Friday, January 4, 2019

महाराष्ट्रीय चवीची 'भारी भरारी' जत्रा


पुणे : मराठी ब्राह्मण व्यावसायिक मित्रमंडळ, पुणेच्या वतीने आयोजित 'भारी भरारी २०१९' जत्रेतून पुणेकर खवैय्यांना महाराष्ट्रीय खाद्यांची चव चाखता येणार आहे. शंभरपेक्षा जास्त पानांचे प्रकार आणि इतर अनेक पदार्थ वस्तूंची रेलचेल या तीन दिवसीय 'भारी भरारी' फन-फूड महोत्सवात असणार आहे. येत्या ११ ते १३ जानेवारी २०१९ या तीन दिवशी शुभारंभ लॉन्स, डी. पी. रोड, म्हात्रे पूल, पुणे येथे सकाळी १० ते रात्री १० या वेळेत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मराठी ब्राह्मण व्यावसायिक मित्रमंडळ, पुणेचे अध्यक्ष संजय जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

प्रसंगी ग्राहक पेठेचे संचालक मित्रमंडळाचे सल्लागार सूर्यकांत पाठक, सचिव प्रसाद पटवर्धन, विश्वस्त राहुल कुलकर्णी, माधव गोडबोले आदी उपस्थित होते. संजय जोशी म्हणाले, "या महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवार, दि. ११ जानेवारी २०१९ रोजी सकाळी ११ वाजता  चितळे उद्योग समूहाचे श्रीकृष्ण चितळे यांच्या हस्ते होणार आहे. या महोत्सवात महाराष्ट्रभरातून चवदार अश्या प्रकारच्या खाद्यपदार्थांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच गृहसजावट वस्तू, हस्तकला, रेडिमेड पदार्थ, वधु-वर सूचक, फॅशन फोटोग्राफी, कोकणी पदार्थ, डिझायनर ड्रेसेस, हर्बल प्रॉडक्ट्स, आयुर्वेदिक औषधे असे विविध प्रकारचे स्टॉल्स असणार आहेत. लहानांसाठी खेळ, गृहिणींसाठी मेहंदी, टॅटू असणार आहे. नवीन वर्षातील या खाद्य जत्रेसह ग्राहकांना गेम्स आणि शॉपिंगचा आनंद घेता येईल."

"कोल्हापुरी मिसळ, कटवडा, नागपुरी वडाभात, पुडाची वडी, खान्देशी शेवभाजी, कोकणी बिरड्याची उसळ, काळ्या रस्याची उसळ, घावन, विविध प्रकारचे थालीपीठे, विविध प्रकारचे मोदक, गुळपोळी, पुरणपोळी, खवापोळी अशा असंख्य पदार्थांची चव पुणेकरांना चाखता येईल. रोज संध्याकाळी चैताली माजगावकर भंडारी यांचा धम्माल हास्य पपेट शोचा कार्यक्रम रसिकांना पाहता येणार आहे. लहानांपासून प्रौढांपर्यंत सर्वांचे मनोरंजन एकाच ठिकाणी एकाच वेळी खाद्ययात्रा, शॉपिंग आणि धम्माल गेम्स अनुभव येणार आहेत. जवळपास २०० च्यावर स्टॉल्स असणार आहेत," असेही जोशी यांनी नमूद केले.

मराठी उद्योजकांची खास मुलाखत

श्रीपाद करमरकर, सुधीर गाडगीळ, सूर्यकांत पाठक यांच्यासह इतर समविचारी लोकांच्या मार्गदर्शनाखाली मराठी ब्राम्हण व्यावसायिक मित्रमंडळ नवनवीन उद्योजकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करीत आहे. जास्तीत जास्त तरुणांनी नोकरीपेक्षा उद्योगाकडे वळावे, यासाठी मार्गदर्शन आणि सहकार्य करण्याचा मित्रमंडळाच्या उद्देश आहे. १९९० मध्ये सुरु केलेल्या या मंडळाला २६ वर्षे होत आहेत. यंदाच्या २७व्या वार्षिक संमेलनानिमित्त दोन मराठी उद्योगपतींच्या खास मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. एल्के केमिकल्सचे संस्थापक संचालक रवींद्र कुलकर्णी युरोपा लॉक्सचे व्यवस्थापकीय संचालक सलील जोशी या दोन मराठी उद्योजकांची मुलाखत मुलाखतकार सुधीर गाडगीळ घेणार आहेत. तसेच पाच तरुण उद्योजकांचा सत्कार यावेळी केला जाणार आहे, असे माधव गोडबोले यांनी सांगितले.

0 comments:

Post a Comment