Thursday, April 11, 2019

‘डान्स सिझन २०१९’ चे आयोजन

पुणे: भारतीय शास्त्रीय नृत्य कलेचे संगोपन, संवर्धन, प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशाने पुणे शहरातील शास्त्रीय नृत्याच्या सर्व शैलींच्या कलाकारांनी एकत्र येत शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्थेची स्थापना केली आहे. संस्थेच्या माध्यमातून यावर्षीपासूनडान्स सिझनचे आयोजन करण्यात येणार असून पहिला डान्स सिझन येत्या शनिवार दि २० एप्रिल ते मंगळवार दि. ३० एप्रिल, २०१९ दरम्यान पुण्यात पार पडणार आहे.

या डान्स सिझनचे वैशिष्ट्य म्हणजे भारतातीय शास्त्रीय कलेच्या सर्व शैलीतील कलाकार या निमित्ताने एकत्र येत आंतरराष्ट्रीय नृत्य दिवसाचे औचित्य साधत हा दहा दिवसांचा कार्यक्रम करणार आहेत. सदर दहा दिवस होणारे सर्व कार्यक्रम हे सर्वांसाठी विनामूल्य खुले असणार आहेत. शहरातील सर्व शैलींच्या कलाकारांनी आज एकत्रितपणे पत्रकार परिषद घेत या डान्स सिझनबद्दल माहिती दिली.

यावेळी प्रसिद्ध भरतनाट्यम् नृत्यांगना शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्थेच्या संस्थापक विश्वस्त डॉ. सुचेता भिडेचापेकर, प्रसिद्ध कथक नृत्यांगना संस्थेच्या अध्यक्षा शमा भाटे, संस्थेच्या संस्थापक विश्वस्त प्रसिद्ध कथक नृत्यांगना मनीषा साठे, सचिव रसिका गुमास्ते, सहसचिव मेघना साबडे, लीना केतकर, मंजिरी कारुळकर, सुचित्रा दाते आदी उपस्थित होते.

संस्थेविषयी अधिक माहिती देताना अध्यक्षा शमा भाटे म्हणाल्या की, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये महत्त्वाचे स्थान असलेल्या शास्त्रीय नृत्य शैलींचा प्रचार, प्रसार व्हावा, या शैलींचे संगोपन, संवर्धन व्हावे, त्या समृद्ध व्हाव्यात आपला आपला वारसा वृद्धिंगत व्हावा या उद्देशाने आम्ही सर्व शैलीच्या कलाकारांनी एकत्र यायचे ठरविले आणि शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्थेची स्थापना केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून समाजातील सर्व स्तरांपर्यंत शास्त्रीय नृत्यकलेचा प्रसार व्हावा, अभिरुचीसंपन्न प्रेक्षक तयार व्हावा, रसिकांना या नृत्य शैली पहायला, शिकायला मिळाव्यात यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहोत.

हे सर्व करीत असताना पुण्यासारख्या शहरात खास नृत्याच्या कार्यक्रमांसाठी एक चांगली, सर्व सोयींनी उपयुक्त अशी वास्तू असावी यासाठी देखील आम्ही प्रयत्न करणार आहोत. याबरोबरच नृत्याकडे शैक्षणिकदृष्ट्या पाहिले जावे, नव्या कलाकृती निर्माण होण्यासाठी अर्थसहाय्य आणि मदत मिळावी अशी देखील आमची अपेक्षा असल्याचे यावेळी डॉ. सुचेता भिडे यांनी आवर्जून नमूद केले.

या सर्व उद्दिष्टांसह सुरु झालेली शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्था यावर्षी आंतरराष्ट्रीय नृत्य दिनाचे औचित्य साधत पुणे शहर आणि उपनगरात डान्स सिझन २०१९ अंतर्गत नृत्याच्या अनेकविध कार्यक्रमांचे आयोजन करीत आहे. याची सुरुवात शनिवार दि, २० एप्रिल, २०१९ रोजी होणार असून ३० एप्रिल रोजी या डान्स सिझनचा समारोप होईल. या अंतर्गत संपूर्ण शहरात सर्वांसाठी खुले आणि विनामूल्य नृत्य विषयक कार्यक्रम, कार्यशाळा, निबंध चित्रकला स्पर्धा, व्याख्याने, चर्चासत्रे यांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रसिद्ध कथक नृत्यांगना मनीषा साठे यांनी दिली.

0 comments:

Post a Comment