पुणे : सुमारे ४१ वर्षे व्यक्तिमत्त्व विकासासाठी नाट्य प्रशिक्षणाचे कार्य करणाऱ्या नाट्यसंस्कार कला अकादमीतर्फे आयोजित दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धेच्या २९व्या वर्षी यंदा प्रथमच ऑनलाईन घेण्यात आल्या. याला जगातील दहा देशांतून आणि भारतातील सहा राज्यातून स्पर्धकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. स्पर्धेची अंतिम फेरी दि. १५ व १६ ऑगस्ट रोजी ऑनलाईन होणार असल्याची माहिती नाट्यसंस्कार कला अकादमीचे प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नाट्य प्रशिक्षण, नाट्य प्रयोग आणि प्रकाशन या तीनही माध्यमांतून नाट्यसंस्कार कला अकादमीचे कार्य अव्याहतपणे सुरू आहे. संस्थेच्या वतीने १९९२ पासून दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धा घेण्यात येत आहेत. गेली २८ वर्षे या स्पर्धा पुणे शहरातील आठ केंद्रांवर आणि पिंपरी-चिंचवड येथे सहा केद्रांवर आयोजित केल्या जात आहेत. या स्पर्धेत दरवर्षी दीड हजारांवर स्पर्धक सहभागी होतात. यंदा प्रथमच या स्पर्धा ऑनलाईन स्वरूपात घेण्यात आल्या. विविध आठ गटांत मिळून साडेसहाशेच्यावर स्पर्धकांनी प्रवेशिका पाठविल्या. ज्येष्ठ नागरिकांसाठी या वर्षीपासून स्वतंत्र गट ठेवण्यात आला आहे. स्पर्धेची प्राथमिकफेरी सुद्धा ऑनलाईन झाली.
या स्पर्धेत ओमान, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, फ्रान्स, दुबई, मस्कत या देशांतून तसेच गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, गोवा, दिल्ली, आंध्रप्रदेश या राज्यांतून व अमरावती, आंबेजोगाई, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, बीड, अहमदनगर, नंदुरबार, औरंगाबाद, नांदेड, जळगाव, नाशिक, मुंबई, ठाणे, कल्याण या शहरांतून स्पर्धक सहभागी झाले आहेत. सलग २८ वर्षे होत असलेल्या स्पर्धेतील अनेक स्पर्धक नोकरी-व्यवसायानिमित्त महाराष्ट्राबाहेर आहेत. यावर्षी स्पर्धा ऑनलाईन आयोजित करण्यात आल्याने त्यांच्यातील अनेकांच्या मुलांनी या स्पर्धेत उत्साहाने सहभाग घेतला आहे. अशा तऱ्हेने या स्पर्धा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचल्या आहेत.
प्रत्येक गटातील प्राथमिक फेरीतील अंतीम फेरीसाठी निवडलेल्या स्पर्धकांच्या नाट्यछटा नाट्यसंस्कार कला अकादमीच्या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळणार आहेत. जास्तीत जास्त लाईक मिळालेल्या स्पर्धकाला विशेष पुरस्कार देण्यात येणार आहे. प्राथमिक फेरीसाठी परिक्षक म्हणून आशा काळे, अनुराधा कुलकर्णी, पुष्कर देशपांडे, अंजली दप्तरदार, अमोल जाधव, वैशाली गोस्वामी, दिपाली निरगुडकर, अशोक अडावदकर, संध्या कुलकर्णी, श्रीराम ओक, पूजा पारखी आणि प्रकाश पारखी यांनी काम पाहिले. या स्पर्धेच्या संयोजनातील सर्व तांत्रिक बाजू प्रतीक पारखी यांनी सांभाळली.
विशेष म्हणजे या स्पर्धेची अंतिम फेरी १५ व १६ ऑगस्ट रोजी online Live सादर होणार आहे. नाटय-चित्रपट सृष्टीमधील नामवंत परीक्षक असणार आहेत. अंतिम फेरीत आठही गटांत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकांना रोख पुरस्कार तसेच उत्तेजनार्थ पारितोषिकही देण्यात येणार आहेत.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभपण फेसबुकवर रविवार, दि. २३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५ वाजता ऑनलाईन घेण्यात येणार आहे. प्रसिद्ध सिनेअभिनेत्री व संस्थेची माजी विद्यार्थिनी 'सोनाली कुलकर्णी' हिच्या उपस्थितीत व महाराष्ट्राचा सुपरस्टार ठरलेला संस्थेचा विद्यार्थी 'अथर्व कर्वे' यांच्या सोबतीने हा कार्यक्रम होणार आहे.
आपण दिलेल्या सहकार्या बद्दल धन्यवाद.
ReplyDelete