पुणेः नैसर्गिक उपचार पद्धतीचा प्रसार आणि प्रचार व्हावा. नैसर्गिक उपचार पद्धतीव्दारे आरोग्य संपन्न व्हावे. या उद्देशाने देशभर सोमवारी (ता.१८) दुसरा नॅचरोपॅथी डे साजरा करण्यात आला. यानिमित्ताने ताडीवाला रोड वरील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी (एनआयएन) येथे प्राकृतिक चिकित्सा (प्रकृती मेळावा) मेळाव्यात सहभागी होऊन बहुसंख्य नागरिकांनी नैसर्गिक उपचार पद्धतीची माहिती करून घेतली.
तसेच या निमित्ताने तेथे पर्यावरणप्रेमींसहीत शासकीय, तसेच एनजीओमार्फत लावण्यात आलेल्या स्टॉल्स्व्दारे नैसर्गिक उत्पादनांचा प्रचार करण्यात आला. केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या योगा ऍन्ड नॅचरोपॅथी डिपार्टमेंटचे डायरेक्टर विक्रमसिंग यांनी मेळाव्याचे उदघाटन केले. याप्रसंगी एनआयएनच्या डायरेक्टर प्रो.(डॉ.) सत्त्यलक्ष्मी, सोसायटी ऑफ सर्वंट्स् ऑफ गॉड ऍन्ड नेचर क्युअर फाऊंडेशन ट्रस्टचे सेक्रेटरी लाल.एस.घनशानी, ट्रायबल रिसर्च ऍन्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे डेप्युटी डायरेक्टर हंसध्वाज सोनावणे, प्रिन्सिपल चीफ कन्झर्व्हेटर ऑफ फॉरेस्ट ए.एऩ. त्रिपाठी, इन्स्टिट्यूट ऑफ एथिक कमिटीचे चेअरमन प्रा.आर.के.मुटाटकर यांच्यासह अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.
यंदा महात्मा गांधी आणि प्राकृतिक चिकित्सा ही संकल्पना राबविण्यात आली होती. या अनुषंगाने चित्रकार संखा समंथा यांनी महात्मा गांधी यांच्या जीवनशैलीवर आधारित चित्रे रेखाटली. त्यांच्यासमवेत अन्य उत्साही मंडळींनी देखील चित्रे रेखाटण्याचा आनंद घेतला.
डायरेक्टर प्रो.(डॉ.) सत्यलक्ष्मी म्हणाल्या की, प्रदर्शनाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये नैसर्गिक उपचार पद्धतीची जनजागृती करणे हा उद्देश होता. त्याप्रमाणे विविध सामाजिक संस्था, पर्यावरणप्रेमी, येरवडा कारागृह यांच्या तर्फे स्टॉल्स् लावण्यात आले होते. दिवसभर विविध कार्यक्रमही आयोजिण्यात आले . एकूण ३२ स्टॉल्स होते. त्याव्दारे खादीसहीत नैसर्गिक साधनसामुग्री व्दारे उत्पादनांची माहिती देण्यात आली. सकाळच्या सत्रात सायकल रॅली काढण्यात आली.
बॉडी स्क्रिनिंग,नेचर-क्युअरसंबंधीची चित्रफीत दाखविण्यात आली. तसेच जनरल रिझर्व्ह इंजिनिअरिंग फोर्सतर्फेही सांस्कृतिक कार्यक्रम आयोजिले होते.चरख्यावरील सुत कताईचे प्रात्यक्षिक ही करण्यात आले. महात्मा गांधीजींची भजने सादर करण्यात आली. त्याचप्रमाणे नैसर्गिक उपचार पद्धतीची माहिती देखील नागरिकांना याप्रसंगी देण्यात येत होती.
0 comments:
Post a Comment