पुणे :
"गेल्या आर्थिक वर्षात (२०१६-१७) भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) मार्केट शेअर अर्थात बाजारातील हिश्श्यात विमा पॉलिसीच्या निकषावर लक्षणीय वाढ झाली आहे. या आर्थिक वर्षात एलआयसीने दोन कोटी एक लाखापेक्षा अधिक पॉलिसी पूर्ण केल्या असून, जवळपास सव्वा लाख कोटी (१,२४,३९६.२७) रुपये प्रथम हप्ता उत्पन्न प्राप्त केले आहे," अशी माहिती पुणे विभाग (१)चे वरिष्ठ मंडळ अधिकारी प्रसांत नायक यांनी दिली. दरम्यान, ६२ व्या वर्धापनदिनानिमित १ ते ७ सप्टेंबर २०१७ या कालावधीत एलआयसी सप्ताहाचे आयोजन केले आहे, असेही त्यांनी सांगितले.
एलआयसीच्या ६२ व्या वर्धापनदिनानिमित्त (१ सप्टेंबर) आयोजित पत्रकार परिषदेत एलआयसीच्या कामगिरीचा आढावा घेताना प्रसांत नायक बोलत होते. यावेळी विपणन अधिकारी अब्राहम वर्गिस आणि डी. एम. सुखात्मे यांच्यासह एलआयसीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
प्रसांत
नायक म्हणाले, "पॉलिसी संख्येवर आधारित एलआयसीचा बाजारातील हिस्सा ७६.०९ टक्के, तर प्रथम हप्ता उत्पन्नावरील हिस्सा ७१.०७ टक्के आहे. सद्यस्थितीतील पॉलिसींची संख्या २९.०४ कोटी इतकी आहे. ३१ मार्च २०१७ अखेर एलआयसीचे एकूण उत्पन्न ४,९२,६२६.६० कोटी असून, एकूण मालमत्ता २५,७२,०२८ कोटी इतकी आहे. तर एलआयसीची गंगाजळी २३,२३,८०२.५९ कोटी आहे. एलआयसीने २१५.५८ लाख दाव्यांचे निराकरण केले असून, दाव्यांपोटी १,१२,७००.४१ कोटी रुपयांचे वितरण केले आहे. त्यामध्ये मुदतपूर्व दाव्यांचे प्रमाण ९८.३४ टक्के, तर मृत्यू दाव्यांचे प्रमाण ९९.६३ टक्के आहे."
"एलआयसीने लोककल्याणासाठी अनेक योजनांना अर्थसहाय्य उपलब्ध करुन दिले आहे. पायाभूत सुविधांमध्ये मोठा वाटा आहे. गृहनिर्माण (६५,६९३ कोटी), उर्जा (१,१७,३९८ कोटी), रस्ते व पूल आणि रेल्वे (३५,२१० कोटी) क्षेत्रात गुंतवणूक केली आहे. त्याचबरोबर १२ व्या पंचवार्षिक योजनेसाठी १४,२३,०५५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. समाजोपयोगी कामांसाठी एलआयसीने ३९८ प्रकल्पांसाठी ८८.०६ कोटींचे अर्थसाहाय्य केले आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत शाळांमध्ये स्वच्छतागृहे उभारण्यासाठी १.४८ कोटी, तर स्वच्छ गंगा अभियानासाठीही एलआयसीने अर्थसहाय्य दिले आहे," असे नायक यांनी यावेळी नमूद केले.
एलआयसीच्या योजनांविषयी बोलताना नायक म्हणाले, "कॅशलेस इंडियाच्या दृष्टिने युपीआय आधारित विमा हप्ता भरण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. रिन्युअल हप्ता भरण्यासाठी सिटी युनियन बॅंकेच्या शाखांमध्येही सोय करण्यात आली आहे. त्याचबरोबर इतर सुविधा देण्यात आल्या आहेत. एपीऑनलाईन, एमपीऑनलाईन, इम्फोसर्व, कॉमन सर्विस सेंटर यासह विविध बॅंकातही विमा हप्ता भरता येणार आहे. याशिवाय निवडक विकास अधिकार्यांना, विमा प्रतिनिधींना हप्ता स्वीकारण्याचे अधिकार देण्यात आले असून, जवळपास २१०० लाईफ प्लस केंद्रावर हप्ता भरता येईल. ग्राहकांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी ७३ कस्टमर झोन कार्यरत आहेत. तक्रार अगर शंका असल्यास ९२२२४९२२२४ या क्रमांकावर एसएमएस सुविधा देण्यात आली आहे."
१० वर्षानंतर प्रथम हप्ता उत्पन्नाचे उद्दिष्ट
पुणे विभाग १ने जवळपास १० वर्षानंतर प्रथम हप्ता उत्पन्नाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. यासह इतर सहा निकषांवरही उद्दिष्ट्यपूर्ती झाली आहे. २०१६-१७ या वर्षात १,७५,५४८ पॉलिसीमार्फत ३८,८०८.५३ लाख रुपयांचे एकूण हप्ता उत्पन्न झाले आहे. यामध्ये चिंचवड शाखेने (२१,२७३), निगडी (१८,९६९), पिंपरी (१३,९१२) पॉलिसी केल्या आहेत. चिंचवड, निगडी, पिंपरी, येरवडा व कॅम्प या शाखांनी विमा हप्ता उत्पन्नामध्येही विशेष कामगिरी केली आहे. प्रमोद पाटणकर, श्रवण तलरेजा, गणपत चव्हाण, ज्ञानेश्वर डोके, गणेश भूजबळ, रमेश बीजापूर, अनिल पिंटो व संजय गोर्हे या विकास अधिकार्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. विमा प्रतिनिधींमध्ये कविता चनोदिया, वनिता ढमाले, शिरीष गोवर्धन, महेश गुगळे, रामचंद्र नायर, स्वाती धूत, गणेश देशमुख, सुभाष पागळे, सुनिलकुमार आग्रे, चित्रा बेंद्रे, एस. एम. जाधव, किरण भोलाणे, राजेंद्र वाघ व शशिकांत पांडे यांनी चांगले काम केले आहे. क्लेम सेटलमेंटमध्येही पुणे विभाग १ ने मोलाची कामगिरी बजावली आहे. देय विद्यमानता व मृत्यू दाव्यांचे निराकरण करताना ५२४२ मृत्यू दाव्यांपोटी ८६.५८ कोटी रुपये वारसांना दिले, तर मुदतपूर्ती दाव्यांपोटी ७६७.९७ कोटी रुपये देण्यात आले, असे नायक यांनी सांगितले.
एलआयसीच्या हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त पुणे विभाग १ मधील सर्व १७ शाखांनी विविध शाळांना प्रत्येकी २५ हजार रुपयांची मदत शालेय साहित्यासाठी केली. तसेच शेवगाव शाखेअंतर्गत पाथर्डी तालुक्यातील महोज येथे पाण्याच्या टाकीसाठी ५० हजारांचे अर्थसहाय्य देण्यात आले. १ ते ७ सप्टेंबर दरम्यान सप्ताहाचे आयोजन केले असून, या काळात आरोग्य तपासणी शिबिर, १००० पेक्षा अधिक वृक्षलागवड, गरजू विद्यार्थ्यांना मदत, शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा, शिक्षकांचा सत्कार असे उपक्रम राबविले जाणार आहेत, अशी माहितीही नायक यांनी दिली.
0 comments:
Post a Comment