मराठी चित्रपटसृष्टीत सध्या वैविध्यपूर्ण विषयांवर भाष्य करणारे सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. मुख्य म्हणजे विविध विषयासोबतच सिनेमांच्या सादरीकरणातही विविधता दिसून येत आहे. ‘तुला पण बाशिंग बांधायचंय’ या आगामी मराठी चित्रपटातून स्त्रीचीकथा आणि व्यथा प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. महिलांचे अनेक प्रश्न आजवर चित्रपटांतून हाताळलेले आहेत.स्वत:शी तडजोड करून संसार करणा-या अनेक महिलांच्या मनातील अस्वस्थता ‘तुला पण बाशिंग बांधायचंय’ या चित्रपटातून दाखवण्यात आली आहे. ‘जयलक्ष्मी वैष्णवी फिल्म प्रोडक्शन’ यांची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती भानुदास व्यवहारे व दत्तात्रेय मोहिते यांनी केली असून दिग्दर्शनाची जबाबदारी भानुदास व्यवहारे यांनी सांभाळली आहे. ‘तुला पण बाशिंग बांधायचंय’ हा चित्रपट ३० मार्चलाप्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
वयात आलेल्या मुला-मुलीचं लग्न म्हणजे घरच्यांसाठी काळजीचा विषय असतो; विशेषतः मुलीचं लग्न हा अंमळ जास्तच महत्त्वाचा असतो. ‘तुला पण बाशिंग बांधायचंय’ ही कथा आहे वर्षा आणि आकाश या तरुण जोडप्याची. एकमेकांच्या पसंतीने लग्न ठरलेल्या या दोघांच्या आयुष्याला लग्नानंतर अचानक कलाटणी मिळते. या कलाटणी नंतर वर्षा आणि आकाशाचं आयुष्य कोणतं वळण घेत याची हृदयस्पर्शी कथा या चित्रपटातून पहायला मिळणार आहे. वैवाहिक आयुष्यातील समस्या, मुला-मुलींच्या अपेक्षा, त्यांच्या आई-वडिलांचे दृष्टिकोन यासोबत समाजाची मानसिकता या सगळ्यांवर चित्रपटात भाष्य करण्यात आले आहे.
वेगवेगळ्या धाटणीची पाच गीते या चित्रपटात आहेत. भानुदास व्यवहारे यांच्या लेखणीतून साकारलेल्या या गीतांना संगीतकार एँग्नेल रोमन यांचा संगीतसाज लाभला आहे. वैशाली माडे, सुहास सावंत, प्रसन्नजित कोसंबी यांनी यातील गीते गायली आहेत. संगीत संयोजन विलास गुरव यांचे आहे.
विक्रम गोखले, सुरेश विश्वकर्मा, यतिन कार्येकर, सुनील गोडबोले, भक्ती चव्हाण, श्वेता खरात, सुवर्णा काळे, रितेश नगराले, राहूल पाटील, हर्षा शर्मा, अर्जुन जाधव, शंकर सूर्यवंशी हे कलाकार या चित्रपटात आहेत. चित्रपटाचे सहनिर्माते अभय भंडारी, प्रमोद वेदपाठक, सुभाष चव्हाण,औदुंबर व्यवहारे असून सहदिग्दर्शन निशांत आडगळे यांनी केले आहे. कथा,पटकथा,संवाद भानुदास व्यवहारे यांचे आहेत. छायांकन सिद्धेश मोरे यांनी तर संकलन माधव शिरसाट यांचे आहे. ध्वनीमुद्रण कीर्ती पांचाळ यांचे असून ध्वनीआरेखन प्रमोद चांदोरकर यांनी केले आहे. रंगभूषा- वेशभूषा कुमार मगरे यांची आहे.
‘तुला पण बाशिंग बांधायचंय’ ३० मार्च ला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
0 comments:
Post a Comment