Wednesday, June 5, 2019

सब-ज्युनियर गटाची २२ वी राष्ट्रीय रोइंग स्पर्धा ९ जूनपासून


पुणे : भारतीय रोइंग फेडरेशनच्या मान्यतेने आणि महाराष्ट्र रोइंग असोसिएशनच्या वतीने २२ व्या सब-ज्युनियर आणि चौथ्या आंतर राज्य चॅलेंजर्स स्प्रिंट राष्ट्रीय रोइंग चॅम्पियनशिपचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे. कॉलेज आॅफ मिलिटरी इंजिनीअरिंंगच्या कॅम्पसमध्ये स्थित आर्मी रोइंग नोडमध्ये ही स्पर्धा ते ११ जून दरम्यान होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र रोइंग असोसिएशनचे अध्यक्ष मुज्तबा लोखंडवाला यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

यावेळी असोसिएशनच्या सचिव मृदुला कुलकर्णी, सहसचिव संजय वळवी, आंतरराष्ट्रीय पंच आणि ज्युरी नरेंद्र 
कोठारी उपस्थित होते. सब ज्युनियर गटातील स्पर्धा १५ वर्षांखालील मुले आणि मुलींमध्ये होणार आहे. या स्पर्धेत २२ राज्यातून ६०० हून अधिक रोव्हर्स सहभागी होणार आहेत. केंद्रशासित प्रदेशातील मुले आणि मुलीही या स्पर्धेत सहभागी होणार असल्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातून सर्वाधिक ५० खेळाडू सहभागी होत आहेत

मृदूला कुलकर्णी म्हणाल्या, ही स्पर्धा सिंगल स्कल्स, डबल स्कल्स, कॉक्सलेस पेअर -, कॉक्सलेस पेअर - आदी प्रकारांत होणार आहे. पहिल्या दिवशी स्पर्धेचा ड्रॉ जाहीर होईल. यानंतर दुस-या दिवशी म्हणजे जूनला (रविवार) सकाळी आठ वाजल्यापासून हिट्सला सुरुवात होईल. यानंतर १० जूनला (सोमवार) रिपेचेज आणि उपांत्य फेरीच्या शर्यतींना आठ वाजल्यापासून सुरुवात होईल. ११ जून रोजी (मंगळवार) स्पर्धेच्या अंतिम शर्यती आणि पारितोषिक वितरण समारंभ असेल. यावेळी पिंपरी चिंचवडचे महापौर राहुल जाधव उपस्थित राहणार आहेत.

संजय वळवी म्हणाले, भारतात सर्वांत कमी वय असलेल्या या वर्गाची ही श्रेणी आहे. या गटातून भारताला भविष्यात गुणवान खेळाडू मिळू शकतात. रोव्हर्सची दुसरी फळी तयारी व्हावी, या स्पर्धेमागील हेतू आहे. सहा लेनच्या कोर्सवर या शर्यती होतील. ५०० मीटर अंतराच्या या शर्यती प्रेक्षणीय आणि चुरशीच्या होतील .

कॉलेज आॅफ मिलिटरी इंजिनीअरिंगच्या कॅम्पसमधील आर्मी रोइंग नोड हे भारतातील पहिले आणि एकमेव आॅलिंपिक आकाराचे कृत्रिम रोइंग कोर्स आहे. जे सर्व प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्याची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी सुसज्ज आहे. येथील सुविधांचा वापर २००९ पासून केला जात आहे. आणि हा रोइंग कोर्स म्हणजे पुणे आणि पिंपरी-चिंचवडसाठी अभिमानाची गोष्ट आहे.

0 comments:

Post a Comment