Sunday, July 21, 2019

आगरवाल, पाटील, गावडे, गरुड यांना नारद पुरस्कार

पुणे: इतिहासाची जाणीव असल्याशिवाय आत्मविश्वास येत नाही आणि आत्मविश्वास हरविलेला देश कधीही पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे आपल्या इतिहासाचे विस्मरण हे भारतासमोरचे सर्वात मोठे आव्हान आहे, असे प्रतिपादन जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. संबित पात्रा यांनी येथे केले

विश्व संवाद केंद्र आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी देण्यात येणार्या आद्य पत्रकार देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्काराचे वितरण शनिवारी डॉ. पात्रा यांच्या हस्ते एका विशेष समारंभात करण्यात आले. यावेळी ते बोलत होते

ज्येष्ठ पत्रकारासाठीच्या पुरस्कारासाठी आज का आनंदचे समूह संपादक श्याम आगरवाल, युवा नवोदित पत्रकार पुरस्कारासाठी दै. दिव्य मराठी सोलापूर आवृत्तीचे सिद्धाराम पाटील, व्यंगचित्रकार पुरस्कारासाठी बारामतीचे शिवाजी गावडे आणि सोशल मिडिया पुरस्कारासाठी हिंदुस्तान टाईम्स मराठीचे विश्वनाथ गरुड यांना सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ पत्रकारासाठी 21000/- आणि उर्वरित तीन पुरस्कारांसाठी प्रत्येकी 11000/- रोख, मानचिन्ह आणि शाल असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष मनोहर कुलकर्णी आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष महेश आठवले, कार्यवाह श्रीकृष्ण कानेटकर आणि पुरस्कारार्थी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी उपस्थितांमध्ये अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी डॉ. पात्रा म्हणाले, देशाने राजकीय नेत्यांना डोक्यावर बसवून ठेवले आहे, ही देशाची दुर्दैवी परिस्थिती आहे. संपन्नतेसाठी संवाद आवश्यक आहे आणि त्यासाठी विश्व संवाद केंद्राचे कार्य महत्त्वाचे आहे. ’तुमच्या देशात मोठी व्यक्ती होऊ शकत नाही, ’ हे पाश्चात्यांनी आपल्या मनावर बिंबवले आहे. इंगजांनी जाणीवपूर्वक येथील ज्ञान नष्ट केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ते ज्ञान पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न केला आहे. आत्मविश्वास हरविलेला देश कधीही पुढे जाऊ शकत नाही. भारतातून भारतीयता काढून घेतल्यास भारत भारत राहणार नाही. त्यामुळे प्रत्येक वर्गाने आपापले आदर्श भारतीय परंपरेतून शोधायला हवेत. आरोग्य क्षेत्राने चरक आणि धन्वंतरींना आदर्श मानायला हवे, नोकरशाहीने विश्वकर्मांना आदर्श मानायला हवे तर पत्रकारांनी नारदांना आदर्श मानायला हवे असे ते म्हणाले.  

पत्रकार म्हणून देवर्षी नारदांच्या भूमिकेचे विवेचन करताना ते म्हणाले, की सत्तेजवळ राहूनही सत्ताधार्यांकडून काही मागायचे नाही हे नारदांकडून शिकायला हवे. तसेच देशाचा इतिहास पुढील पिढ्यांसाठी संगहित व्हावा, ही पत्रकारांची जबाबदारी आहे. देव आणि असुर यांच्यासह सर्व मानवांचे कल्याण व्हावे, यासाठी नारदांनी कार्य केले. त्याचा आदर्श युवकांनी घ्यायला हवा

यावेळी मनोहर कुलकर्णी म्हणाले, देवर्षी नारदांना केवळ विश्व संवाद केंद्राने तर अनेकांनी पहिले पत्रकार मानले आहे. नारद हे पहिले संदेशवाहक आहेत. नारदांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी आहे. मात्र आपण नारदांचे स्मरण पुरेशा प्रमाणात करत नाही. महेश आठवले म्हणाले, की वाक्याचा अर्थ कसा लावायचा याचे अनेक नियम आहेत. पत्रकारांनी हे समजून घ्यायला हवे. विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार व्हावेत, भाषेचा अर्थ कळावा यासाठी डीईएस प्रयत्न करत आहे. कानिटकर यांनी आभार प्रदर्शन केले तर आसावरी जोशी यांनी सूत्र संचालन केले.

0 comments:

Post a Comment