शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त संवाद पुणे, श्री खंडेराय प्रतिष्ठानतर्फे आयोजन
पुणे : नटसम्राट बालगंधर्व यांनी रंगभूमीवर आणलेल्या संगीत द्रौपदी नाटकाला 100 वर्षे झाल्या निमित्ताने द्रौपदी नाटकातील स्वगत, बालगंवर्ध यांच्या आयुष्यातील ठळक घटनांवर प्रकाश टाकणारे निवडक प्रसंग आणि त्याच्या जोडीला‘खरा तो प्रेमा’, ‘सूर सुख खली सु-विमला’, ‘स्वकुल तारक सुता’, ‘सोडी नच मजवरी’, ‘अशी नटे ही चारूता’ या लोकप्रिय नाट्यगीतांचे सादरीकरण रसिकांसाठी जणू पर्वणीच ठरले अन् संगीत नाटकाचा सुवर्णकाळ पुन्हा एकदा अनुभवायला मिळाल्याबद्दल समाधानही व्यक्त केले.
निमित्त होते ते नाट्याचार्य काकासाहेब खाडिलकर लिखित संगीत द्रौपदी नाटकाच्या शताब्दी सांगतेनिमित्त द्रौपदी आणि बालगंधर्व या अनोख्या कार्यक्रमाचे. संवाद पुणे आणि श्री खंडेराय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आणि बालगंधर्व रसिक मंडळाच्या सहकार्याने आज (दि. 12 डिसेंबर) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माजी केंद्रीय कृषीमंत्री खासदार शरद पवार यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिरात घेण्यात आला.
प्रमुख पाहुणे म्हणून पंडित पद्मश्री सुरेश तळवलकर उपस्थित होते. गणपतराव तथा आप्पा बालवडकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहरचे उपाध्यक्ष डॉ. सागर गणपतराव बालवडकर, ज्येष्ठ सारंगीवादक खाँ साहेब फैय्याज हुसेन खाँ, गझल गायक अन्वर कुरेशी, नाट्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, आचार्य अत्रे प्रतिष्ठानचे विजय कोलते, बापूसाहेब मुरकुटे, संवाद पुणेचे सुनील महाजन, बालगंवर्ध रसिक मंडळाचे अध्यक्ष सुरेश साखवळकर, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकीता मोघे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची निर्मिती संवाद पुणे यांची होती.
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात अस्मिता चिंचाळकर यांनी द्रौपदी नाटकातील स्वगत आणि थाट समरीचा दावी नट तसेच लाजविले वैर्यांाना ही दोन पदे सादर केली. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात ज्येष्ठ कलावंत सुरेश साखवळकर यांनी बालगंधर्वांच्या जीवनातील निवडक आणि महत्त्वाचे प्रसंग सादर केले तर नाट्यगीतांचे सादरीकरण सुप्रसिद्ध गायिका बकुळ पंडित, सुरेश साखवळकर, रवींद्र कुलकर्णी यांनी केले. राहुल गोळे (ऑर्गन), केदार कुलकर्णी (तबला), प्रमोद जांभेकर (व्हायोलिन) यांनी साथसंगत केली.
बालगंधर्व, गणपतराव बोडस, गोविंदराव टेंबे व कादरबक्श खाँ साहेब यांची संगीत नाट्य रंगभूमीवरील परंपरा पुढे चालविणार्या. अनुराधा राजहंस, ज्योत्स्ना बडवे, रूपा वाबळे, राहुल गोळे, दीपक टेंबे, खाँ साहेब फैय्याज हुसेन खाँ व अन्वर कुरेशी यांचा सत्कार पंडीत पद्मश्री सुरेश तळवलकर यांच्या हस्ते करण्यात आला.
बालगंवर्ध हे आमच्या घरातील दैवत
नटसम्राट बालगंवर्ध यांच्या आठवणींना उजाळा देताना ज्येष्ठ सारंगीवादक खाँ साहेब फैय्याज हुसेन खाँ यांनी बालगंधर्व हे आमच्या घरातील दैवत असल्याचे सांगून बालगंधर्व यांच्यामुळे नाट्य रसिकांना सारंगीची ओळख झाली. त्यांचे ऋण आम्ही कधीही विसरू शकणार नाही. बालगंधर्व द्रौपदीची भूमिका साकारत असताना प्रत्यक्ष द्रौपदीच गात आहे की काय असा भास रसिकांना होत असे. सारंगीवादन आणि बालगंधर्वांचे गायन इतके एकरूप असे की, सारंगी वाजत आहे की, बालगंवर्ध गात आहेत याचा श्रोत्यांना उलगडा होत नसे. बालगंधर्व हे त्यांच्या काळातील सुपरस्टारच होते. महान कलाकार कधीही मरत नाही, कलाकारच हेच कलाकारांचा सन्मान करतात. पुणे हे जीवंत शहर आहे आणि या शहरात मी राहतो याचा मला अभिमान आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
नाट्यसंगीतामुळेच शास्त्रीय संगीताला मान
रत्नागिरीजवळील छोट्याशा गावात बालपणी नटसम्राट बालगंवर्ध यांच्यासमोर मला तबला वादनाची मिळालेली संधी आजही स्मरणात असल्याचे सांगून पंडित सुरेश तळवलकर यांनी नाट्यसंगीत आणि शास्त्रीय संगीतामधील धागा उलगडून दाखविला. नाट्यसंगीतामुळेच शास्त्रीय संगीताला आजच्या काळात वैभवाचे दिवस दिसत असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संवाद पुणेचे सुनील महाजन आणि बालगंधर्व रसिक मंडळाचे अध्यक्ष सुरेश साखवळकर यांनी केले. मान्यवरांचा सत्कार शरद पवार यांचे आत्मनिवेदनपर असलेले लोक माझे सांगाती हे पुस्तक, शाल आणि तुळशीचे रोप देऊन करण्यात आला. सूत्रसंचालन संतोष चोरडिया यांनी केले तर आभार निकीता मोघे यांनी मानले.
सागर सेतू उपक्रमाचा शुभारंभ माजी केंद्रीय कृषीमंत्री खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष डॉ. सागर बालवडकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सागर सेतू या उपक्रमाचा शुभारंभ या प्रसंगी झाला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी सोडविण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला असल्याचे डॉ. बालवडकर यांनी सांगितले.
0 comments:
Post a Comment