Tuesday, December 19, 2017

झी मराठीवर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’

आज जरी वर्तमान काळातील मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात यशस्वी ठरत असल्या तरी ऐतिहासिक तसंच पौराणिक मालिकांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. अशा मालिकांच्या माध्यमातून इतिहासात डोकाण्याची इच्छा सर्वच वयोगटातील प्रेक्षकांना असते. आजवर कधीही पूर्णपणे समोर न आलेलं स्वराज्याचे रक्षणतकर्ते संभाजी महाराजांचं जीवनचरित्र जाणून घेण्याची संधी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांना लाभली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार असणाऱ्या शंभू राजांचा बालपणापासूनचा इतिहास झी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेद्वारे घराघरात पोहचत आहे.

झी मराठी वाहिनीने नेहमीच केवळ मनोरंजकच नव्हे तर विविधांगी विषयांवर आधारित असलेल्या मालिका सादर केल्या आहेत. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेच्या निमित्ताने संभाजी महाराजांचा इतिहास जगासमोर आणत त्यांनी आजवर कधीही यशस्वीपणे समोर न आलेलं एक अभूतपूर्व चरित्र जगासमोर आणलं आहे. आजवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत लक्ष वेधून घेणाऱ्या डॉ. अमोल कोल्हे यांनी या मालिकेत संभाजी महाराजांची व्यक्तिरेखा साकारली असून, मालिकेची निर्मितीही त्यांनीच केली आहे. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेचं प्रक्षेपण करण्याची जबाबदारी झी मराठीसारख्या आघाडीच्या वाहिनीने स्वीकारल्याने कोल्हे खूप आनंदी आहेत. या मालिकेसाठी लेखक, दिग्दर्शकापासून कॅमेरामनपर्यंत सर्वांनीच मागील आठ वर्षांपासून खूप मेहनत घेतली आहे. झी मराठी वाहिनीच्या माध्यमातून ही मालिका महाराष्ट्राबाहेरील प्रेक्षकांपर्यंतही पोहोचत आहे.
रंगभूमीवर ‘शंभू राजे’ या नाटकाचे ५५० यशस्वी प्रयोग तसंच ‘शिवपुत्र शंभूराजे’ या महानाट्याचे शतकी प्रयोग करणारे डॉ. अमोल कोल्हे ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेच्या निमित्ताने पुन्हा एकदा जणू संभाजी महाराजांची भूमिका जगत आहेत. रंगभूमी असो वा छोटा पडदा संभाजी महाराजांसारख्या कर्तृत्ववान महापुरुषाची व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळण्यासाठी भाग्य असावं लागतं असं सांगत कोल्हे म्हणतात की, एखादी ऐतिहासिक मालिका बनवणं हे निर्मात्याच्या दृष्टिकोनातून खूप आव्हानात्मक असतं. आपल्या पराक्रमाने इतिहासात अजरामर झालेल्या महापुरुषाच्या कार्याला कुठेही गालबोट न लावता ती व्यक्तिरेखा अधिक प्रभावीपणे सादर करणं हे अभिनेता म्हणून त्याही पेक्षा खूप आव्हानात्मक असतं. या दोन्हींचा ताळमेळ साधत ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका आज आबालवृद्धांच्या मनाचा वेध घेण्यात यशस्वी होत आहे.
लेखक प्रताप गंगावणे यांनी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’साठी अभ्यासपूर्ण लेखन केलं आहे. या मालिकेतील प्रत्येक प्रसंग तसंच दृश्य शहानिशा करून सादर करण्यात आलं आहे. यात जगदंब क्रिएशन्सची क्रिएटिव्ह टीम आणि झी मराठीच्या क्रिएटिव्ह टिमचाही मोलाचा वाटा आहे. या मालिकेतील साहसदृश्येही सिनेमांच्या तोडीची आहेत. ही सर्व साहसदृश्ये तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करूनही कोल्हे यांना अनेकदा दुखापतींचा सामना करावा लागला आहे. अभिनय, संवादफेक, कला दिग्दर्शन आणि सादरीकरण अशा सर्वच पातळीवर ही मालिका लक्षवेधी ठरत आहे. कोल्हेंच्या जोडीला प्रतिक्षा लोणकर, शंतनू मोघे, अमित बहल, पूर्वा गोखले आदि सर्वच कलाकारांनी स्वराज्याच्या काळातील विविध व्यक्तिरेखा सजीव केल्या आहेत.

0 comments:

Post a Comment