पुणे: गिरिप्रेमी ही पुणेस्थित गिर्यारोहण संस्था असून गिर्यारोहणाचा सर्वसामान्यांपर्यंत प्रसार व प्रचार हे मुख्य ध्येय डोळ्यासमोर ठेऊन जवळपास 4 दशके कार्यरत आहे. या प्रवासात गिरिप्रेमीने भारतीय गिर्यारोहणाला नवा आयाम देण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे.
सध्या तेनसिंग नोर्गे नॅशनल अॅडव्हेंचर अवॉर्डच्या निमित्ताने गिर्यारोहण क्षेत्राशी निगडीत विविध लोकांमध्ये बराच गदारोळ चालू आहे. या सर्व गदारोळापासून गिरिप्रेमी संस्था पुर्णपणे अलिप्त असून गिर्यारोहणाच्या प्रसार व प्रचार या मुख्य ध्येयपूर्तीच्या दृष्टीने कार्यरत आहे. गिरिप्रेमी संस्था म्हणून या सर्व खेदजनक घटनांपासून दूर राहू इच्छिते.
मात्र त्याचसोबत आम्ही हे स्पष्ट करतो की, गिर्यारोहण क्षेत्रामध्ये गिरिप्रेमीचे काम उल्लेखनीय, स्पष्ट व वादातीत आहे. गिरिप्रेमी गिर्यारोहकांच्या
नावावर असलेले विक्रम हे राजमान्य व लोकमान्य आहेत. याची भारत सरकार, केंद्र सरकारचा क्रीडा विभाग व संबंधित अधिकारी, महाराष्ट्र शासन, शासनाचा क्रीडा विभाग व संबधित अधिकारी त्याचसोबत गिर्यारोहण क्षेत्रातील संस्था, व्यक्ती तसेच व्यक्ती समुहांनी याची नोंद घ्यावी.
गिरिप्रेमीने 2012 साली माऊंट एव्हरेस्ट या जगातील सर्वोच्च शिखरावर भारतातील सर्वात मोठी नागरी मोहीम यशस्वी केली व भारतीय गिर्यारोहणातील नव्या पर्वाला सुरवात केली. गिरिप्रेमी संस्थेने दाखविलेल्या पथदर्शी वाटेवर भारतातील अनेक तरुण गिर्यारोहक आश्वासक वाटचाल करत आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
गिरिप्रेमीच्या 2012 च्या यशानंतर गिर्यारोहकांनी 2013 साली माऊंट ल्होत्से (जगातील चौथे उंच शिखर), 2014 साली माऊंट मकालू (जगातील पाचवे उंच शिखर), 2016 साली माऊंट च्यो ओयू (जगातील सहावे उंच शिखर) व माऊंट धौलागिरी (जगातील सातवे उंच शिखर), 2017 साली माऊंट मनास्लु (जगातील आठवे उंच शिखर) व 2019 साली माऊंट कांचनजुंगा (जगातील तिसरे उंच शिखर) अशा सात अष्टहजारी मोहिमा यशस्वी केल्या आहेत. अशी कामगिरी करणारी गिरिप्रेमी ही एकमेव भारतीय संस्था आहे. या सर्व मोहिमा उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी झाल्या. असा विक्रम रचणारे झिरपे हे भारतातील एकमेव गिर्यारोहण नेते आहे.
त्याचसोबत गिरिप्रेमीच्या गिर्यारोहकांच्या नावावर अनेक विक्रम अधिकृतपणे नोंदविले गेले आहेत. गिरिप्रेमीच्या आशिष माने याने आजपर्यंत माऊंट एव्हरेस्ट (2012), माऊंट ल्होत्से (2013), माऊंट मकालू (2014), माऊंट मनास्लु (2017) व माऊंट कांचनजुंगा (2019) अशा पाच अष्टहजारी शिखरांवर चढाई केलेली आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिला व एकमेव महाराष्ट्रीय नागरिक आहे.
तसेच माऊंट मकालू या जगातील पाचव्या उंच शिखरावर चढाई करणारा आशिष माने पहिला भारतीय नागरिक (First Indian Civilian) आहे. याची अधिकृत नोंद- पावती ही नेपाळ पर्यटन मंडळ (नेपाळ सरकारद्वारे) व हिमशिखरांवरील चढाईच्या नोंदी ठेवणार्याक आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त हिमालयन डेटाबेस यांनी दिली आहे. गिरिप्रेमीच्या प्रसाद जोशी याने माऊंट एव्हरेस्ट (2012), माऊंट धौलागिरी (2016) व माऊंट कांचनजुंगा (2019) अशा तीन अष्टहजारी शिखरांवर चढाई केली आहे.
यातील माऊंट धौलागिरी या जगातील सातव्या उंच शिखरावर चढाई करणारा प्रसाद जोशी हा पुर्णपणे भारतीय नागरी मोहिमेद्वारा धौलागिरी शिखरमाथ्यावर चढाई करणारा पहिला भारतीय नागरिक आहे. याची देखील अधिकृत नोंद- पावती ही नेपाळ पर्यटन मंडळ (नेपाळ सरकारद्वारे) व हिमशिखरांवरील चढाईच्या नोंदी ठेवणार्याा आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त ‘हिमालयन डेटाबेस यांनी दिली आहे.
तसेच गिरिप्रेमीचे सदस्य कृष्णा धोकले यांनी 2012 साली माऊंट एव्हरेस्ट व 2019 साली माऊंट कांचनजुंगा चढाई यशस्वी केली आहे. या दोन्हीही शिखरांवर यशस्वी चढाई करणारे ते पहिले महाराष्ट्र शासनाचे कर्मचारी आहेत, असे गिरीप्रेमींच्या अध्यक्षा उषःप्रभा पागे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
0 comments:
Post a Comment