेकर यांनी नाविन्यपूर्ण व भावपूर्ण चाली नाटकातील पदांना दिल्या आहेत. तसेच सुप्रसिद्ध गायक-अभिनेते पंडित राम मराठे यांनी चाली दिल्या आहेत.
मधुवंती दांडेकर यांनी मंजिरी आणि लिलावती उर्फ लिलाधर या दोन्ही प्रमुख भूमिका साकारलेल्या आहेत. नव्या कलाकारांच्या संचात हे नाटक रंगमंचावर येत असून दिग्दर्शन आणि संगीत मार्गदर्शकाची जबाबदारी दांडेकर यांनी स्वीकारली आहे. या विषयी बोलताना त्या म्हणाल्या, गुरुंकडून मिळालेल्या अभिनय आणि गायनाचा ठेवा नवीन कलाकारांकडे देताना निश्चितच आनंद होत आहे. पुन्हा एकदा वेगळ्या दृष्टीने नाटकाकडे पाहता येत आहे. या नाटकात भूमिका करणारे कलाकार लोकप्रिय आहेत, आवडीने शिकत आहेत ही समाधानाची बाब असून हे कलाकार रसिकांच्या अपेक्षा नक्कीच पूर्ण करतील असा विश्वास आहे.
नाट्यगृहाच्या क्षमतेच्या 50 टक्के उपस्थितीचे बंधन असले तरी शुभारंभाच्या प्रयोगाचे प्रवेश मूल्य नाममात्र ठेवण्यात आले असल्याचे या नाटकाच्या निर्मितीची बाजू सांभाळणार्या वर्षा जोगळेकर, मधुवंती दांडेकर आणि कलाद्वयीच्या विश्वस्तांनी सांगितले.
Monday, November 22, 2021
प्रगतीमध्ये संस्थांनी सभासदांनाही हिस्सा द्यावा: अनास्कर
पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन यांच्या वतीने पुणे जिल्हयातील ५० नागरी सहकारी बँकांमध्ये सहकार सप्ताह साजरा करण्यात आला. सहकाराची बलस्थाने सर्वसामान्यांसमोर मांडणे ही संकल्पना घेऊन सहकार सप्ताह साजरा झाला. सप्ताहामध्ये महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांचे सहकारातून समृद्धीकडे या विषयावर व्याख्यान झाले. असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सुभाष मोहिते, मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर जेरे यांसह असोसिएशनचे संचालक व पदाधिकारी यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
विद्याधर अनास्कर म्हणाले, सभासद हा सहकाराचा मूळ गाभा आहे. सभासद हा सहकारी संस्थेच्या मागे ठामपणे उभा राहिला, तर जगातली कुठलीही ताकद सहकार संस्थेला संपवू शकत नाही. समान गरज असणारी लोक एकत्र येतात म्हणजे सहकार आणि आपली गरज भागवून घेतात, यालाच सहकार असे म्हणतात. त्याच सोबतच प्रत्येकाची समृद्धी देखील सहकारामध्ये अपेक्षित आहे, असेही त्यांनी सांगितले.
व्याख्यानमालेत रिझर्व बँकेचे जनरल मॅनेजर डॉ. अमित कुमार यांचे 'नियंत्रकांच्या सहकारी बँकांकडून अपेक्षा' या विषयावर व्याख्यान झाले. तसेच चार्टर्ड अकाउंटंट माधव ऊर्फ अभय माटे, चार्टर्ड अकाउंटंट डॉ. दिलीप सातभाई, संगणक तज्ञ विजय भालेराव, बँकिंग तज्ञ विक्रांत पोंक्षे यांची व्याख्याने झाली.
असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सुभाष मोहिते यांनी सदर सहकार सप्ताह साजरा करण्यासाठी बँकांचे संचालक, अधिकारी, सेवक वर्ग व ग्राहक यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले. सहकारी बँक या सर्वसामान्य माणसांनी काढलेल्या बँका आहेत, त्यामुळे त्या सर्वसामान्य व्यक्तींच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवीत आहेत व घडविलेला आहे. त्यामुळे आपुलकीची भावना निर्माण करणा-या सहकारी बँकांबरोबरच व्यवहार करावेत असे आवाहन त्यांनी केले.
सहकाराची सकारात्मक बाजू व बलस्थाने सामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व सहकारी बँका एकत्रित येऊन हा सहकार सप्ताह वेगळ्या पद्धतीने साजरा केला. सप्ताहांतर्गत प्रत्येक नागरी सहकारी बँकेच्या मुख्य कचेरीवर सहकाराचा ध्वज लावणे, सहकाराची बलस्थाने मांडणारा फलक प्रत्येक बँकेच्या शाखेसमोर लावणे, सहकार दिनाच्या दिवशी व त्यानंतर दररोज ५० लाख खातेदारांना शुभेच्छा संदेश पाठविणे असे विविध कार्यक्रम पुणे जिल्हयातील ५० नागरी सहकारी बँकांमध्ये आयोजित करण्यात आले होते.
सौरभ आमराळे यांच्या वाढदिवसानिमित्त नोकरी मेळावा
युवकांना नोकरी मिळून स्वतःच्या पायावर उभं राहावं हा प्रमुख उद्देश असून या मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणात युवक व युवतींनी उपस्थिती लावली. या नोकरी मेळाव्यात 5 वी ते पदवीधर अशा 5 हजार युवकांना नोकरी नोकरी देण्याचा मानस आहे आणि त्यांना हा नोकरी देण्याचा मानस पूर्ण होईल, हा योगायोग वाढदिवसानिमित्त घडून येत आहे, याचा नक्कीच मला आनंद आहे, असे सौरभ आमराळे याप्रसंगी म्हणाले.
मोदी भाषण देऊन नोकरी व राशन देत नाहीत. त्यामुळे अनेक लोकांना नोकरीची आवश्यकता निर्माण झाली असल्याने आमचं नोकरी देण्यासाठी प्राधान्य राहील. येणाऱ्या काळात 20 हजार नोकरी देण्याचा संकल्प देखील अनेक मान्यवरांनी व्यक्त केला.
यावेळी कार्यक्रमाला रोहित टिळक,अविनाश बागवे, मोहन दादा जोशी, दीप्तीताई चौधरी, सोनम पटेल, सुनील पंडित, बाळासाहेब आमराळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक विजय वाघचौरे यांनी केले.
Friday, November 12, 2021
नाट्यछटांच्या ई-बुकचे शनिवारी प्रकाशन
पुणे : ‘मराठीतील निवडक नाट्यछटा’ हा 25 नाट्यछटांचा संग्रह ई-बुकच्या माध्यमातून रसिकांच्या हाती येत आहे. नाविन्यपूर्ण लिखाण करणार्या महाराष्ट्रातील आठ लेखकांच्या नाट्यछटांचा यात समावेश आहे. या नाट्यछटांच्या ई-बुक भाग एकचा प्रकाशन समारंभ शनिवार, दि. 13 नोव्हेंबर 2021 रोजी आयोजित करण्यात आला आहे.
ई-बुकचा प्रकाशन समारंभ सकाळी 10:30 वाजता पत्रकार संघातील कमिन्स सभागृहात आयोजित केला असून बालरंगभूमी परिषदेच्या मध्यवर्ती शाखेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ रंगकर्मी प्रकाश पारखी यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे. नाट्यनिर्मात्या आणि प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री देसाई, साहित्यिक शंतनू खेर, विस्तार अॅडर्व्हटायझिंगच्या संचालिका जान्हवी बोरावके यांची प्रमुख उपस्थिती असून या ई-बुकचे संपादन रंगकर्मी देवेंद्र भिडे यांनी केले आहे.
दरवर्षी होणार्या नाट्यछटा स्पर्धेत लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत अनेकजण भाग घेतात. लॉकडाऊनच्या काळात स्पर्धा ऑनलाईन झाल्या पण नाट्यछटांच्या संहिता मिळणे अवघड झाले. स्पर्धकांना आणि वाचकांना नाट्यछटा सहजतेने उपलब्ध व्हाव्यात या हेतूने ई-बुक स्वरूपात नाट्यछटा प्रसिद्ध करण्यात येत असल्याचे देवेंद्र भिडे यांनी सांगितले. अनेक वर्षे दर्जेदार लेखन करणार्या महाराष्ट्रातील आठ लेखकांच्या नाट्यछटांचा या ई-बुकच्या भाग एकमध्ये समावेश करण्यात आला आहे.
Tuesday, October 12, 2021
रीतिका खटनानीला लिवा मिस डीवा सुप्रानॅशनल किताब
पुणे: पुण्याच्या रीतिका खटनानीने लिवा मिस डीवा सुप्रानॅशनल 2021 किताब पटकावला. यापूर्वी चंदीगडच्या हरनाज सिंधूने लिवा मिस डीवा युनिव्हर्स 2021 हा किताब जिंकून देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. मिस सुप्रानॅशनलमध्ये ती भारताचे प्रतिनिधित्व करेल. नुकतीच मुंबईच्या फेमस स्टुडिओमध्ये एका सोहळ्यात विजेत्यांची नावे जाहीर झाली.
रितिका खटनानी एक आत्मविश्वासाने भरलेली, निर्भीड आणि प्रसन्न व्यक्तिमत्व असलेली मुलगी असून सध्या ती मुंबईच्या जय हिंद कॉलेजातून मास मीडिया आणि कम्युनिकेशन शिकत आहे. तिसरीत असताना या सौंदर्यवतीची स्पेलिंग बी चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 15 उमेदवारांमध्ये निवड झाली होती. समाजात योगदान देणाऱ्या तिच्या मानवतावादी कार्याचा संयुक्त राष्ट्रसंघाने ग्लोबल यंग फेलोशिप अवॉर्ड देऊन सन्मान केला होता. तिने पुणे महानगरपालिका शाळेत शिकणाऱ्या वंचित मुलांना शिकवले आहे. एकट्या आईने वाढवलेली ही सुंदरी आता एक स्वतंत्र, महत्त्वाकांक्षी आणि आशावादी मुलगी झाली आहे. तिच्या आईला पहिल्यापासून एक मुलगीच हवी होती, म्हणून रितिकाला वाटते की ती देवाची कन्या आहे.
19-वर्षांची ही तरुणी उत्कृष्ट भरतनाट्यम डान्सर, अष्टपैलू कलाकार आणि एक उद्योजिका आहे. आपल्या जीवनात मनोरंजन, उद्योजकता आणि मानवता या क्षेत्रात विविध प्रकारची कामे करण्याची तिची इच्छा आहे. आपल्या NUE या ब्रॅंडच्या मदतीने प्रसिद्ध हस्ती आणि उद्योजिका होण्याचे तिचे स्वप्न आहे. आपल्याला मिळणार्याक प्रत्येक संधीचे सोने करून एक दिवस फोर्ब्स मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकण्याचे तिचे ध्येय आहे.
एका पत्रकार परिषदेत लिवा मिस डीवा सुप्रानॅशनल 2021 हा किताब जिंकल्याच्या आपल्या यशाबाबत बोलताना रितिका म्हणाली, “हा किताब माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. ते माझे स्वप्न, ध्येय आणि व्हिजन आहे. मोठे होणे, एक सार्थ आणि उद्देशपूर्ण जीवन जगणे हे माझ्या लेखी फार महत्त्वाचे होते. हे यश केवळ माझे नाही, तर माझ्या आईचेही आहे. विश्व ज्याची प्रतीक्षा करत आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचवणारा हा मंच आहे.आपली आई हा तिचा प्रेरणास्रोत आणि आधारस्तंभ आहे. तिच्यातील मूल्य जाणीव, आत्मविश्वास, निर्भीडपणा आणि दृढनिर्धार हे गुण तिला आईकडूनच वारशात मिळाले आहेत."
आपल्या भविष्याबद्दल ती म्हणते, “अत्यंत कृतज्ञ मनाने मी मला मिळणार्याच प्रत्येक संधीतील शक्यता शोधत आहे. मन मोकळे ठेवून, मनात महत्त्वाकांक्षा जपत या सुंदर प्रवासावर जाताना स्वतःशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या मनात निरंतर ध्यास आहे आणि जग जिंकण्याची आग आहे. माझ्या जीवनात आलेला हा समय पुन्हा कधीच परतून येणार नाही, त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेला सामोरे जाताना, त्यातून उलगडणार्या जादुई क्षणांचा मला आनंद घ्यायचा आहे.”
रितिका असे मानते की, मोठी स्वप्ने पाहण्याच्या तिच्या क्षमतेमुळे ती मिस डीवा मंचापर्यंत पोहोचू शकली आहे. आपली एक परंपरा निर्माण करण्याची आणि लोक कधीच विसरू शकणार नाहीत असे जीवन जगण्याची तिची आकांक्षा आहे. तिला वाटते की, संधी खूप कमी वेळा आपल्यासमोर येतात त्यामुळे त्या येतात तेव्हा त्यांचे सोने केले पाहिजे. वंचित आणि HIV पॉझिटिव्ह मुलांना शिकवून त्यांना प्रेमळ, कल्याणकारी आणि सामाजिक स्वीकाराचे वातावरण प्रदान करण्याची तिला इच्छा आहे तसेच, देशातील लैंगिक असमानता कमी करून महिलांना त्यांचे आर्थिक आणि सामाजिक स्थान उंचावण्यासाठीची साधने पुरविण्याचे तिचे लक्ष्य आहे.
मिस युनिव्हर्स 1994 सुश्मिता सेन पहिल्यापासून तिची आदर्श आहे. तिच्याबद्दल रितिका म्हणते, “सौंदर्य स्पर्धांच्या संदर्भात सांगायचे तर मला सुश्मिता सेन खूप आवडते. ती माझी सर्वात आवडती आहे. तिचा वावर, व्यक्तिमत्व आणि बोलण्याची पद्धत अगदी मंत्रमुग्ध करणारी आहे.”
ग्लॅमर आणि फॅशन उद्योगात आपले खास स्थान स्थापित करणार्या युवा प्रतिभावंतांच्या जीवनाचा कायापालट करण्याची परंपरा मिस डीवा सौंदर्यस्पर्धेने आपल्या 9व्या आवृत्तीत देखील चालू ठेवली आहे. या सौंदर्य स्पर्धेचे व्हिजन भविष्यात आपल्या देशाचे नेतृत्व आणि प्रतिनिधित्व करण्याची क्षमता असलेल्या नवीन पिढीला मनःपूर्वक समर्थन देते.
वारकरी संप्रदाय, शीख धर्म डॉ. अशोक कामत यांनी जोडले: डॉ. सदानंद मोरे
पुणे:
संत नामदेवांनी महाराष्ट्रातील संतांचे विचार सिंधू नदीपर्यंत नेले. त्यानंतर उत्तर भारतातील सर्व संतांचे विचार महाराष्ट्रात पोचविण्याचे काम डॉ. अशोक कामत यांनी केले. शीख आणि वारकरी संप्रदाय यांच्यात सेतू तयार करण्याचे काम त्यांनी केले ही फार महत्त्वाची बाब आहे. प्राचीन ऋषींप्रमाणेच निरपेक्ष वृत्तीने आयुष्यभर ज्ञानदानाचे काम करणारे डॉ. अशोक कामत हे खर्या अर्थाने महर्षी आहेत असे उद्गार ज्येष्ठ साहित्यिक व संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी आज काढले.
27 व्या पुणे नवरात्रौ महोत्सवातर्फे संत साहित्याचे अभ्यासक डॉ. अशोक कामत यांना ‘महर्षी’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी त्यांचा गौरव करताना डॉ. सदानंद मोरे पत्रकार भवन येथे झालेल्या कार्यक्रमात बोलत होते. बडोदा येथील अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून याप्रसंगी उपस्थित होते.
पुणे नवरात्रौ महोत्सवात दरवर्षी ‘महर्षी’ पुरस्कार दिला जातो. समाजातील विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणार्या व्यक्तीस हा प्रतिष्ठेचा पुरस्कार दिला जातो. यंदा त्यासाठी डॉ. कामत यांची निवड करण्यात आली. देवीची मूर्ती असणारे स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी सौ. जाई कामत यांचा साडी, गजरा व श्रीफळ देऊन सौ. जयश्री बागुल यांनी सत्कार केला.
प्रारंभी पुणे नवरात्रौ महोत्सवाचे संस्थापक आयोजक आबा बागुल यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, महर्षी पुरस्काराने सन्मानित डॉ. अशोक कामत हे केवळ पुण्याचेच नव्हे, तर सार्या महाराष्ट्राचे भूषण आहेत. त्यांच्या व्यासंगामुळे ज्ञानाचा फार मोठा ठेवा पुढील पिढ्यांना मिळाला आहे.
पुरस्कारानंतर आपल्या भावना व्यक्त करताना डॉ. अशोक कामत यांनी महाराष्ट्रातील गेल्या काही शतकातील महर्षींचा उल्लेख करून म्हटले की, ‘महर्षी दयानंद सरस्वती, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, महर्षी धोंडो केशव कर्वे यांसारखे महर्षी यांचे आयुष्य हीच माझी प्रेरणा आहे. त्यानंतर ही परंपरा लोकमान्य टिळक, दत्तो वामन पोतदार, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, पं. महादेवशास्त्री जोशी, पं. अमरेंद्र गाडगीळ यांच्यासारख्यांनी पुढे चालवलेली दिसते. कारण महान माणसे तयार करण्याची ताकद या महाराष्ट्राच्या मातीत व संस्कृतीत आहे’, असे ते म्हणाले.
प्रमुख पाहुणे लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले की, शिखांचे दहा धर्मगुरू आणि ग्रंथसाहिबा यांचा अभ्यासपूर्ण परिचय मराठी भाषकांना करून देण्याचे मोलाचे काम डॉ. अशोक कामत यांनी केले आहे. याद्वारे त्यांनी अन्य संतांनी सांगितलेली सेवा, भक्ती, समता याची शिकवण मराठी माणसांना दिली.
या कार्यक्रमात मानपत्राचे वाचन व सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले. घनश्याम सावंत यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाचे इव्हेंट कोऑर्डिनेशन सुनील महाजन, निकिता मोघे तसेच नंदकुमार बानगुडे, घनश्याम सावंत, अमित बागुल, रमेश भंडारी, नंदकुमार कोंढाळकर आणि राजू बागुल यांनी केले. करोना परिस्थितीनंतरच्या निर्बंधांच्या अधीन राहून सर्व कार्यक्रम संपन्न झाला.
Monday, October 11, 2021
साईश्री हॉस्पिटलची रोबोटिक शस्त्रक्रियांची शंभरी पार
पुणे: औंधमधील साईश्री हॉस्पिटलने गुडघ्याच्या समस्यांनी त्रस्त आपल्या रुग्णांना संपुर्ण स्वयंचलित रोबोटिक प्रणालीशी अवगत केले आहे. हॉस्पिटलने पश्चिम भारतातील फुल ऑटोमॅटीक रोबोटिक सिस्टीमद्वारे गुडघ्यांच्या १०० शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. ऑर्थोपेडिक आरोग्यसेवेच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी हे हॉस्पिटल नवीनतम तंत्रज्ञान आणि सर्वोत्तम तज्ञांनी सुसज्ज आहे. या सर्व शस्त्रक्रिया महाराष्ट्राच्या एकमेव व ऑटोमॅटीक अॅक्टिव्ह रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सिस्टम द्वारे केल्या गेल्या.
भारतात शस्त्रक्रियेसाठी रोबोटिक तंत्रज्ञान हे गेमचेंजर होते असे म्हणता येईल. भारतात आज हे तंत्रज्ञान विस्तारत आहे. या तंत्रज्ञानाने रुग्णांना जागतिक दर्जाच्या सेवा आणि इच्छित परिणाम देऊन सर्जिकल व्यवसायाला उच्च पातळीवर नेले आहे. या प्रगत नेक्स्ट-जनरेशन तंत्रज्ञानामुळे या क्षेत्राला नवीन मार्ग मिळाले आहेत, आणि अशी अपेक्षा आहे की रोबोटिक तंत्रज्ञानाद्वारे भारताच्या आरोग्यसेवा उद्योगात मोठी वाढ होईल आणि एक नवीन आणि प्रगत युगाची सुरूवात होईल.
तंत्रज्ञानाचे महत्त्व स्पष्ट करताना रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट आणि स्पोर्ट्स इन्जुरी सर्जन डॉ.नीरज आडकर म्हणाले, “रोबोटिक्स सक्षम आर्टिफिशियल इंटेलिजंस हे नवीन तंत्रज्ञान अतिशय सुस्पष्ट, अचुक आणि आशादायी आहे. रुग्णांचे विशिष्ट थ्री डी बोन मॉडेल विकसित करण्यासाठी सीटीस्कॅन इमेजसची मदत घेतली जाते आणि याच्या मदतीने प्रत्येक रुग्णासाठी वेगवेगळी म्हणजेच पर्सनलाईज्ड वर्च्युअल सिम्युलेशन जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी केली जाते आणि ती सुद्धा सब मिलिमीटर डायमेंशन्ल अचूकतेसह. या तंत्रज्ञानाद्वारे शस्त्रक्रिये नंतरचे सर्वोत्तम परिणाम मिळण्यास मदत होते. शिवाय या बदलत्या तंत्रज्ञानाने रुग्णांना त्यांचे पूर्व-जीवनमान सहज परत मिळते.
डॉक्टर आडकर पुढे म्हणाले, सीयुव्हीआयए (CUVIS) जॉइंट रोबोटिक तंत्रज्ञानाचे काही फायदे म्हणजे ऊतींचे (टिश्युज) कमी नुकसान आणि कमी रक्तस्त्राव, लवकर रिकव्हरी, रुग्णालयातून लवकर डिस्चार्ज आणि योग्य इम्प्लांटसह शस्त्रक्रिये वेळी योग्य पद्धत्तीने होणारी कटिंग . हे प्रगत तंत्रज्ञान हेल्थकेयर मधील निर्धारीत सीमांच्या पलिकडे जाऊन आमच्या रुग्णांना व गंभीर आर्थरायटिस ने ग्रस्त असलेल्यांना सक्रिय जीवनशैली परत मिळवुन देण्यासाठी सुसज्ज आहे.
क्युविस रोबोट, पश्चिम भारतातील एकमेव पूर्णपणे स्वयंचलित आणि प्रगत रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सिस्टम आहे, जी साईश्री हॉस्पिटलमध्ये जॉईंट पेनचा सामना करणाऱ्या आणि समस्यांशी लढणाऱ्या रुग्णांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी स्थापित केली गेली आहे.
Friday, October 8, 2021
भारतीय कला, लोककलांना समृद्ध परंपरा: उल्हास पवार,
पुणे नवरात्र महोत्सवा अंतर्गत प्रतिवर्षी देण्यात येणा-या श्री लक्ष्मी माता जीवन गौरव पुरस्काराने आज यंदा बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित डॉ. रेवा नातू आणि निर्मला गोगटे, ज्येष्ठ संपादक यमाजी मालकर, वेदमूर्ती श्रीकांत दंडवते गुरुजी आणि लावणी लोककलावंत पूनम कुडाळकर यांना सन्मानित करण्यात आले. देवीची प्रतिमा, सन्मानचिन्ह, शाल श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत उल्हास पवार यांच्या हस्ते पत्रकार भवन येथे झालेल्या कार्यक्रमात हे पुरस्कार वितरीत करण्यात आले.
यावेळी पुणे नवरात्राै महोत्सवाचे संस्थापक-आयोजक आबा बागूल, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर व्यासपीठावर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी पुणे नवरात्राै महोत्सवाचा गेल्या सत्तावीस वर्षांचा आढावा घेणारी चित्रफित दाखविण्यात आली.
पवार म्हणाले, संगीत रंगभूमीवर ज्यावेळी संगीत नाटके सादर व्हायचे त्यावेळी रात्र रात्र नाटकाचे प्रयोग चालायचे.मराठी संगीत नाटकांची परंपरा अतिशय उज्ज्वल आहे. त्या काळात बालगंधर्वांच्या बरोबर निर्मलाताई गोगटे यांनी पहिल्यांदा काम केले. महिलांनी नाटकात काम करण्याविषयी व्दिधा मनःस्थिती असतानाच्या काळात कमलाताई गोखले यांनी ही कोंडी फोडली. विष्णूदास भावे यांच्यापासून गोविंद बल्लाळ देवल अशा सगळ्यांनीच संगीत रंगभूमीला दिलेले योगदान अनमोल आहे. संगीत नाट्य रंगभूमी बरोबर तमाशा या लोककला प्रकाराला देखील दीर्घ परंपरा लाभलेली आहे. या कलेला आपण कोणत्या दृष्टीकोनातून पाहतो, ते महत्त्वाचे आहे. तमाशामध्ये परिपूर्ण नऊवारी साडी नेसून लावणी सादर केली जाते, यातूनच त्याच्या संस्कृतीचे दर्शन घडते. कौसल्याबाई कोपरगांवर, राधाबाई बुधगावकर यांच्यापासून यमुानाबई वाईकरांपर्यंची तमाशाची दीर्घ परंपरा आहे. यमुनाबाई बाईकर यांची बैठकीची लावणी म्हणजे तर मुद्रा अभिनयाचा उत्कृष्ट नमुना म्हणावा लागेल. भारत सरकारने लावणी गायिका यमुनाबाई वाईकर यांना पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला, ही कलारसिक म्हणून आपल्यासाठी अतिशय अभिमानाची बाब आहे.
पुरस्कार्थी निर्मला गोगटे म्हणाल्या, हा पुरस्कार मी माझ्या उत्तर आयुष्यातला देवीचा आशीर्वाद मानते. मी स्वतः स्त्रीवादी मनोभूमिका बाळगून आहे. स्त्रियांमध्ये जन्मतःच ऊर्जा आणि चातुर्य दडलेले असते. स्त्री शक्ती ही अफाट असते. तिची ओळख सर्वांना होणे, हे देखील अवघड आहे. पुरस्कार्थी डॉ. रेवा नातू म्हणाल्या की, पुरस्कार ऊर्जा देत असतो. तो केवळ आतापर्यंत केलेल्या कामगिरीचा गौरव नसतो, तर पुढे असेच सातत्याने काम करण्याच्या जबाबदारीची आठवण तो करून देत असतो.
पुरस्कारार्थी लावणी लोककलावंत पूनम कुडाळकर म्हणाल्या की, एवढ्या लहान वयात मला हा पुरस्कार मिळाला याबद्दल मी पुणे नवरात्रमहोत्सवाचे संस्थापक-आयोजक आबा बागूल आणि पुरस्कार समितीचे आभार मानते. पुरस्कारार्थी ज्येष्ठ संपादक यमाजी मालकर आणि वेदमूर्ती श्रीकांत दंडवते गुरुजी यांनी देखील मनोगत व्यक्त केले. यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी मनोगत व्यक्त करतांना नवरात्रौ महोत्सवाच्या दीर्घ परंपरेविषयी आनंद आणि अभिमान व्यक्त केला.
पुणे नवरात्राै महोत्सवाचे अध्यक्ष आबा बागूल यांनी प्रास्ताविक केले. स्नेहल दामले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. घनःश्याम सावंत यांनी आभार मानले.
गांधी विचारच मानवास वाचवतील: पत्रकार अरुण खोरे
महात्मा गांधी यांच्या 152 व्या जयंतीचे औचित्य साधून ह्युमॅनिटी फाउंडेशनच्या वर्धापनदिनानिमित्त दरवर्षी देण्यात येणार 'महात्मा गांधी लिगसी अवॉर्ड 2021' हा पुरस्कार यंदा अरुण खोरे यांना विविध धर्मांच्या धर्मगुरूंच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी खोरे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मौलाना करी इद्रीस, फादर नरेश अंबाला, भन्ते सुदस्सन, सिख ग्रंथी निर्मलसिंग निहाल, ह्युमॅनिटी फाउंडेशनचे अध्यक्ष कुमेल रझा, सेक्रेटरी मूर्तझा शेख आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच याप्रसंगी फाउंडेशनच्या वतीने गांधी जयंती निमित्त घेण्यात आलेल्या निबंध आणि चित्रकला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.
अरुण खोरे म्हणाले, गांधींजीं सोबत लाल बहादूर शास्त्री हे देखील माझे आवडते व्यक्तिमत्व. मी जेव्हा लहान होतो, तेव्हा दुष्काळ पडला होता. अन् भारतीयांना अन्न कसं द्यायचं हा मोठा प्रश्न त्यावेळी उपस्थित झाला होता. तेव्हा शास्त्रीजींनी गांधीजींना सुचवल की दर सोमवारी उपवास करायचा. अन् तेव्हापासून भारतात सोमवारच्या उपवासाला सुरूवात झाली. आजदेखील शास्त्री कुटुंबीय त्या निर्णयाच्या स्मरणार्थ सोमवारचा उपवास करतात. गांधींजी, शास्त्रीजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, चाचा नेहरू हे आपल्या सर्वांसाठी आदर्श असून हा आपला एक गोतावळा आहे. या गोतावळ्यात आपल्याला साधेपणा दिसतो. शिक्षणासाठीची आवड दिसते.
पुढे बोलताना खोरे म्हणाले की पुणे आणि महात्मा गांधी यांचे अतूट नाते आहे. गांधींजींना त्यांचे राजकीय गुरू गोपाळकृष्ण गोखले हे पुण्यामध्ये भेटले. त्यांचे पुण्यात खूप काळ वास्तव्य होते. गांधीजी म्हणतात, तत्वाशिवाय राजकारण केले तर ते वेगळ्या दिशेने जाते. आपल्या राजकीय पक्षांनी, सामाजिक संघटनांची वाटचाल तत्वाला धरून झाली तर कधीच हिंसा होणार नाही.
ह्युमॅनिटी फाउंडेशनच्या वतीने आजपर्यंत एक हजाराहून अधिक गरजू मुलांना मोफत संगणक प्रशिक्षण देण्यात आले आहे. अनेक गरजू मुलांना शालेय फी, शैक्षणिक साहित्य देण्यात येते या उपक्रमाचे उपस्थित सर्व धर्मगुरूंनी कौतुक केले. ह्युमॅनिटी फाउंडेशनच्या वतीने गरजू मुलांसाठी स्पोकन इंग्लिशचे मोफत क्लास घेतले जातात, लॉकडाउनमध्ये ते बंद होते, येत्या 14 नोव्हेंबर पासून पुन्हा ते सुरू होणार असल्याचे कुमेल रझा यांनी सांगितले.
Wednesday, October 6, 2021
अध्यात्म-विज्ञानाच्या एकीतून शांती शक्य: डॉ. ज्ञानवत्सल
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेतर्फे जागतिक विज्ञान, धर्म आणि तत्त्वज्ञानावर आधारित ७व्या वर्ल्ड पार्लमेंटच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होत्या. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.
यावेळी नॅशनल गांधी म्युझियम व लायब्ररीचे संचालक ए. अण्णामलाई, टेक्सास येथील डॉ. सुशील शर्मा, एम्सचे प्राध्यापक डॉ. रमा जयसुंदर, सुप्रसिद्ध विचारवंत डॉ.शेषाद्री चारी, युआरआयचे महासंचालक डॉ. अब्राहम कारिकम आणि जगप्रसिद्ध संगणक तज्ज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, प्रभारी कुलगुरू प्रा.डॉ.आर.एम.चिटणीस, प्र कुलगुरू प्रा.डॉ. मिलिंद पांडे, पीस स्टडीचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मिलिंद पात्रे, प्रा. परिमल माया सुधाकर व माजी कुलगुरू डॉ. एस.एन. पठाण हे उपस्थित होते.
परमपूज्य डॉ. स्वामी ज्ञानवत्सल म्हणाले,“आजच्या युगात असे शिक्षण हवे, की जे प्रत्येकाच्या हदयाला भिडले पाहिजे. सध्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा अभाव दिसून येतो. त्यामुळे मानवता लुप्त होत आहे. अशा काळात मूल्याधिष्ठित शिक्षणाची गरज आहे."
ए.अण्णामलाई म्हणाले,“राष्ट्रपिता महत्मा गांधी यांनी कधीही नवीन तंत्रज्ञानाचा विरोध केला नाही. इंग्लंडमध्ये टेक्सटाईलचा शोध लागला तेव्हा त्यांनी देशात चरखा चालवा हा मंत्र दिला. ते सदैव शरीराबरोबरच आत्म परीक्षण करायचे. त्यांनी शारीरिक आरोग्याबद्दल खूप काळजी घेतली होती. साधी राहणी व उच्च विचारसरणीचा अवलंब त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात केला. गांधीजींनी मानवता धर्माचा पुरस्कार करून पाळत असे. सर्वोदय नुसार देशातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत सर्वांच्या कल्याणाचा विचार केला. मानवाने धर्म आणि अध्यात्माच्या आधारावरच चालावे.”
डॉ. शेषाद्री चारी म्हणाले,“आजच्या युगात चार तत्वांवर कार्य होणे गरजचे आहे. त्यात शांततेची संस्कृती, वैश्विक मूल्याधिष्ठित शिक्षण, विज्ञान आणि अधात्म आणि समग्र विश्व शांतीचा समावेश आहे. एमआयटी विद्यापीठ याच तत्वाचा धागा पकडून कार्य करीत आहेत. जागतिक शांततेसाठी जीवनमूल्य समजणे गरजेचे आहे. धर्म म्हणजे धारणा होय. आज संस्कृती आणि सभ्यता या दोन्हीं तत्वांचा भेद समजून घ्यावा. धर्म हे जीवनमूल्य आहे, तसेच मूल्यवर्धित शिक्षण देतांना प्रत्येक विषयातील मूल्यांचे शिक्षण शिकविणे गरजेचे आहे.
”
डॉ. विजय भटकर म्हणाले,“अर्धवट ज्ञान हे सर्वांसाठी घातक आहे. शहाणपण, ज्ञान आणि अनुभूती यातून चांगले जग निर्माण करता येईल. मानवाचे जीवनमान उंचविण्यासाठी ऋषि आणि शास्त्रज्ञांनी एकत्रित येऊन कार्य करण्याची गरज आहे. मानवाने सत्याचा स्वभाव समजून घ्यावा. तसेच प्रकृतीचे रहस्य याबद्दल आत्मियता बागळावी.”
डॉ.रमा जयासुंदर म्हणाल्या,“अध्यात्म हा विज्ञानाचा आत्मा आहे. विज्ञान आणि अध्यात्मामधील संबंध हा अतिशय निकटचा आहे. विज्ञान हे बाह्य जगातील असून अध्यात्म हे आत्मिक शांती मिळवून देण्यासाठी आहे. त्यासंदर्भात १८ व्या शतकात शोध घेणे सुरू झाले होते. परंतू शरीर स्तरावरील विज्ञानापेक्षा अध्यात्मिक उन्नती ही खूप चांगली असून त्यातून चारित्र्य निर्माण होते.”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातून जगात सुख, समाधान आणि शांती नांदेल. भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्वज्ञान आजच्या पिढीसमोर मांडण्याची गरज आहे. स्वत्व, स्वाभिमान आणि स्वधर्म जागृत करण्याची आवश्यकता आहे. भारताने जगाला वसुधैव कुटुंम्बकमचा संदेश दिला आहे. धर्म, विज्ञान आणि तत्वज्ञान याचा एकत्रित विचार झाल्यास जगात शांतता प्रस्थापित होईल.”
डॉ.सुशील शर्मा व डॉ. डेव्हीड यांनी आपल्या भाषणात विज्ञानामुळे मानवाची प्रगती कशी झाली हे सांगितले. प्रा.डॉ. आर.एम.चिटणीस यांनी स्वागतपर भाषण केले. प्रा.गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. एस.एन.पठाण यांनी आभार मानले.
ग्रॅव्हिटीतर्फे बाल्हेगाव विकास योजनेचे उद्घाटन
6/10/2021
पुणे: ग्रॅव्हिटी फाउंडेशनने ३ ऑक्टोबर २०२१ रोजी व्हर्च्युअल इव्हेंटद्वारे बाल्हेगाव विकास योजनेचे उद्घाटन केले. बाल्हेगावच्या सरपंच आणि ग्रामस्थांनी थेट व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे औरंगाबाद येथे भूमिपूजनाने सुरुवात केली. यावेळी उज्वल निकम (भारतीय विशेष सरकारी वकील) आणि ग्रॅव्हिटी ग्रुपचे अध्यक्ष मिहीर कुलकर्णी यांनी देशाच्या विविध भागातून या व्हर्च्युअल उद्घाटनाला हजेरी लावली. देशातील साथीच्या आजाराची परिस्थिती लक्षात घेऊन ग्रॅव्हिटी फाउंडेशनने व्हर्च्युअल प्रक्षेपण केले जे यशस्वीरीत्या पार पडले.बाल्हेगाव हे औरंगाबाद जिल्ह्यातील एक छोटेसे गाव आहे. ग्रॅव्हिटी फाउंडेशनने गावात सुधारणा व गावाचा विकास करण्याच्या उद्येश्यातुन या गावास दत्तक घेतले आहे. सिंचन, रस्ता बांधकाम, ग्रंथालय, जिम, जलशुद्धीकरण, आणि पुरुष आणि स्त्रियांसाठी स्वतंत्र स्वच्छता सुविधा व इतर काही गोष्टी या विकास प्रक्रियेचा भाग आहेत.
याप्रसंगी देवेंद्र फडणवीस व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बोलताना म्हणाले की बाल्हेगावच्या विकासासाठी ग्रॅव्हिटी ग्रुपचा पुढाकार हा समाजाच्या कल्याणासाठी सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील सहकार्याचे एक उत्तम उदाहरण आहे. मी मिहीर कुलकर्णींचे कौतुक करतो. समाज्याचे देणे परत करण्यासाठी विकास उपक्रम राबविण्याची ही सर्वात प्रभावी पद्धती आहे. बाल्हेगावच्या सुधारणेमध्ये विविध उपक्रमांचा समावेश आहे, त्यापैकी एक म्हणजे आरोग्यसेवा सुधारणे, जी की देशातील आजच्या साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर विशेषतः महत्त्वपूर्ण आहे. आणि मला विश्वास आहे की हा प्रकल्प बाल्हेगाव गावातील रहिवाशांसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल.
पुढे ते म्हणाले, मी या प्रकल्पाला मनापासून पाठिंबा देतो आणि भविष्यात यासाठी आवश्यक ती मदत देणे हा माझा प्रयत्न राहील. हा एक अद्भुत प्रकल्प आहे आणि मला विश्वास आहे की आपण सर्वजण मिळून ते यशस्वी करण्यासाठी काम करू. उज्वल निकम (भारतीय विशेष सरकारी वकील) यांनी ग्रॅ्व्हिटी ग्रुपला शुभेच्छा दिल्या आणि बाल्हेगाव विकास योजनेच्या प्रयत्नांना पाठिंबा दिला. त्यांनी विकासकामांवर नियमितपणे देखरेख ठेवण्याचे आश्वासन दिले. तसेच, प्रगतीमध्ये अडथळा आणण्यार्या वाईट हेतूच्या व्यक्तींना दूर राहण्याचे आवाहन त्यांनी केले. याचबरोबर ग्रॅव्हिटी फाउंडेशनच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आणि सामाजिक कार्यासाठी ग्रॅव्हिटी फाउंडेशनला पाठिंबा देण्याचे आवाहन त्यांनी लोकांना केले.
बाल्हेगाव गावाच्या विकासाव्यतिरिक्त, ग्रॅव्हिटी फाउंडेशन नैसर्गिक आपत्ती, गरीबांचा विकास आणि रोजगाराच्या संधी निर्माण करताना मदत करण्याचे कार्य करते. बाल्हेगाव विकास योजना सुरू करताना आम्हाला खूप अभिमान वाटतो. १४०० लोकसंख्या असलेल्या या गावाचा विकास हे समाज सुधारण्यासाठी आमचे छोटे योगदान आहे, असे मिहीर कुलकर्णी (अध्यक्ष, ग्रॅव्हिटी ग्रुप) म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, माझे पूर्वज आणि कुटुंब हे बाल्हेगाव गावातील आहेत, म्हणून विकास कार्याचा हा प्रयत्न माझ्या हृदयाच्या खुप जवळ आहे. बाल्हेगावमधील प्रत्येक कुटुंबाला त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि निरोगी वातावरणात राहण्यासाठी उत्तम सुविधा मिळाव्यात ही हमी देण्यासाठी मी विकास कार्य करत राहीन.”
Friday, September 10, 2021
Ford (I) to shut down operations with immediate effect
ously skilled and up-skilled all this while.
Saturday, August 28, 2021
पुणे जिप, बजाज ग्रुपतर्फे ३१ ऑगस्टला महालसीकरण
पुणे: बजाज ग्रुपने पुणे जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने ३१ ऑगस्ट २०२१ रोजी महा लसीकरण मोहिमेचे आयोजन केले आहे, ग्रामीण पुण्याच्या १३ तालुक्यांत हे लसीकरण संपन्न होणार आहे. या उपक्रमाचा उद्देश पुणे ग्रामीणमधील दुर्गम भागांतील रहिवाशांना कोविड-19 लस उपलब्ध करून देण्याचा आहे. कोविड-१९च्या तिसऱ्या लाटेत सुरक्षित राहण्यासाठी ही मोहीम हातात घेण्यात आली.
बजाज ग्रुप कंपन्या – बजाज ऑटो आणि बजाज फायनान्स लिमिटेडने जिल्हा परिषदेसोबत मिळून कोव्हीशिल्डच्या १.५ लाख डोसचे वाटप केले. ही लसीकरण मोहीम पुण्यातील आंबेगाव, बारामती, भोर, दौंड, हवेली, इंदापूर, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी, पुरंदर, शिरूर आणि वेल्हा तालुक्यात आयोजित करण्यात येणार आहे.
वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या सर्व व्यक्तिंचे लसीकरण यावेळी करण्यात येणार असून, वरिष्ठ नागरिक, दिव्यांग, गर्भवती महिला, स्तनपान करणाऱ्या माता आणि व्याधिग्रस्त (को-मॉर्बिड) व्यक्तिंवर खास लक्ष असेल.
या उपक्रमाबद्दल बोलताना बजाज ग्रुपचे सीएसआर हेड पंकज बल्लभ म्हणाले की,“सध्या सुरू असलेल्या कोविड-१९ महासाथीत आपण सर्वांनी एकत्र येऊन देशातील सर्व नागरिकांना आरोग्य सुविधा आणि जीवनाच्या अत्यावश्यक गरजांचा लाभ मिळतो आहे का याची खातरजमा करणे आवश्यक ठरते. मागील १३० वर्षांपासून बजाज ग्रुप समाज, सरकार आणि स्थानिक प्रशासनाच्या सोबतीनेसकारात्मक बदल घडविण्याकरिता ठामपणे उभा राहिला. कोविड-१९ च्या विरोधातील युद्ध जिंकण्यासाठी प्रशासनाला साह्य करण्याचे आमचे प्रयत्न आहेत.”
सध्या, पुण्यात रुग्णालय विलगीकरणात ४३११ सक्रीय केस तर गृहविलगीकरणात ४१८८ रुग्णांची नोंद आहे. २६ ऑगस्ट रोजी कोविड-१९ मुळे ६ व्यक्तींचा मृत्यू झाला.
यावर्षी पूर्वार्धात बजाज ग्रुपने १२ प्राणवायू प्रकल्पांची स्थापना केली असून त्याद्वारे ग्रामीण आणि शहरी भागांतील रुग्णालयांत ५,००० एलपीएमहून अधिक ऑक्सिजन पुरवठा करण्यात आला. त्याशिवाय कोविड-१९ रुग्णांच्या उपचाराकरिता त्यांना मदत म्हणून श्वसन साह्य साहित्य जसे की, ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर, वेंटीलेटर आणि बायपॅपचा पुरवठा केला.
बजाज ग्रुपने महासाथ सुरू झाल्यापासून कोविड-१९ च्या विरुद्ध लढा पुकारून रु. ३०० कोटींचे दान करत समाजाप्रती वचनबद्धता पाळली. या मदतनिधीचा वापर करून अस्तित्वात असलेल्या आव्हानांवर त्वरीत उपाययोजना राबविण्यात आल्या तसेच क्षमता आणि स्त्रोत निर्मिती करण्यात आली.
ग्रुपने सरकार, स्थानिक प्रशासन आणि २०० हून अधिक एनजीओ भागीदार संपर्कजाळ्यासमवेत काम केले असून विविध प्रकल्पांना साह्य केले. मदतीची गरज असणाऱ्याना साह्य आणि पाठबळ मिळत असल्याची खातरजमा देखील करण्यात आली. भटक्या स्थलांतरीतांकरिता भोजनाची सोय; शहरी आणि ग्रामीण भागात आरोग्य सुविधांची सुविधा; महत्त्वाच्या आरोग्य देखभाल उपकरणांची तरतूद; आणि गावातून शहरांत परत आलेल्यांच्या रोजगाराची सोय लावण्याकरिता प्रयत्न करण्यात आले.
Monday, August 23, 2021
एमआयटीतर्फे वसाहतवादाबाबतचे चर्चासत्र २५ रोजी
२३/८/२०२१
पुणे: स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानंतर ही देशातील
बर्याच गोष्टी आज ही वसाहतवादी म्हणजेच इंग्रजांच्या काळातील धोरणाच्या व
संस्कृतीनुसार चालत आल्या आहेत. या गुलामगिरी मानसिकतेच्या बेडीतून नव्या पिढीला
बाहेर काढणे हा मुख्य उद्देश्य ठेवून एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या एमआयटी
स्कूल ऑफ गव्हर्नमेंट (मिटसॉग) तर्फे ‘वसाहतवादी मानसिकता
बदलणे’ या विषयावर पहिल्या राष्ट्रीय एक दिवसीय ऑनलाईन
चर्चा सत्राचे आयोजन करण्यात येत आहे. बुधवार दि.२५ ऑगस्ट रोजी दुपारी २ ते ६ या
दरम्यान हे चर्चासत्र होईल,
अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस
युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
वसाहतवादी मानसिकता
म्हणजे वांशिक किंवा सांस्कृतिक कनिष्ठतेची आंतरिक वृत्ती बदलणे आहे. याच
संदर्भातील काही विचारधारेच्या पोस्टर्सचे प्रदर्शन डब्ल्यूपीयूच्या कॅम्पसमध्ये
भरविण्यात आले आहे. याच दिवशी प्रदर्शनाचे उद्घाटन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार
चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते सकाळी ९.३० वा. करणार आहेत. या वेळी सरहद
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार हे उपस्थित रहाणार आहेत.
या ऑनलाईन
चर्चासत्रात माजी केंद्रीय मंत्री व राज्यसभेचे खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी, इंडिया पॉलिसी फाउंडेशनचे मानद संचालक व
राज्यसभेचे खासदार डॉ. राकेश सिन्हा, माजी निवडणुक आयुक्त
एन.गोपालास्वामी, नवी दिल्ली येथील सुप्रसिद्ध विधिज्ञ डॉ. ललित
भसीन, राष्ट्रीय महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष डॉ. पोर्णिमा
अडवाणी, सुप्रसिद्ध सिने अभिनेता मोहन जोशी, प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्यां आणि मानवी हक्क
कायदेतज्ञ अॅड. ऋतुपर्णा मोहंती, प्रसिद्ध आरटीआय
कार्यकर्ते विवेक वेलणकर,
प्रसिद्ध गांधीवादी विचारवंत डॉ. कुमार
प्रशांत, खासदार प्रयागासिंग ठाकूर, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते खासदार डॉ. सुधांशू
त्रिवेदी आणि पाकिस्तान येथील नजीम शेठी हे या विषयावर आपले विचार मांडतील.
भारतीयत्व ही भावना
नेहमीच मुक्त, बिनधास्त आणि अबाधित राहिली आहे. मात्र
ब्रिटिशांनी भारतीयांना स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ते परोपकारी असल्याचा आभास निर्माण
करण्याचा प्रयत्न केला. भारतीय कधीही ब्रिटिश शासकांवर अवलंबून नव्हते. भारतीय
आत्मसन्मान आणि अभिमान जागविण्यासाठी १५ ऑगस्टचे महत्व पुन्हा सांगून आपण स्वतःला
वसाहतीपासून दूर करू या. ब्रिटीश शासकांच्या भारतीय उपखंडातून निघण्याच्या अमृत
महोत्सव वर्षात, भारताच्या भावनेचे पुनरूज्जीवन करण्याचा संकल्प
केला आहे. तसेच, नेहमीच भारतीय भावनेने, विचाराने आणि कृतींनी स्वतंत्र असावा. सर्वांच्या
दैनंदिन जीवनातून वसाहतीचे विचार आणि पद्धतींचे अवशेष काढून टाकण्यासाठी
भारतीयत्वाच्या अदम्य शक्तीचे प्रदर्शन करण्याची ही वेळ आहे.
या पत्रकार परिषदेत
डॉ. श्रीपाल सबनीस, पं. वसंतराव गाडगीळ, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ.
एन.टी.राव, प्र-कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट वरिष्ठ संचालक
रविंद्रनाथ पाटील, सहयोगी संचालिका डॉ. शैलश्री हरिदास व प्रा.
परिमल सुधाकर हे उपस्थित होते.
Sunday, August 1, 2021
पूरग्रस्तांना आमदार सुनील टिंगरेंकडून मदतीचा हात
उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत
20 ट्रक
कोकणाकडे
रवाना
१/८/२०२१
पुणे: महापुराने संकटात सापडलेल्या कोकणवासीयासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनिल टिंगरे आणि मित्र परिवार यांच्यावतीने साडेचार हजार कुटूंबाना किराणा सामानाचे किट आणि दोन हजार संसारउपयोगी भांड्याचे किट यांची मदत देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हे साहित्य घेऊन जाणार्या 20 ट्रकला राष्ट्रवादीचा झेंडा दाखवून मदत मोहिमेची सुरवात केली.
कोकण, कोल्हापुर आणि सांगली जिल्ह्यात आलेल्या महापुराने येथील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पुरग्रस्तांना मदत करण्याचे आव्हान उपमुख्यमंत्र्यांनी केले होते. त्यास प्रतिसाद देत वडगाव शेरीचे आमदार सुनिल टिंगरे आणि त्यांच्या मित्र परिवाराने तातडीची मदत गोळा केली.
उपमुख्यमंत्री पवार यांनी या मदतीच्या उपक्रमाचे कौतुक केले, सर्वांनी अशाच पध्दतीने मदतीचा हातभार लावावा असे आवाहन केले. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह वडगाव शेरीचे माजी अध्यक्ष नाना नलावडे, नारायण गलांडे, शशिकांत टिंगरे, नवनाथ मोझे, अशोक खांदवे, बंडु खांदवे, राजेंद्र खांदवे, सुहास टिंगरे, सोमनाथ टिंगरे, बंटी म्हस्के, सुभाष काळभोर, नितीन जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
तातडीच्या साहित्याचा समावेश
पुरग्रस्तांना पाठविण्यात आलेल्या साडेचार हजार अन्नधान्य किटमध्ये 1 किलो तांदूळ, 10 किलो, गव्हाचे पीठ, 5 किलो, तूरडाळ, 1 किलो साखर, साबण 2, गोडेतेल, टुथपेस्ट, खोबरेल तेल, कांदा मसाला, हळद, लाल मिर्ची पावडर चहा पावडर, मीठ तसेच 2 हजार भाड्यांच्या किटमध्ये संसार उपयोगी 15 साहित्य पाठविण्यात आले,
वाढीव वेळेसाठी दि. ३ रोजी व्यापारी महासंघाचे आंदोलन
१/८/२०२१
पुणे: दुस-या लाटेचा धोका लक्षात घेत ५ एप्रिल, २०२१ पासून राज्य सरकारने पुणे शहरात जीवनावश्यक वस्तूंखेरीज बाजारपेठेतील बाकी सर्व व्यवसायांवर वेळेची बंधने आणली. मात्र आता चार महिने उलटून गेले तरीही यामध्ये अपेक्षेप्रमाणे शिथिलता आलेली नाही. एकीकडे शहरातील कोरोना रुग्णसंख्या कमी होत असताना हे निर्बंध लादले जात असल्याने व्यापारी वर्गामध्ये प्रचंड असंतोष आहे. याच पार्श्वभूमीवर झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जागे करीत व्यापारी वर्गाला योग्य न्याय मिळावा यासाठी येत्या मंगळवार दि. ३ ऑगस्ट रोजी दुपारी १२ ते १२.१५ दरम्यान पुणे शहरातील सर्व व्यापारी विविध ठिकाणी घंटानाद आंदोलन करणार आहेत.
या आंदोलनानंतर सरकारने दुकानांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात योग्य निर्णय घेतला नाही, तर बुधवार ४ ऑगस्ट पासून पुणे शहरातील सर्व दुकाने सायं. ७ वाजेपर्यंत उघडी ठेवण्यात येतील अशा इशारा महासंघाच्या वतीने देण्यात आला असल्याची माहिती, अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. महासंघाच्या सर्व पदाधिका-यांची बैठक दि. ३१ जुलै रोजी पार पडल्यानंतर सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला आहे. महासंघाचे उपाध्यक्ष सूर्यकांत पाठक, सचिव महेंद्र पितळीया यांबरोबर इतर पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
या संदर्भात अधिक माहिती देताना फत्तेचंद रांका म्हणाले, “कोरोनाच्या पहिल्या लाटेत संपूर्ण देश लॉकडाऊन असताना सर्वच व्यवसाय डबघाईला आले. या परिस्थितीने आलेल्या नैराश्याने अनेकांनी आत्महत्या देखील केल्या. पहिल्या लाटेतून सावरत असताना दुस-या लाटेदरम्यान ५ एप्रिल २०२१ पासून महाराष्ट्रात मिनी लॉकडाऊन करण्याचा निर्णय झाला. मात्र परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत सरकारने संपूर्ण लॉकडाऊन करीत परिस्थिती नियंत्रणात आणावी अशी मागणी व्यापारी महासंघाने केली होती. सरकारने ती मान्य केली नाही. मात्र, तरीही व्यापा-यांनी स्वयंस्फूर्तीने ५ एप्रिल ते ३१ मे, २०२१ दरम्यान बाजारपेठा संपूर्ण बंद ठेवत सरकारला मदत केली. असे असून देखील मागील चार महिन्यात पुणे शहरात कोरोना परिस्थिती नियंत्रणात येत असताना व रुग्णसंख्या सातत्याने कमी होत असताना देखील व्यवसायांच्या वेळांमध्ये सरकारने कोणत्याही प्रकारची शिथिलता देण्याचा निर्णय घेतलेला नाही, ही बाब व्यापा-यांच्या दृष्टीने निराशाजनक आहे.”
इतर सर्व व्यवसाय हे निर्बंध झुगारून सुरू असताना नियम पाळणा-या व्यापा-यांना याचा मोठा फटका बसत आहे. व्यापारी वर्गामध्ये या विषयी असंतोष असून सरकारच्या या निर्णयाचा व्यापारी निषेध करीत आहेत. ३ ऑगस्ट रोजी होणा-या घंटानाद आंदोलनानंतर सरकार जागे झाले नाही तर सर्व व्यापारी निर्बंध झुगारित दररोज सायं ७ वाजेपर्यंत आपली दुकाने उघडी ठेवतील, असा इशारा त्यांनी दिला. पुणे शहरातील कोरोना प्रतिबंधक नियम शिथिल करण्यासह ‘विकेंड लॉकडाऊन’मधून शनिवार वगळण्याचा निर्णय पुढील दोन दिवसांत घेण्याचे सूतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसेपाटील यांनी केले होते. मात्र, महापालिका आयुक्त यांनी शहरातील कोरोना प्रतिबंधक नियम तूर्त ‘जैसे थे’ राहती, असा आदेश काल काढला आहे. हे म्हणजे व्यापाऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार आहे.
प्रशासनाने सध्या नऊ तास दुकाने उघडे ठेवण्याची मुभा दिली आहे. मात्र या वेळा व्यापाऱ्यांच्या सोईच्या नाहीत. त्त्यामुळे पुणे शहरातील सर्व दुकाने (अत्यावश्यक वस्तू सोडून) सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत उघडी ठेऊन व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी. अथवा आठवड्यातील ७ दिवस म्हणजे सोमवार ते रविवार सर्व दुकाने (अत्यावश्यक दुकाने सोडून) सकाळी ११ ते सायं ७ वाजेपर्यंत उघडी ठेवावीत किंवा सर्व दुकाने (अत्यावश्यक दुकाने सोडून) आठवड्यातील सर्व दिवस म्हणजे सोमवार ते रविवार उघडी ठेऊन व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी. जेणेकरून व्यापा-यांबरोबर ग्राहकांची देखील सोय होऊ शकेल, अशी पुणे व्यापारी महासंघाची प्रमुख मागणी असल्याचेही रांका यांनी नमूद केले.
गेल्या दीड वर्षांत संपूर्ण लॉकडाऊन, मिनी लॉकडाऊनमुळे अनेक महत्त्वाचे सण, लग्नसराईच्या काळात व्यवसाय बंद असल्याने शहरातील व्यापा-यांना तब्बल ७५ हजार कोटींचा आर्थिक फटका बसला आहे. व्यवसायात असलेल्या अनिश्चिततेने अनेकांना नोक-या गमवाव्या लागल्या आहेत त्यामुळे व्यापारी, कर्मचारी यांची कुटुंबे ही आर्थिक विवंचनेत आहेत. दुसरीकडे ई कॉमर्स व्यवसाय करणा-या कंपन्यांना परवानगी असल्याने जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त अनेक वस्तूंचा व्यवसाय त्या राजरोसपणे करीत आहेत. वेळोवेळी तक्रार करून देखील यावर कोणत्याही प्रकारची पाऊले उचलण्यात आलेली नसल्याचे त्यांनी नमूद केले.
सुरुवातीला दि. ५ जून पासून सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यंत तर दि. ११ जून पासून सकाळी ७ ते सायं. ७ पर्यंत दुकाने उघडण्यास व व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात आली. मात्र त्यानंतर कोणतेही संयुक्तिक कारण न देता पुन्हा दि. २६ जून पासून वेळेत कपात करीत दुकानांच्या वेळा या सायं ४ पर्यंत करण्यात आल्या. दुकाने उघडी ठेवल्याने कोरोनो पसरतो हा जावई शोध कुठल्या आधारावर टास्क फोर्सने लावला हे अद्याप समजले नाही. मुंबईमध्ये वातानुकुलीत कार्यालयात बसून पुणे शहराबाबत चुकीचे निर्णय घेतले जात आहेत व तिस-या लाटेसंदर्भात जनता व व्यापा-यांना घाबरविण्याचे काम केले जात आहे. लसीकरण हा कोरोना आटोक्यात आणण्यासाठीचा एकमेव मार्ग असताना व्यापारी, कर्मचारी व त्यांची कुटुंबे यांच्या लसीकरणासंदर्भात कोणताही निर्णय सरकारने घेतला नाही. या संदर्भात महासंघाने वेळोवेळी पत्रव्यवहार व पाठपुरावा करून देखील त्याला सरकारकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद आलेला नाही. महासंघाने लसीकरणाची सर्व सुविधा स्वखर्चाने उभारून देखील मुबलक लस पुरवठा होत नसल्याने लसीकरण देखील खोळंबले असल्याची माहिती महासंघाचे सचिव महेंद्र पितळीया यांनी दिली.
ते पुढे म्हणाले की, सरकारी, खाजगी कार्यालये, कारखाने सुरू असून सायंकाळी ५ नंतर संचारबंदी असून देखील खाद्य पदार्थ स्टॉल व रस्त्यावरील इतर गर्दी मात्र तशीच आहे. त्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. या उलट नियम पाळत आपला व्यवसाय बंद ठेवणारा व्यापारी मात्र कर्मचा-यांचे पगार, जागेचे भाडे, कर्ज, व्याजाचे हप्ते कर, वीजबिले, घरखर्च या बाबी सांभाळीत आर्थिक संकटात सापडला आहे. या संकट काळात सरकार कडून कोणतीही मदत सोडाच पण सहकार्य देखील मिळत नसल्याने व्यापारी वर्ग मेटाकुटीला आला आहे, त्यामुळे आंदोलनाशिवाय आमच्यासमोर कोणताही पर्याय उपलब्ध नसून सरकारने आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी आमची त्यांना विनंती आहे.