Sunday, December 27, 2020

..अन अभिवाचनातून बालनाट्याचा पडदाही उघडला

पुणे : राजाला असलेले कपड्यांचे वेड, गांधी विचारांची जपणूक, बाबावर रूसलेल्या मुलीला उमगलेली चूक, निसर्ग रक्षणासाठी मुलांनी दाखविलेली एकजूट तसेच पर्यावरणाची उपयुक्तता, संकटात सापडलेला हट्टी मासा अन् बडबड्या मुलाला प्रामाणिकपणाचे मिळालेले बक्षीस अशा मुलांच्या भावविश्वात लहान-थोर रमले. निमित्त होते ते नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित बालनाट्य अभिवाचन महोत्सवाचे! जवळपास दहा महिन्यांच्या कालावधीनंतर नाट्यसंस्कार कला अकादमीच्या कलाकारांनी रंगमंचावर हजेरी लावली. ज्योत्स्ना भोळे सभागृहात आज (दि. 27 डिसेंबर 2020) अभिवाचन महोत्सव रंगला.

नाट्यसंस्कार कला अकादमीच्या नव्या आणि जुन्या कलाकारांनी सहा बालनाट्याचे अभिवाचन केले. प्रकाश पारखी लिखित आणि दिग्दर्शित बिन कपड्यांचा राजा या बालनाट्याच्या अभिवाचनाने महोत्सवाला सुरुवात झाली. या बालनाट्याचे वैशिष्ट्य म्हणजे संस्थेच्या स्थापना वर्षापासून हे बालनाट्य अनेक कलाकारांनी रंगमंचावर सादर केले आहे. राजाला असलेले कपड्यांचे वेड घालविण्यासाठी काय-काय क्लुप्त्या केल्या जातात हे यात दाखविण्यात आले आहे. धनंजय सरदेशपांडे लिखित आणि दीपक काळे दिग्दर्शित गांधी व्हायचं आम्हाला या बालनाट्याद्वारे परोपकार आणि चांगल्या गोष्टींचे लहान मुलांनी नैसर्गिकरित्या केलेले अनुकरण यावर प्रकाश टाकण्यात आला.

अडनिड्या वयातील मुलांच्या भावविश्वावर प्रकाश टाकणार्या  प्रिय बाबा या बालनाट्यात बाबांवर रुसून वाढदिवसाच्या दिवशीच घर सोडून गेलेल्या मुलीला अचानक भेटलेल्या समवयस्क मुलांच्या गप्पा-गोष्टींमधून उमगलेली स्वत:ची चूक याचे उत्तम चित्रण मांडण्यात आले. या बालनाट्याचे लेखन आणि दिग्दर्शन अंजली दफ्तरदार यांनी केले आहे. बालपणापासूनच्या मैत्रीला साक्ष असणार्या  झाडावर अचानक पडणारी कुर्हालड बघून अस्वस्थ झालेल्या शाळकरी मुलांनी एकीचे दर्शन घडवित त्या वृक्षाचीच सावली बनून त्याला वाचविणे, निसर्गाचा ऱ्हास न होऊ देण्याची या मुलांची तळमळ याचे मनाला भिडणारे अभिवाचन सावल्या या बालनाट्यातून करण्यात आले. याचे लेखन आणि दिग्दर्शन अमोल जाधव यांचे होते.

हट्टीपणा केल्यामुळे जीवावर ओढवलेल्या प्रसंगातून चातुर्याने कसाबसा बाहेर पडलेला छोटासा मासा दिसला तो पिटुकल्याची गोष्ट यामध्ये. याचे लेखन आणि दिग्दर्शन केले होते राजश्री राजवाडे-काळे यांनी. अत्यंत बडबड्या पण चतुर मुलाने आईशी लावलेली एक तास बोलण्याची पैज मोडून छोट्या मित्राच्या संकटप्रसंगी धावून जात प्रामाणिकपणाचे दर्शन घडवित आईचे जिंकलेले मन हे अळी मिळी गुपचिळी या बालनाट्यात दिसून आले. संध्या कुलकर्णी यांनी या बालनाट्याचे लेखक दिग्दर्शन केले होते.

सुरुवातीस नाट्यसंस्कार कला अकादमीचे प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी यांनी प्रास्ताविकात, संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी बालनाट्य महोत्सवाचे आयोजन केले जाते. पण सध्याच्या परिस्थितीत बालनाट्य महोत्सव भरविणे शक्य नसल्याने बालनाट्य अभिवाचन महोत्सव घेण्यात आल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीया देशपांडे हिने केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रम शासन नियम सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून सादर करण्यात आला. हा महोत्सव नाट्यसंस्कार कला अकादमीच्या यू-ट्यूब चॅनलवर तसेच फेसबुक पेजवर लवकरच बघायला मिळणार आहे.

0 comments:

Post a Comment